वर्ल्ड टूरिजम डे अर्थात जागतिक पर्यटन दिन
युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड टूरीजम ऑर्गनायझेशनच्या वतीने 27 सप्टेंबर हा दिवस जगात ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो .त्या निमित्ताने आमच्या युनेस्को स्कूल क्लब गोपाळवाडी शाळेत आज ‘जागतिक पर्यटन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
“1970 साली याच दिवशी स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रच्या सहयोगी संस्था ‘जागतिक पर्यटन संस्थेच्या’ वतीने 1980 साला पासून 27 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो . आपल्या भारतीय संस्कृतीत पर्यटनाला अनन्य साधारण महत्व आहे , “केल्याने देशाटन ,पंडित मैत्री आणि सभेत संचार” ही विद्वानांची लक्षणे भारतीय पुराणात सांगितली आहेत. आपण सुद्धा आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी देशाटन ,पर्यटन केले पाहिजे.” असे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
” निसर्ग सौंदर्य ,वास्तुकला ,ऐतिहासिक ठेवा ,सांस्कृतिक ठेवा या सर्वच बाबतीत भारत हा एक समृद्ध देश आहे ,पर्यटनाच्या निमित्ताने आपण आपल्या मायदेशाच्या या ठेव्याची अनुभूती घेतली पाहिजे आणि त्याचे जतन व संवर्धन यासाठी प्रयत्न केले पाहिजे.”
“शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावन झालेले येथील गडकिल्ले ,अदभुत सौंदर्याने नटलेला कोकण ,आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या अजंठा आणि वेरूळच्या लेण्या या बरोबरच ऐतिहासिक दृष्ट्या आपल्या नगरचे महत्व ही आपण जगाच्या लक्षात आणून दिले पाहिजे ” असे नारायण मंगलारम म्हणाले.
“अहमदनगरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुढे आणण्यासाठी ‘I लव्ह नगर’ सारख्या परिवाराचे मोठे प्रयत्न चालू आहेत ,स्वतःचा स्थापना दिवस माहीत असणारे आणि तो दर वर्षी साजरा करणारे अहमदनगर हे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातील एकमेव शहर असावे याचा आपल्याला अभिमना असायला हवा ,असे ही ते पुढे म्हणाले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना नगरचा भूईकोट किल्ला ,जिथे पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला ,चांदबीबी महाल ,फर्याबक्ष महाल ,महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर,भंडारदरा ,सांदण व्हॅली ,साई मंदिर ,घरांना दार नसलेले वैशिष्ट्यपूर्ण शनी शिंगणापूर ,माऊलींचा ‘पैस’ खांब इत्यादी नगर मधील स्थळे तसेच आधुनिक जगातील सात आश्चर्य आणि भारतातही प्रमुख ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा यांची माहिती दिली . जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्की या स्थळांना भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,सीताराम जाधव ,राजू जाधव आदी उपस्थित होते.