बालदिनाच्या दिवशी गोपाळवाडी शाळेला ,शांततेचा संदेश अर्थात ‘डोव्ह ऑफ पीस’ ची पत्रे आले थेट युरोप मधील युक्रेन या देशातून
“बालदिनाच्या दिवशी गोपाळवाडी शाळेला ,शांततेचा संदेश अर्थात ‘डोव्ह ऑफ पीस’ ची पत्रे आले थेट युरोप मधील युक्रेन या देशातून….”
“लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर
त्यास अंकुशाचा मार “
बालपणाचे महत्व जगतगुरू तुकोबारायांनी वरील उपमा अलंकाराच्या अतुल्य उदाहरणाने किती सुंदर सांगितले आहे नाही …..!!
बालपण म्हणजे निरागसता ,बालपण म्हणजे अल्लडपणा ,वेंधळेपणा ,उत्सुकता ,उत्साह ,आनंद ,ऊर्जा ,आशा ,आकांक्षा ,स्वप्ने आणि आणखी बरंच काही …!! म्हणूनच मोठ्यात मोठ्या आणि थोरात थोर व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर काळ असतो त्याचे बालपण, हे सगळं आठवण्याला कारणही तसेच आहे ,आज आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि लहान मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय असणारे पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांची जयंती – अर्थात ‘बालदिन‘ .
हा दिवस लेकरांचा ,लहानग्यांचा ,मुलांचा आणि अगदी ‘थोरामध्ये लपलेल्या पोरांचा’ . म्हणून आजच्या दिवशी आम्ही मुलांसाठी फुगे ,चॉकलेट ,बिस्किटे असा खाऊ आणि प्रत्यक्ष ‘चाचा नेहरू’ ( वेशभूषा केलेला विद्यार्थी ) हे सगळं नियोजन केले . पण आमचा आनंद तेव्हा गगनात मावेनासा झाला जेव्हा आजच्या या दिनी आमच्या गोपाळवाडी शाळेला थेट युरोप मधील युक्रेन या देशातील चिमुकल्यांनी पत्रे आली. बालदिन चिमुकल्यानी या पेक्षा सुंदर भेट ती कोणती असू शकते …? नाही का …..?
पंडित नेहरू हे जितके बालकांमध्ये प्रिय होते तितकेच ते शांतताप्रेमी सुद्धा होते ,दुसऱ्या महायुद्धानंतर जग दोन गटात विभागले गेले असतांना या कुठल्याही एका गटात शामिल होऊन जगाची शांतता धोक्यात आणण्यापेक्षा त्यांनी अलिप्ततावादी तिसरा गट निर्माण केला आणि जगाला पुन्हा एकदा युद्धाच्या खाईत लोटण्यापासून रोखले.आणि म्हणूनच उपकार चित्रपटातील एका प्रसिद्ध गीतात गीतकार इंदिवर लिहितात ,
” रंग हरा हरी सिंह नलवे से ,
रंग लाल है लाल बहादुर से
रंग बना बसंती भगत सिंह,
रंग अमन का वीर जवाहर से..!!”
अमन ,शांती याचं प्रतीक म्हणजे मुलांचे लाडके चाचा नेहरू – आणि योगायोग असा की आजच चाचा नेहरूंच्या जयंतीच्या दिवशी आमच्या या लहानग्याना युरोप खंडातील युक्रेन
या देशातून जगासाठी शांततेचा संदेश घेऊन येणारे ‘डोव्ह ऑफ पीस‘ अर्थात शांततेचा संदेश घेऊन आलेले काबूतरांच्या आकारातील पत्रे मिळाली.
यापूर्वी आम्हाला रशिया मधील क्रयन्सकी प्रांतातील आबानच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पत्रे ई मेल द्वारे अर्थात वर्चुअली मिळाली होती ,पण युक्रेनच्या झापोरोझये प्रांतातील सिटी ऑफ मोलोचान्सक येथील प्राथमिक शाळेतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून ही पत्रे आज प्रत्यक्ष पोस्टाने आमचया चिमुकल्यानी मिळाली ,याचा विशेष आनंद आहे.
रशियाच्या लॅरीसा तारेसावीच यांच्या पुढाकाराने जगभरातील विद्यार्थ्यांत आपसात प्रेम ,शांती ,सद्भावना यांचा संचार व्हावा यासाठी ‘ग्लोबल किडलिंक प्रोजेक्ट’ अंतर्गत जगातील विविध देशातील विद्यार्थ्यांत या ‘डोव्ह ऑफ पीस’ चे अर्थात कबुतरांच्या आकारातील शांततेचे संदेश धारण केलेल्या पत्रांचे प्रत्यक्ष आदानप्रदान केले जाते. त्या अंतर्गत आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी साठी युरोप मधील वरील शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या हातानी आपल्या भारतातील चिमुकल्या मित्रांना लिहिलेले हे शांतता संदेश आज आम्हाला प्राप्त झाले. तिथल्या शिक्षिका पेट्रेनको गालिना यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
आज शाळेतील बालदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ही पत्रे देण्यात आली ,आपल्या दूरदेशाच्या मित्रांनी लिहिलेली ही पत्रे पाहून आमचे बाळ गोपाळ हरखून गेले. शांततेचा हा संदेश विद्यार्थ्यांना खूपच भावला आणि आपणही असे संदेश देणारे पक्षी पाठवायचा निर्धार विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला. चाचा नेहरूंची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंनी विषयी माहिती सांगतांनाच शांततेचे महत्व आणि आवाहन केले.
“पंडित नेहरूंच्या जयंतीच्या दिवशी दूर देशातून असा शांतता संदेश आपल्यासाठी येणे ही आपल्यासर्वांसाठी अतिशय आनंदची आणि भूषनावह गोष्ट आहे ,तेव्हा आज आपण जगात शांतता नंदण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि तशी प्रार्थना केली पाहिजे….!!” असे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत हे म्हणाले
” पंडित नेहरूंनी आपले समग्र जीवन आपल्या देशाच्या विकासासाठी ,समृद्धी साठी आणि जगात शांतता नांदावी यासाठी व्यतीत केले ,भारत हा प्राचीन काळापासूनच शांतताप्रिय देश आहे आणि भगवान तथागत गौतम बुद्धांपासून भारत जगाला शांततेचा संदेश देत आला आहे……!!” असे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम हे म्हणाले.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला .
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर