मराठी संस्कृतीचा झेंडा अटकेपार
“मराठा तेतुका मेळवावा ,
महाराष्ट्र धर्म वाढवावा….!!”
अर्थात
‘मराठी संस्कृतीचा झेंडा अटकेपार’
“माझ्या मायदेशी यावे सर्वांनी
झिम्मा खेळावा फुला पाखरांनी ….!!”
कविवर्य नारायण सुर्वेंच्या कवितेतील या ओळी यात आपल्या मायदेशाविषयीचा अभिमान आणि ‘अतिथी देवो भव’ ही आपली भारतीय संस्कृती दोन्ही दिसते. याच भारतीय संस्कृतीत जडण घडण झालेला आणि असेच मायदेशात येण्याचे आमंत्रण घेऊन आणि आपल्या भारतीय ,त्यातही महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख परदेशातील आपल्या मित्रांना करून देणारा कल्चरल बॉक्स जाऊन पोहचला थेट – दक्षिण कोरियात.
नववार साडी घालून ,केसात गजरा ल्यालेली ,हातात बांगड्या आणि गळ्यात ठुशी ,मणी मंगळसूत्र ,पायात पैंजण घातलेली मुलगी कुठली असेल असा प्रश्न तुम्हाला विचारला तर , क्षणाचाही विलंब न करता तुम्ही म्हणू शकता की महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात किंवा गावात एखाद्या सण समारंभात अशी मुलगी तुम्हाला पाहायला मिळेल.
तसेच नेहरू शर्ट आणि पायजमा घालून डोक्यावर गांधी टोपी घातलेला मुलगा कुठला असेल तर त्याचे उत्तर सुद्धा अगदी वरच्या सारखेच असेल नाही का ….?
पण नववार घातलेली ही मुलगी किंवा नेहरूं शर्ट पायजमा घातलेला मुलगा हे दोघे ही महाराष्ट्रातील कुठल्याही गाव किंवा शहरातील नाहीत ,किंबहुना ती भारतातील सुद्धा नाहीत. ही दोन्ही मुले आहेत आशिया खंडातील एक संपन्न आणि विकसित आशा दक्षिण कोरिया या देशातील.
मग त्यांनी हे कपडे कसे काय घातले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना ….? तर दक्षिण कोरियातील ग्येओनगी प्रांतातील संमोरऊ एलिमेंट्री स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर महिन्यात आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी च्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या संस्कृतीची झलक दाखवणारा कल्चरल बॉक्स पाठवला होता ,तो बॉक्स आल्यावर आमच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या या दूरदेशच्या मित्रांसाठी आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारा बॉक्स आपणही पाठवला पाहिजे असे ठरवले.
शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत आणि उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आधी कोणत्या वस्तूंच्या माध्यमातून आपल्या भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख या विद्यार्थ्यांना करून देता येईल याची एक यादी केली. सर्वप्रथम आमच्या शाळेची मुख्यमंत्री प्रियांका हापसे हिने आपल्या महाराष्ट्राची शान असणारी नववारी साडी ,कुर्ता पायजमा आणि फेटा हे पाठवले पाहिजे असे सुचवले ,इथून सुरू झालेली यादी मग महाराष्ट्रीयन स्त्रियांचे दागिने जसे नथ ,ठुशी ,मणी मंगळसूत्र ,बांगड्या ,पैंजण आणि केसात माळायचा गजरा इथं पर्यंत जाऊन पोहचल ,आपल्या सगळ्यात मोठ्या सणाची ओळख म्हणून आकाश दिवा ,दिवे ,नवरात्रीच्या दांडिया ,प्रत्येक सणावाराला आवर्जून हातावर अवतरणारी मेहंदी ,रांगोळी त्याचे रंग ,त्याचे छाप ,होळीचे रंग ,डोक्यावर मानाने घातली जाणारी गांधी टोपी ,आपले राष्ट्रीय फुल असणारे रबरी कमळ ,राष्ट्रीय खेळ असणाऱ्या फायबरच्या हॉकी स्टिक ,अस्सल देशी असणारे भोवरे ,लगोरी ,बुद्धिबळाचा पट ,साप शिडी ,गोट्या हे खेळ या बरोबरच बासरी ,राख्या ,स्वस्तिक ,ओम ,शुभ लाभ ,तुळशी वृंदावणाची प्रतिकृती ,खेळण्यातील बैलगाडी ,नवरा नवरीच्या बाहुल्या आणि खाण्या मध्ये फरसाण ,नगरचा प्रसिद्ध रामप्रसाद चिवडा , भाकर वडी ,सोहन पापडी ,लिटिल हार्ट बिस्किटे आणि राज मलाई आणि मेलडी ही खास आपल्या इथली प्रसिद्ध चॉकलेटे पाठवली. भारतीय मुलांचे आवडते कार्टून कॅरेक्टर छोटा भीम ,मोटू पतलू , माय फ्रेंड गणेश यांच्या बरोबर महाराष्ट्राचा मानबिंदू आणि भारताची शान छत्रपती शिवाजी महाराजा ,ताज महाल ,गेट वे ऑफ इंडिया आदीची ओळख होईल असे शिक्के ,की चेन हे ही सोबत पाठवले.
खास आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या या सर्व वस्तू ,कल्चरल बॉक्सच्या माध्यमातून काल शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी दक्षिण कोरियाच्या शाळेत जाऊन पोहचला ,त्या सगळ्या वस्तू पाहून तिथल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले ,त्यांच्या शिक्षिका एलिसा किम जो यांच्या मदतीने त्यांनी त्या वस्तूंची ओळख करून घेतली ,खास आपला महाराष्ट्रीय पेहराव करून पाहिला आणि आनंदून गेले.
त्यांचे महाराष्ट्रीय वेशभूषेतील फोटो पाहून आणि पाठवलेल्या वस्तू काय आहेत ? त्यातील व्यक्ती किंवा व्यक्तिरेखा कोण आहेत ? वस्तू कशा वापरायच्या हे त्यांना आज सांगतांना आमच्या विद्यार्थ्यांनाही अतिशय आनंद झाला .
‘मराठा तेतुका मेळवावा ,
महाराष्ट्र धर्म वाढवावा….!!’
या समर्थानी म्हंटलेल्या उक्ती प्रमाणे महाराष्ट्र धर्म ,संस्कृती जगात पोहोचवण्याच्या प्रयत्नातील आमचा एक खारीचा वाटा आम्हाला विलक्षण आनंद देऊन गेला …..!!
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर