जाऊ पक्षांच्या जगात
जाऊ पक्षांच्या जगात…!!
अर्थात पक्षी गणना २०२०
“रानपाखरा ,रोज सकाळी येसी माझ्या घरा ,
गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा.
शरीर निळसर ,शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी ,
सतेज डोळे चमचम करती जणु रत्ने गोजिरी.”
इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातून रोज आमच्या चिमुकल्यांच्या घरी येणाऱ्या रंनपाखरांच्या घरी आज आम्ही जायचं ठरवलं,निमित्त होते अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना व जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र आयोजित ‘पक्षी निरीक्षण व पक्षी गणना कार्यक्रम २०२० चे’.
आज बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ८.३० वाजता आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी व आजूबाजूच्या परिसरात अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना व जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या सौजन्याने ‘पक्षी निरीक्षण व पक्षी गणना’ करण्याचा उपक्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमवेत राबविण्यात आला. मागे चीन ने त्यांच्या देशातील तांदळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी तांदळाच्या ओंब्यांचे नुकसान करणाऱ्या ‘चिमणी मारो’ अभियान राबवत काही लाख चिमण्या मारल्या ,पण उलट त्यावर्षी तांदळाचे उत्पादन कमी झाले ,अभ्यासाअंती तांदळावर पडणारी कीड या चिमण्या खायच्या आणि चिमण्या नसल्याने ही कीड फोफावुन उत्पादन कमी झाले हे तिथल्या धोरणकर्त्यांच्या लक्षात आले. जी गोष्ट चिमणीची तीच इतर अनेक पक्षांची , पक्षी हा निसर्गाच्या जैवविविधतेतील आतिशय महत्वाचा घटक आहे. नैसर्गिक परिसंस्था व जैवविविधता आपल्या जीवन जगण्याला खऱ्या अर्थाने सुरळीत बनविते आणि हे चिमुकले त्या परिसंस्थेचे अविभाज्य आणि अतूट भाग आहेत.
” मागच्या वर्षी अमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग ,यंदा ऑस्ट्रेलियन बुश फायर याने करोडो वन्यजीव ,पशु पक्षी मारले गेले आणि काही लाखात त्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या .पर्यावरणाच्या वाढत्या ऱ्हासामुळे मानवी जीवनाबरोबर इतर प्राण्यांचे जीवनमानही धोक्यात आले आहे आणि याला सर्वस्वी माणूसच जबाबदार आहे. कित्येक प्राणी आणि पक्षांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. तर कित्येक नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. वेळीच आपण त्यांना नामशेष होण्यापासून वाचविले नाही तर येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.” असे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
आणि म्हणूनच पर्यावरणाविषयी जाणीवजागृती निर्माण व्हावी ,पर्यावरणाच्या समतोलात आपलाही हातभार लागावा या उद्देशाने आमच्या गोपाळवाडी शाळेतील मुलांनी आज पक्षी निरीक्षणाचा आणि पक्षी गणनेचा आनंद घेतला. चिमुकली मुले कुतूहलाने पक्षांचे निरीक्षण करत होती. रोज दिसणाऱ्या पक्षांकडे पाहण्याचा आजचा त्यांचा दृष्टिकोन वेगळाच होता ,आपल्या परिसरात कोणते पक्षी आहेत ,त्यांची संख्या किती हे ते निरीक्षणातून टिपत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद विलक्षण होता. विविध पक्षांचे सूर मारणे, आकाशात घिरट्या घेणे , आवाज काढणे ,चिवचिवाट त्यांना आज खऱ्या अर्थाने वेगळे भासत होते. घरचिमणी, गावकावळा, गायबगळा, कोकिळा , पोपट पारवा, साळुंकी, सातभाई, खंड्या, पांढरपोटी पानकोंबडी , घुबड ,, शिंपी , रॉबिन, भारद्वाज ,टिटवी ,कोतवाल ,घार यांसारख्या विविध पक्ष्यांचे दर्शन यावेळी आम्हाला झाले ,सुग्राणीचे सुरेख खोपे अगदी जवळून पाहायला मिळाले ,बराच वेळ एकाच जागी उडणारी आणि नंतर अचानक सूर मारणारी टिटवी पाहून मुले एकदम खुश झाली.
हा अवर्णनीय आनंद आम्हाला भेटला तो श्री जयराम सातपुते सर व संदीप राठोड सर या पक्षीमित्रांमुळे , सुरवातीला विद्यार्थ्यांना विविध पक्षांची माहिती आणि चित्रे एल ई डी वर दाखवण्यात आली आणि त्यातून कोणत्या पक्षाला काय म्हणतात ,त्याच्या ओळखीच्या खुणा यांची माहिती , नारायण मंगलारम यांनी दिली . “आपण आपल्या परिसरातील पक्षी पाहायला पाहिजे ,नवीन पक्षी आला तर त्याचे निरीक्षण केले पाहिजे ,पक्षांचा आवाज बारकाईने ऐकलं पाहिजे ,त्यांचे संवर्धन आणि संरक्षण केले पाहिजे ” असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले.
पक्षी गणना २०२० हे अहमदनगर जिल्ह्यातील पक्षी गणनेचे ११ वे वर्ष असून जिल्ह्याभरातील अनेक शाळा व विद्यार्थी यात सहभागी होत आहेत , या उपक्रमात भाग घेता आला आणि जीवनाचा एक विलक्षण आनंद अनुभवता आला त्याबद्दल संघटनेचे मनःपूर्वक धन्यवाद ……!!
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर