ग्लोबल नगरी व्हिडीओ कॉन्फरन्स संवाद – कॅनडा
*”भारताची रोज आठवण येते आणि कॅनडा आवडतो की नाही पेक्षा मला आपला भारत देशच सर्वात जास्त आवडतो ….!!”*
_श्री. शंकर नामदेव नागरे_
“कॅनडा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला ,अतिशय विस्तीर्ण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असा शीत कटिबंधातील देश आहे , असं असलं तरी मला भारत देशाची रोज आठवण येते आणि कॅनडा देश मला आवडतो की नाही यापेक्षा मला आपला भारत देश सर्वात जास्त आवडतो ,हे जास्त महत्वाचे आहे व मी लवकरच पुन्हा भारतात परतणार आहे …..!!” तुम्हाला आपल्या देशाची आठवण येते का ? आणि कॅनडा देश तुम्हाला आवडतो का या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देतांना श्री शंकर नागरे बोलत होते.
जिल्हा परिषद अहमदनगर व ग्लोबल नगरी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या *ग्लोबल नगरी व्हिडीओ कॉन्फरन्स संवाद* या उपक्रमांतर्गत *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी ,ता राहुरी जिल्हा अहमदनगर* या शाळेतील विद्यार्थीनी आज उत्तर अमेरीका खंडातील कॅनडा देशात वास्तव्यास असणाऱ्या इंजिनियर *श्री शंकर नामदेव नागरे सर* यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा ह्रदय संवाद साधला त्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात श्रीयुत नागरे सर सांगत होते.
“संगमनेर तालुक्यातील शिबलापूर या छोट्याशा खेडे गावात एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला , माझे प्राथमिक शिक्षण शिबलापुरच्याच जिल्हा परिषद शाळेत झाले तर पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे प्रवरा एज्युकेशन ट्रस्ट च्या गावातील माध्यमिक शाळेत आणि मराठी माध्यमातूनच झाले आहे.” असे ही त्यांनी विद्यार्थ्याच्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
*’जननी जन्मभूमिश्च स्वर्गदपि गरियसी’*
या संस्कृत सुभाषिता प्रमाणे आपली जन्मभूमी आपल्याला स्वर्गापेक्षा नेहमी महान वाटते. त्यामुळेच या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी जगभरातील अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र असणाऱ्या नगरी मंडळींनी अमेरिका स्थित डॉ किशोर गोरे यांच्या पुढाकाराने एकत्र येऊन सुरू केलेल्या *’ग्लोबल नगरी’* परिवार व अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सहकार्याने सुरू असलेल्या ‘ग्लोबल नगरी’ व्हिडीओ कॉन्फरन्स संवादाच्या तिसऱ्या पर्वाच्या पहिल्या स्नेह संवाद आज शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता ( भारतीय प्रमाण वेळ ) आपल्या कर्तृत्वाचा झेंडा सातसमुद्रापार रोवणारे आपल्या संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावचे भूमिपुत्र आणि सध्या कॅनडामधल्या अल्बर्टा राज्यातील फोर्ट मॅकमरी येथे वास्तव्यास असलेले *’कॅनेडियन नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड’* मध्ये आटोमेशन आणि कंट्रोल विभागाचे लीड इंजिनियर *मा शंकर नामदेव नागरे सर* यांनी आमच्या विद्यार्थ्यांसमोर , आपला अहमदनगर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावपासून सुरु झालेला आणि कॅनडाच्या एका बहुराष्ट्रीय कंपनी पर्यंत जाऊन पोहचलेला प्रेरणादायी *’लोकल टू ग्लोबल’* प्रवास उलगडण्याबरोबरच , कॅनडातील संस्कृती ,शिक्षण ,समाजजीवन आणि लोकजीवन आदी घटकांची व्हर्चुअल सफर घडवून आणली.
तुमचं शिक्षण कोणत्या माध्यमातून आणि कोणत्या शाळेत झालं ? ,तुम्ही केव्हा ठरवलं की तुम्हाला इंजिनियर व्हायचे आहे ? ,तुम्ही कॅनडात कोठे राहता आणि काय काम करता ? , तेथील लोक शेती ,पशुपालन आदी व्यवसाय करतात का ? आहारात काय काय असतं ? आपले भारतीय पदार्थ तिथे मिळतात का ? तुम्हाला काय खायला आवडतं ? अशा एक न अनेक प्रश्नातून आमच्या चिमुकल्यांनी कॅनडा देश तेथील संस्कृती आणि समाजजीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला.
“कॅनडा मधील लोकांचा मला आवडलेला गुण म्हणजे ते खूप नम्र व सहकारी वृत्तीचे आहेत ,इथले सरकारही स्थानिक आणि बाहेरचे असा भेद न करता सर्वांना अतिशय उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे .” हे सांगताना त्यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शहरालगतच्या जंगलाला लागलेल्या वानवा आणि त्या काळात सर्व नव्वद हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलावण्यासाठी सरकारने उचललेल्या स्तुत्य पावलांची आठवण आवर्जून सांगितली.
“तिथल्या शाळा कशा असतात ? ,सुट्टी कधी असते ? ,कोणत्या भाषा बोलतात व शिकवतात ,शाळेत परिपाठ प्रार्थना असते का ? ,शाळेला गणवेश असतो का ? कॅनडा मधील प्रसिद्ध ठिकाण कोणती ? संसदीय लोकशाही आहे की अध्यक्षीय ? ,भारतीय लोक राजकारणात आहेत का ? तुम्ही घरी कोणती भाषा बोलता ? , इंग्रजी भाषेची काही अडचण जाणवते का ? ,तिथे कोणते उद्योगधंदे केले जातात ? ,मुलांना इतिहासात भारताचा व शिवाजी महाराजांचा काही इतिहास शिकवला जातो का ? तुम्ही भारतात कधी येता ? तिथे भारतीय लोक आहेत का ? भारतीय सन साजरे केले जातात का ? मंदिरे आहेत का ? अशा अनेक बारीक सारीक प्रश्नातून विद्यार्थ्यांनी कॅनडाबद्दल असलेली आपली जिज्ञासा क्षमवण्याचा प्रयत्न केला.
“कॅनडा हा जगातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे असून कच्चे तेल काढणारा देखील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे ,इथे अनेक पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत ,येथील अनेक राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहेत ,अमेरिका व कॅनडाच्या सीमेवरचा ‘नायगरा धबधबा’ हा जगात प्रसिद्ध आहे व जगभरातील।लोक तो पाहण्यासाठी इथे येतात ,लोकसंख्या कमी आणि विरळ असली तरी भौतिक सुविधा अतिशय उच्च दर्जाच्या आहेत. येथे संसदीय लोकशाही आहे असून भारतीय वंशाचे शिख लोक स्वातंत्रपूर्व काळापासून इथे वास्तव्याला आहेत , कॅनडाच्या संसदेत देखील भारतीय वंशाचे खासदार आहेत आणि सध्याचे कॅनडाचे विदेश मंत्री देखील भारतीय वंशाचे आहेत.भारताप्रमाणे कॅनडावर देखील इंग्रजांचे राज्य होते आणि 1 जुलै हा कॅनडाचा स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो.शाळेत परिपाठात फक्त राष्ट्रगीत गायल जातं आणि ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्या जास्त असली तरी सर्व धर्माची प्रार्थनास्थळे कॅनडात आढळतात.”
“कॅनडा हा उत्तर गोलार्धात शीत कटिबंधातील देश असल्याने वर्षातील सहा महिने इथले तापमान 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असते व मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो ,देशाचा विस्तार मोठा असल्याने देशात तीन प्रमाण वेळा आहेत आणि कॅनडा भारतापेक्षा साडेअकरा तास मागे आहे ,म्हणजे आज जेव्हा भारतात 1 फेब्रुवारीच्या सकाळचे 10 वाजले आहेत तेव्हा कॅनडात 31 जानेवारीच्या रात्रीचे 10.30 झालेले आहेत.” हे ऐकून विद्यार्थ्यांना खूपच आश्चर्य वाटले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तराच्या सत्रापूर्वी श्रीयुत नागरे सर यांनी पीपीटी आणि व्हिडीओ च्या माध्यमातून कॅनडाच्या भौगोलिक स्थिती ,हवामान ,लोक संस्कृती ,शाळा ,ते काम करत असलेल्या कॅनेडियन न्याचूरल रिसोर्सेस कंपनीची चालणारि तेल शुद्धीकरणाची प्रक्रिया ,त्यात वापरले जाणारे अजस्त्र यंत्र सामग्री ,महाकाय ट्रक आणि अक्षरशः ‘ वाळूचे कण रगडून ‘ त्यातून काढले जाणारे कच्चे तेल , ही सगळी प्रक्रिया दाखवली. त्याच बरोबर आपला संगमनेरच्या शिबलापूर ते कॅनडा हा ‘लोकल ते ग्लोबल’ प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला.
“भारतीय शेती आणि पशु पालन आणि कॅनडा मधील शेती आणि पशुपालनात काही फरक जाणवला का ?” या आमच्या चेडगांव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच ज्ञानदेव जाधव यांच्या प्रश्नावर “कॅनडा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे ,पण इथे वर्षातील सहा महिने हिवाळा आणि सहाच महिने उन्हाळा असल्याने भारतासारखी बारमाही शेती केली जात नाही ,पाऊस सुद्धा उन्हाळ्यात आणि कमी पडतो ,पण जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खूप वर असल्याने सिंचनाच्या सोयी चांगल्या आहेत ,सरकारच शेती उपयोगी हत्यारे ,अवजारे ,यंत्र भाड्याने पुरवते ,एक एक शेतकऱ्याकडे कमीत कमी दोनशे ते तीनशे एकर शेती असल्याने शेतीचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे पण रासायनिक खतांचा वापर मात्र केला जात नाही ,आणि नैसर्गिक स्रोतांचा वापरही काळजीपूर्वक केला जातो.” असे श्री नागरे म्हणाले.
“कॅनडात यायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल ?” या प्रश्नाच्या उत्तरात श्री नागरे म्हणाले ,” खूप अभ्यास करावा लागेल ,भरपूर शिकावं लागेल ,मेहनत घ्यावी लागेल. इंग्रजी भाषा महत्वाची आहे ,पण तिचा बाऊ न करता ती सहज आत्मसात करावी लागेल. मी स्वतः मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेला असून ,माझे इंग्रजी इथे आल्यावर बरेच सुधारले ,तेव्हा न घाबरता कौशल्याधिष्टीत ,प्रकल्पाधारीत सर्वांगीण विकास करणारे शिक्षण घ्या ,जग आपलेच आहे.” असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
“तुम्ही शेती करता का , कधी केली आहे का ?” या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी , ” मी आजही जेव्हा भारतात येतो तेव्हा शेतातील सर्व कामे करतो ,मी स्वतः भारतात असतांना शेती केली आहे आणि मला शेतीतील कामे येतात.” असे म्हणत , ” आपली मातृभूमी ,मातृभाषा आणि आई वडील यांना कधी ही विसरू नका आणि नेहमी त्यांचा सन्मान करा .” हे ही त्यांनी आवर्जून सांगितले.
“भारतातील शाळा आणि शिक्षण पद्धती बदलत आहे ,त्यात सकारात्मक बदल होत आहेत ,नेतृत्व गुण विकास आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत ,तशा प्रकारचे प्रकल्प ,उपक्रम शाळेत राबवले पाहिजेत.” असे ही श्रीयुत नागरे सर म्हणाले.
यावेळी चेडगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा सीताराम जाधव ,सदस्य मा महेश पाटील तरवडे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा सुरेश जाधव , सदस्य बाबासाहेब जाधव ,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव ,दादासाहेब जाधव ,राजेंद्र जाधव ,संतोष जाधव ,प्रशांत जाधव ,पालक हिराबाई जाधव , छाया कुर्हे यांनी सुद्धा पीक पाणी ,वाहतूक व्यवस्था ,राजकारण ,धर्मकारणआदी विषयावर काही प्रश्न विचारून आपली उत्सुकता क्षमवण्याचा प्रयत्न केला.
“सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञांनाचे युग आहे .पारंपरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध देश ,तिथली सांस्कृती ,हवामान ,उदयगधंदे ,लोकजीवन यांची सुद्धा माहिती मिळावी ,त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवाव्यात म्हणून हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने राबवला जात आहे. शैक्षणिक वर्ष 2019-2020 चा पहिला व्हिडिओ कॉन्फरन्स संवाद आज पन्नास देशातल्या भारतीयांशी जिल्हा भारतातील शंभर शाळांनी संवाद साधून संपन्न झाला.” अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांनी दिली.
“अनेक तांत्रिक अडचणी आलेल्या असतानाही श्री नागरे सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची अतिशय सुन्दर आणि त्यांना समजतील आशा सोप्या भाषेत उत्तरे दिली आणि विद्यार्थ्यांना एक अविस्मरणीय अनुभव दिला ,भविष्यातही नेहमी संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करूयात ,अहमदनगर जिल्हा परिषद ,शिक्षणाधिकारी मा रमाकांत काठमोरे साहेब, राहुरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मा सुलोचनाताई पटारे व ग्लोबल नगरी परिवाराने ही संधी आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या बद्दल मी शाळेच्या ,गावाच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक आभार मानतो. ” असे नारायण मंगलारम हे प्रास्ताविक व आभार प्रदर्शनात म्हणाले.
आजच्या या उपक्रमासाठी वांबोरी बिटाचे विस्तार अधिकारी श्री अर्जुन गारुडकर साहेब , उंबरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री थोरात साहेब ,पंचायत समितीचे विषय साधन व्यक्ती श्री तांदळे सर यांचे शाळेला विशेष सहकार्य लाभले. राहुरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुलोचनाताई पटारे या गेल्या 3 दिवसांपासून सतत आमच्या संपर्कात राहून आमच्या अडीअडचणी जाणून घेत होत्या आम्हाला प्रोत्साहित करत होत्या ,त्यांच्या मार्गदर्शनात आणि प्रोत्साहनात आजचा पहिला संवाद अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरनात पार पडला.
शेवटी विद्यार्थ्यांनी “भाषालुनी वेरऐना भावम ओक्कटे ….” नागरे सरांच्या मागणी नुसार हे तेलगू देशभक्तीपर गीत आणि “धरतीची आम्ही लेकरं” ही कविता सादर करून श्री नागरे सरांचे मन जिंकून घेतले. भारतात आल्यावर आमच्या शाळेला भेट द्या या विद्यार्थ्यांच्या अमंत्रणावर जूनमध्ये भारतात येणार व त्यावेळी शाळेला नक्की भेट देण्याचे आश्वासन देत श्री शंकर नागरे यांनी विद्यार्थ्यांचा निरोप घेतला.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर