National Teacher Award Winner 2020 - Smart use of Technology in school education

शिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….?

General 1952

शिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….?

                      ६ जून २०२०

                      एकच धून ,सहा जून 

                  🖋️ नारायण मंगलारम

          सहा जून या दिवसाचे महाराष्ट्राच्या इतिहासात , सार्वभौमत्वात खूप मोठे योगदान आहे , सहा जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिन – सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी दुर्गराज ‘रायगडावर’ पार पडला.

          शिवछत्रपतींचा हा राज्याभिषेक म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या आणि जगाच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी अशी थोर घटना आहे. दिल्लीत पृथ्वीराज चौहान , दक्षिणेत विजयनगरचे साम्राज्य आणि महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचे राज्य संपुष्टात आला नंतर जवळजवळ साडेतीनशे चारशे वर्षांच्या संघर्षांचा ,स्वाभिमानाचा , स्वातंत्र्याचा ,अस्मितेचा विजय म्हणजे हा राज्याभिषेक सोहळा होय.  विजयनगरच्या साम्राज्याच्या विघटनानंतर दक्षिण भारत आणि विशेषतः महाराष्ट्र हा पाच शाह्यांमध्ये विभागला गेला ,मधल्या काळात जुलूम ,जबरदस्ती ,अन्याय ,अत्याचार याने स्थानिक जनता पिडली होती , त्रासली होती ,गांजली होती . नाही म्हणायला मालोजीराजे ,शाहजी राजे ,लखुजी जाधवराव सारखे मत्ताबर आणि प्रजाहितदक्ष सरदार इथे झाले ,पण काही झालं तरी ते या जुलमी सत्ताधिशांचे मांडलिक सरदार , त्यांच्या अपरोक्ष हे अन्याय चालूच होते ….!! गाव लुटणे ,जाळपोळ करणे ,जुलूम , जबरदस्ती करून वसुली करणे ,बायका पोरी पळवणे ,अनिर्बंध वागणे याची झळ अगदी लखुजी जाधवराव यांना आपले आणि आपल्या पुत्रांचे निजामशहा समोर प्राण गमावून चुकवावी लागली तर जिजाऊ शहाजी राजेंना आपला पुत्र गमावून बसली त्यात त्यांच्या घरातील स्त्रियाही सुरक्षित नाहीत असे वातावरण तयार झाले होते , या सगळ्याने पेटून उठून शहाजी राजेंनी स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नसले तरी ते स्वराज्य संकल्पक झाले. या सगळ्या अन्यायाची चीड आणि न्यायची चाड राजमाता जिजाऊंच्या मनात होती तीच चीड आणि चाड युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये उतरल्याने त्यांनी पुढे स्वराज्या निर्मिती आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतल्याचे दिसते.

          धर्म संस्कृतीचा प्रचंड पगडा असणाऱ्या मध्ययुगीन काळात शहाजीराजेंच्या निधनानंतर सती न जाता राजमाता जिजाऊ आपला पुत्र आणि स्वराज्यासाठी थांबून राहिल्या त्या कदाचित शिवछत्रपतींचा राज्याभिषेक पहाण्यासाठीच – या राज्याभिषेक सोहळ्या नंतर काहीच दिवसात जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशीच आपला देह ठेवला ते हा राज्याभिषेक सोहळा डोळे भरून पाहिल्यानंतर आणि जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वराज्य निर्मितेचे स्वप्नां खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्यानंतर ,त्याला एक अधिष्ठान मिळाल्यानंतर. इतके महत्व जिजाऊंच्या दृष्टीने या राज्याभिषेक सोहळ्याचे आहे …..!!

          रयतेच्या मनातले राज्य निर्माण करून आपल्या राज्याच्या सार्वभौमत्वाला बळकटी देण्याच्या उद्देशाने महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला . हा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र देशाची ,महाराष्ट्र धर्माच्या अस्मितेचे आणि महाराष्ट्रीय संस्कृतीची पायभारणीच. याच दिवशी महाराजांनी ‘शिवराज्याभिषेक शक’ ही नवी काल गणना सुरू केली , व्यापार उदिमा साठी ‘शिवराई आणि होन’ ही अस्सल मराठी नाणी पडून चलनात आणली , प्राकृत मराठी भाषेत शब्द कोषासह अनेक मराठी ग्रंथ निर्माण करून घेतले आणि परकीय आक्रमकांनी बदललेली मराठी गटकोट किल्ल्यांची नावे पुन्हा मराठी करून मराठी भाषिक अस्मिता इथल्या रयतेत निर्माण केली. कुठल्याही राज्याच्या सार्वभौमत्वांच्या दृष्टीने कालगणना , नाणी आणि भाषा यांचे अनन्य साधारण महत्व असते ते अमलात आणून त्याचे महत्व अधिरेखीत करणारा हा दिवस ……!!

          कृष्णाजी अनंत सभासद हा शिवछत्रपतींचा समकालीन मुत्सद्दी आणि त्याने ‘सभासदांची बखर’ नावाने छत्रपतींचे आद्य चरित्र देखील लिहिले आहे त्यात राज्याभिषेक सोहळ्याचे महत्व विशद करतांना अगदी मोजक्या आणि अचूक शब्दात सभासद म्हणतो , “या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा ,मऱ्हाटा पातशाहा एवढा छत्रपती जाहला ,ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही….!!” आणि खरंच देवगिरीचे यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रात साडेतीनशे वर्षानेच नव्हे तर महाराष्ट्राच्या ज्ञात दोन हजार वर्षाच्या इतिहासातील ही एक अतिशय मोठी घटना आहे , महाराष्ट्रात सार्वभौम मराठी राज्य अस्तित्वात आले हा , मुघल आणि इथल्या सर्व परकीय सत्ताधीशाना खूप मोठा धक्का होता . राज्याभिषेक शक , नाणी आणि राजभाषा व्यवहार  कोश सारख्या कामांच्या माध्यमातून हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने नव्या युगाची पहाट होती.

          शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राला , मराठी माणसाला ,मराठी संस्कृतीला सार्वभौमत्व प्रदान करणारा दिवस हा असा दिवस आहे ज्याने जागवलेल्या मराठी अस्मितेने पुढे तब्बल सत्तावीस वर्षे मुघल बादशहा औरंगजेबला या राज्यात झुंझावले आणि याच मातीत मिसळून जायला भाग पाडले. अखंड हिंदुस्थानच्या संरक्षकांची जबाबदारी पार पडण्याची ताकद दिली आणि ही राज्याभिषेक दिनाने दिलेलीच अस्मिताच आहे जीने अटकेपार आपल्या पराक्रमाचा झेंडा रोवण्याचे सामर्थ्य मराठी मनगटाना दिलं.

          आजच्या या ‘शिवराज्याभिषेक दिनी’ महाराष्ट्राच्या ,मराठी अस्मितेच्या ,छत्रपतींच्या या पराक्रमची उजळणी करून स्वराज्य ,स्वभाषा आणि मराठी अस्मिता यांचा जागर मांडूयात ,इतिहासातील या सोनेरी पानांची उजळणी करून प्रेरणा घेऊ या …..!!

( गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी सहा जून ला दुर्गराज रायगडावर खासदार छत्रपती युवराज संभाजी राजे भोसले यांच्या पुढाकाराने आयोजित ‘शिवराज्याभिषेक’ सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आहे ,पण यंदा कोरोनाच्या या जागतिक संकटात हा सोहळा साधेपणाने साजरा केला जात असताना या सोहळ्याचे महत्व सांगण्याचा एक प्रयत्न .)

       🖋️  नारायण चंद्रकांत मंगलारम

                  शिवभक्त सहशिक्षक

                जि प प्रा शा गोपाळवाडी

               ता राहुरी ,जि अहमदनगर

              मोबाईल : 9272590119

मेल :narayanmangalaram2006@gmail.com

Narayan Mangalaram

संपर्क 9272590119 9421196987 मेल :narayanmangalaram1980@gmail.com, narayanmangalaram2006@gmail.com, zppsgopalwadi67@gmail.com.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All rights reserved @ Narayan Mangalaram!
Need Help? Chat with us!  
Start a Conversation
Hi! Click one of our members below to chat on WhatsApp  
We usually reply in a few minutes