जागतिक अंडे दिवसानिमित्त अंड्याच्या आकारात पालकांना दिले मतदान शुभेच्छापत्र
जागतिक अंडे दिवसानिमित्त अंड्याच्या आकारात पालकांना दिले मतदान शुभेच्छापत्र …
संपूर्ण जगात ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा ‘जागतिक अंडे दिवस’ म्हणून साजरा केला जातो ,तसेच सध्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निमित्त मा जिल्हाधिकारीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ हा मतदार जनजागृतीपर कार्यक्रम जिल्ह्यात राबवला जात आहे. त्यातूनच आज आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे अंड्याच्या आकाराचे शुभेच्छापत्र विद्यार्थ्यांच्या हस्ते पालकांना घरी जाऊन देऊन हा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
जगातील सर्व देशातील सर्व संस्कृतीच्या पारंपरिक खाद्य पदार्थात अंड्याचा समावेश होतो ,अंडे हे प्रथिनांनी भरपूर ,खायला रुचकर आणि पौष्टिक असे खाद्य आहे. ‘संडे हो या मंडे ,रोज खाए अंडे’ असं म्हणत ‘सही पोषण ,देश रोशन’ उपक्रमांतर्गत आज शाळेत अंडीचे वाटपही करण्यात आली .
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने ‘स्वीप’ अंतर्गत मतदार जनजागृती साठी प्रभात फेरी काढण्यात आली ,”सुदृढ शरीरासाठी जशी अंड्यांची आपल्याला मदत होते तशीच सुदृढ लोकशाहीसाठी 100 टक्के मतदानाची मदत होते ,तेव्हा येत्या 21 तारखेला सर्व मतदारांनी आपल्या मताचा हक्क बाजवला पाहिजे …!! 100 मतदान करून आपली लोकशाही बळकट केली पाहिजे” असं मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती करणाऱ्या घोषणा देत ,जागृती केली तसेच उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांच्या मदतीने आपल्या पालकांना अंड्याच्या आकारातील शुभेच्छा पत्र देऊन 21 तारखेला कुठल्याही भूल थापा ,आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले.
अंड्याच्या आकारातील शुभेच्छा पत्रे उपस्थित ग्रामस्थ व पालकांचे लक्ष वेधून घेत होते , “अंड्यामुळे होते शरीर सुदृढ ,तर मतदानाने होते लोकशाही दृढ”
“अंड्याची चव आहे रुचकर ,
100 % मतदानाने करू लोकशाहीचा ध्वज वर…!!
“अंडयात आहेत प्रथिने भरपूर ,
मतदानाने करा अव्यवस्था दूर ….!!”
अशा शुभेच्छा लिहिलेले अंड्याच्या आकारातील शुभेच्छा पत्र विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांना घरी जाऊन देण्यात आले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून 100 टक्के मतदानाचा अधिकार बजावणार असल्याचे सांगितले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,सीताराम जाधव ,दादा जाधव ,संजय जाधव ,राजू जाधव आदी सह मोठ्यासंख्येने पालक उपस्थित होते.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर