अवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….!!
तुकोबांच्या विचारातील ‘अवगुणांची आणि कोरडी टिळा होळी’
अर्थात अवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….!!
मी होळीत काय आणि का जाळलं ?
याविषयी तुकोबाराय सांगतात,
दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं ।
दहन हे होळी होती दोष ॥
” लोकं होळीत शेणाच्या गौऱ्या, लाकडं जळतात.मी होळीत माझ्यातले ‘दोष’ जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही.” दोष नाही, तर दारिद्र्य नाही. त्यामुळं दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख नाही.
भारत हा उत्सवप्रिय देश असला तरी महाराष्ट्र ही तुकोबांची त्यांच्या विचारांची भूमी असून होळी हा भारताची खास ओळख असणारा रंगांचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग द्वेष ,मत्सर विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात . फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. ह्या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते या मागे एक आख्यायिका आहेत. हिरण्यकश्यपू ,भक्त प्रल्हाद आणि होलिकेची ही कथा ,या कथेमधून असा संकेत मिळतो कि वाईटावर चांगल्याच विजय होतोच. म्हणूनच आज सोमवार दिनांक ९ मार्च २०२० रोजी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे आम्ही तुकोबांच्या विचारांची ‘अवगुणांची होळी’ केली.
या होळीत राग , लोभ , मोह , मत्सर , अन्याय , अत्याचार , भ्रष्टाचार , चोरी , खोटेपणा , जातीयता , धर्मांधता आणि उच्च निचता या सारख्या मानवी दोषांची , अवगुणांची होळी करण्यात आली. सोबतच यावेळी विद्यार्थ्यांनी पाण्याची वाढणारी टंचाई आणि दुष्काळाची दाहकता ओळखून ‘नैसर्गिक रंगानी कोरडी , टिळा होळी खेळण्याची शपथ’ सुद्धा घेतली.
“रंगांच्या या सणाला एकमेकाला प्रेमाचा , आपुलकीचा , स्नेहाचा , मदतीचा आणि मांगल्याचा रंग लावा , दुष्ट विचार आणि अवगुणांना आपल्या जवळ फिरकू सुद्धा देऊ नका” असे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
“या सणाची लहान मुले खूप आतुरतेने वाट पहात असतात. या सणामुळे घरात अतिशय आनंदाचे वातावरण असते. पण पाण्याचे दुर्भिक्ष बघता आपण कोरडी आणि नैसर्गिक रंगांची होळी खेळूयात” असे नारायण मंगलारम म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ,
“होळी रे होळी पुरणाची पोळी” ..
किंवा
“होळीला गवऱ्या पाच पाच…
डोक्यावर नाच नाच”
असे ओरडत एकचं कल्ला केला ,अजित ब्राम्हणे ,सुरज ब्राम्हणे व कृष्णा जाधव याने चेहरा रंगवत त्यातून ‘पाणी वाचवा , जीवन वाचवा , पाणी हेच जीवन , ‘सेव्ह वॉटर ,सेव्ह लाईफ’ , ‘जल है ,तो कल है …!’ , ‘टिळा होळी, उत्तम होळी’ असा संदेश दिला.
जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल ,अवगुणी आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा ,मांगल्याचा ,स्नेहाचा ,प्रेमाचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे ,हा संदेश जपत आणि कोरडी ,नैसर्गिक रंगानी होळी खेळत या सणाचे पावित्र्य राखण्याचा संकल्प करत आपल्यातील दोष जळावेत म्हणून मनापासून सर्वांना होळी या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला….!!
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर