मी अहमदनगर बोलतोय
मी अहमदनगर बोलतोय …!! 🏰
एका ऐतिहासिक शहराचे स्थापनादिनी मनोगत
नारायण चंद्रकांत मंगलारम
( एक नगरकर)
होय मी अहमदनगरच बोलतोय ,तुमच्या नगर मध्ये काय आहे ओ पाहण्यासारखे तर – “कसलं काय ? शैक्षणिक ,सामाजिक ,राजकीय ,औद्योगिक विकास नाही आमच्याकडे सगळं भकास आहे भकास .” असं नको तेवढं अभिमानाने सांगणारे पाहतो आणि मी उदास होतो , तुमच्या पैकी अनेकांसाठी मी म्हणजे 21 व्या शतकातील एक मोठे खेडे , विकासापासून कोसो दूर असणारा इतिहासात वावरणारा एक वास्तू पुरुष , चांदबीबी आजही आली तर सहज शहरातून न चुकता फेरफटका मारून येईल इतका न बदलेला. बारावी पर्यंत कसातरी शिकायचं रे ,मग राहतोय कोण या भंगार शहरात असे म्हणणारे किती तरी जण रोज पाहतो ,ऐकतो मी. अलीकडे तर निवृत्तीनंतर बरय बॉ निवांत राहायला तुमचं नगर असे म्हणणारे आणि आणखी बरंच काही काही….!
“निधड्या छातीवरती माझ्या
पडल्या वर्तमानाच्या लाथा ,
आज उमगल्यात भूतकाळाच्या
दैदिप्यमान शौर्य गाथा….!!”
भौगोलिक दृष्टीने महाराष्ट्राच्या हृदयस्थानी सीना नदीच्या काठी गर्भगिरीच्या डोंगराजवळ वसलेला मी , ५३० वर्षांचा ज्ञात इतिहास आहे माझा ….!! जगाच्या पाठीवर खूप मोजकी शहर आहेत ज्यांना आपला स्थापना दिन माहीत आहे त्या पैकी मी एक ….! वैभवाची शिखरे पाहिलेला , दैदीप्यमान इतिहासाच्या गौरवशाली खुणा अंगाखांद्यावर खेळवणारा तरी आधुनिकतेचा वारा न लागलेला मी आज ५३० वर्षांचा होतोय . मलिक अहमद निजामशहा ज्याच्या नावाने मला अहमदनगर हे नाव मिळाले हाच माझा संस्थापक , आजच्याच दिवशी भिंगार जवळ मलिक अहमद निजामशहाने बिदरचा सेनापती जहांगीर खानाचा पराभव करून या विजयाच्या स्मरणार्थ जंग बाग या ठिकाणी कोट बाग निजाम महालाची निर्मिती केली ज्याला आज आपण सगळे बाग कोट निजाम म्हणून ओळखतो , त्याच्या भवती पुढे येणाऱ्या निजामशाहीच्या वंशजांनी माझी सर्वार्थाने भरभराट केली , मध्ययुगात तर माझा नावलौकिक इतका वाढला होता की जगात कैरो आणि बगदाद या मध्य युगातील सर्वात सुंदर शहरांबरोबर माझं नाव घेतलं जायला लागलं होतं , व्यापार उदीम ,कला ,संस्कृती या सर्व बाबतीत माझी भरभराट झाली ,उत्तमोत्तम ज्ञानी ,हुशार लोक ,कलाकार , कसबी कारागीर ,अभियंते हे सुद्धा यावेळी माझ्याकडे आकर्षित झाले . वास्तूकला तर उत्कर्षाला पोहचली होती , माझ्या अंगाखांद्यावरचा अभेद्य भुईकोट किल्ला , हस्त बेहस्त महाल ,बाग ए रोजा , फराह बक्ष महाल ,सलाबत खानाची कबर ( चांदबीबी ) , दमडी मस्जिद इत्यादी अतुलनीय वास्तूंची निर्मिती निजामशाहीच्या या राजवटीने केली ….! तात्कालिक जगाच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक खापरी नळ योजने द्वारे पाणीपुरवठा , जगभरात चाललेला व्यापार ,जगभरातील उत्तमोत्तम कारागीर आणि अभियंत्यांनी माझ्या छत्रछायेत वाढणाऱ्या शहरातील या सुंदर वास्तूंचे बांधकाम केले . शंभर एकरात पसरलेला ,बावीस बुरजांसह भक्कम आणि जवळजवळ दोन किमी लांबीची तटबंदी असणारा भुईकोट किल्ला म्हणजे जगातल्या सर्वोत्तम भुईकोट किल्यांपैकी एक , त्याच्या तटबंदी बाहेरच्या खंदकाची सफाई करतांना आता आता काही वर्षांपूर्वी तुम्ही तब्बल बावीस हजार ट्रक इतका गाळ काढला त्यावरून त्याची खोली उंची रुंदी तुमच्या लक्षात येईल. बादशहा अकबराच्या पुत्राने सुरुंग लावून माझ्या तटबंदीला भगदाड पडल्यावर त्या भगदाडातुन किल्ला ताब्यात घेण्याची केलेली योजना माझी एक कर्तृत्ववान कन्या चांदबीबी हिने रात्रीतून ते भगदाड बुजवून हणून पाडलेली देखील मी पाहिलंय आणि बादशहा अकबराच्या शहजाद्याला देखील संधी करावी लागलेला प्रसंग सुद्धा माझ्याच मातीतला. अशा या अभेद्य किल्ल्याच्या मजबुतीची खात्री असल्यानेच इंग्रजांनी 1942 च्या चले जावं चळवळीतील पंडित जवाहरलाल नेहरू ,सरदार पटेल ,गोविंद वल्लभ पंत ,मौलाना अबुल कलाम आझाद ,आचार्य नरेंद्र देव आदी राष्ट्रीय नेत्यांना इथल्याच नेता कक्षात नजर कैदेत ठेवले होते , या नेत्यांच्या जवळजवळ दोन – तीन वर्षांच्या इथल्या वास्तव्यातच पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा भारताच्या ५००० वर्षाच्या इतिहासाचा ग्रंथ लिहिला हे आपल्याला माहितीये ,पण इथेच मौलाना आझाद यांनी ‘गुबार ए खातीर’ , हरेकृष्ण मेहताब यांनी ‘हिस्ट्री ऑफ ओरिसा’ तर पी सी घोष यांनी ‘हिस्ट्री ऑफ ऐंशीयन्त इंडियन सिव्हीलायझेशन’ हे ग्रंथ सुद्धा लिहिले हे तुम्हाला माहितीये का ? त्याच बरोबर स्वातंत्र्यानंतर च्या भारताच्या नवनिर्माणाच्या अनेक योजनांची या नेत्यांमधील चर्चा मी मूक पणे ऐकली देखील आहे ,अशा वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याकडे आज राष्ट्रीय सणाच्या दिवशी आणि ते ही सहज फिरायला जाण्याशिवाय कधी ढुंकून सुद्धा पाहिल्याचे आठवते का तुम्हाला …..!!
एक सुद्धा बाग धड नाही ओ आमच्याकडे असे म्हणाऱ्यांनो गुलाबांच्या ताटव्याने वेढलेल्या अष्टकोनी तलावात ,अष्टकोनी दोन मजली जलमहाल शहराच्या मध्यभागात होता तुमच्या ,आहे का आपल्या पैकी कोणाला याची कल्पना. हो हस्त बेहस्त बाग येथील फैजबक्ष महाल हा निजामशहाच्या आराम करण्यासाठी बांधलेला सुंदर जल महाल म्हणजे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना त्याची आठ दारे म्हणजे स्वर्गाचे आठ दारे म्हणून ओळखले जात होते आज काय अवस्था केली आहे तुम्ही त्याची ,त्याच्या आजूबाजूच्यानं सुद्धा माहीत नाही ही वास्तू नेमकी आहे काय …..!!
सीना नदीच्या काठी अहमद निजामशहानेच बांधून घेतलेली अतिशय देखणी आणि भव्य वस्तू म्हणजे ‘बाग ए रोज’ ज्याला आपण बागरोजा म्हणून ओळखतो , चारी बाजूने सुंदर बगीचा आणि मध्ये बांधलेल्या या सुंदर वास्तूने अहमद निजामशहाला इतका लळा लावला की आपल्या चिरविश्रांती साठी त्याने याच ठिकाणाची निवड केली , आज न भूतो, न भविष्यती अशी दुर्लक्षित आहे माझ्या संस्थापकाची ही समाधी. याच महालाच्या दरवाज्याबाहेर तालिकोटच्या लढाईचे स्मारक म्हणता येईल अशी गुलाम अली हत्तीची आणि त्याच्या माहूत पती पत्नीची कबर ज्यावर सुंदर नक्षी काम केलेली मेघडंबरी सुद्धा पाहायला मिळते , तुमच्या पैकी किती जणांनी जाऊन ती पाहिलंय हे सांगता का …..?
अहो माझे भौगोलिक स्थान सीनेच्या काठी पण उष्ण आणि कोरडे हवामान म्हणून बुऱ्हाण निजामशहाचा सरदार चंगेजखान एक जलमहाल सीनेच्याच काठी बांधला – आजूबाजूला आमराई , चौकोनी आकाराचा तलाव ,सुंदर गेंदेदार आणि सुगंधी गुलाबाचे ताटवे आणि त्याला स्पर्शून सगळे वातावरण सुगंधित करून टाकणारी हवा – असे सुंदर दृश्य कुठे विचारलं तर हे आहे फराह बक्ष महालाचे – फराह बक्ष म्हणजे नजरेला सुख देणारी वास्तू – अशीच नजरेला सुख देणारी आणि सुगंधित वातावरण ,उत्तम वायुविजन , जबरदस्त ध्वनी नियंत्रण यांमुळे अनेक मैफिली जागवलेला फराह बक्ष महाल म्हणजे मध्य युगीन इतिहासातील आपल्या पद्धतीचा जगातली अद्वितीय वास्तू होय, तात्कालिक अनेक राजे राजवाड्यांनी निजामशहाचा पाहुणचार इथे घेतला. चांदबीबी ,अकबर पुत्र मुराद , शाहजहान आणि पानिपतावर मराठ्यांच्या सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या सदाशिवराव भाऊने देखील इथला पाहुणचार स्वीकारला आहे काही दिवस इथे वास्तव्य केले आहे. आम्ही ताजमहाल पाहिला असे अभिमानाने आणि कौतुकाने सांगणारे अनेक जण असतील इथे पण किती जणांना हे माहितीये की शहाजहान बादशहाला फराहबक्ष महाल पाहूनच ‘ताजमहाला’ ची कल्पना सुचली ,असा वास्तूरचनेचा अद्भुत चमत्कार म्हणजे फराहबक्ष महाल – आज हजारो किलोमीटरवर असणारा ताजमहाल पाहणारे हजारो जण इथे आहेत पण काही किलोमीटरवर असणारा हा महाल पाहिलेले किती जण असतील शहरात , आणखी काही वर्षे त्याकडे लक्ष दिले नाही तर लवकरच तो इतिहास जमा झालेले सुद्धा दिसू शकतो इतके अक्षम्य दुर्लक्ष त्याकडे झाले आहे ….!!
सुट्टीच्या दिवशी ,रविवारी किंवा अलीकडे रोजचं सकाळी सकाळी अनेक जण चांदबीबीवर येतायत , चांदबीबी अर्थात सलाबत खानाची कबर ही एक अशीच अद्वितीय वास्तू , शहाडोंगरावर निजामशहीतल्या या कर्तृत्वावान सरदाराची ही कबर आज चांदबीबी महाल या नावाने ओळखली जाते अष्टकोनी तीन मजली वायुवीजनाचा आनंद देणारी कुठलाही ऋतूत थंडगार हवा खेळवत ठेवणारी ,भिंतीच्या मधून वरपर्यंत जाता येईल असे जिने असलेली अशी ही भव्य दिव्य वस्तू आज चारशे पेक्षा जास्त वर्षांनंतर देखील चिरेबंदी न डगमगता मजबुतीने उभी आहे ,पण आज पर्यटनाला येणाऱ्या किती जणांना तिचे महत्व माहीत आहे , तुमच्या पैकी किती जण तिची देखभाल करता किंवा नुकसान होणार नाही याची काळजी घेता …..!!
अशीच अवस्था भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीचे बांधकाम चालू असताना तिथल्या कामगारांनी आपल्या कमाईतून एका फकिरला दिलेल्या दमडी दमडी तून त्या फकिरने बांधून घेतलेल्या दमडी मस्जिदची आज आहे , निजामशाहीतील सरदार शेर खान याने ही मस्जिद बांधल्याचे देखील बोलले जाते .अप्रतिम वास्तू कलेचा नमुना ,संपूर्ण जगातल्या सर्वात सुंदर मस्जिदीपैकी एक , कॅलिग्राफीच्या कलेचा अत्युच्य नमुना असणारी ही मस्जिद नगरमध्ये नेमकी आहे कुठे ? आहे की नाही ? हे ही अनेकांना ठाऊक नाही ,हे किती मोठे माझे दुर्भाग्य ….!!
दर्गादायरा आज कोणी तिकडे फिरकत देखील नाही ,माझ्याच मातीतील या दर्ग्यात शहा शरीफ हे संत रहात होते ,त्यांची कीर्ती ऐकून केलेल्या नवसातुन मालोजी राजे भोसले यांना दोन पुत्र झाले ज्यांना त्यांनी शहाजी व शरीफजी अशी नावे दिली . एका अर्थाने मराठेशाहीची मुहूर्तमेढच इथे रोवली गेली , माझ्याच अंगणात खेळत बागडत शहाजी राजांनी निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला , त्यांच्या गनिमी काव्याच्या सुरवातीच्या प्रयोगांपैकी एक प्रयोग इथेच भातोडीच्या लढाईत शहाजी राजांनी केला ,भातोडी याच लढाईत शरीफजी राजेंना वीरमरण आलं आणि जवळच शरीफजी राजे भोसले आजही चिर विश्रांती घेत पहुडले आहेत ,याची काही कल्पना आहे का तुम्हाला. अहो हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे चुलते आहेत ते हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं बऱ्याचदा ….!!
नगर अर्बन बँकेच्या मुख्य शाखेच्या इमारतीच्या शेजारी असलेले अमृतेश्वर मंदिर आपण किती जणांनी पाहिलंय ,शेकडो वेळ त्याच्या समोरून येणे जाणे झाले असेल पण याचे ऐतिहासिक महत्व आहे का आपल्याला ठाऊक , मालोजीराजेंनी या मंदिराचे बांधकाम करून घेतले, शेजारील सरदार वाड्यावर शाहजी राजे भोसले वस्तीला असतं तर स्वारीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी देखील येथे मुक्काम केला आहे. साक्षात शिवाजी महाराजांनी आपल्या शहरातील या मंदिरात मुक्काम केला ही किती मोठी अभिमानाची बाब ,पण हे माहीत करून घेण्याची तसदी आपण कधी घेतलीत का ……?
पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई आणि एक मुलगी भवानीबाई यांना देखील माझ्या अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवासात टाकलेले आणि त्यांना सोडवण्यासाठीचे छत्रपतींच्या छाव्याचे प्रयत्न देखील मी पाहिले. तुळोजी आंग्रे , नाना फडणवीस ,सदाशिवरावभाऊंचा तोतया आणि इंग्रजी आमदनीत कोल्हापूरचे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील इथेच बंदिवासात टाकले आणि इथेच जीवनयात्रा संपत हे तरुण छत्रपती आजही माझ्याच कुशीत चिर समाधिस्त झालेत – ते सामाजिक क्रांतीचे अग्रणी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे तीर्थरूप होते हे ही तुमच्या पैकी किती जणांना माहीत आहे कुणास ठाऊक ,बरं न्यू आर्टस् कॉलेज समोर ज्यांची समाधी आहे ते हेच हे तरी आपण पाहिलंय का ….!!
शेहनशाह ए हिंद , आलमगीर अशा एक ना अनेक बिरीदावल्या लावून थोरले छत्रपती महाराजसाहेबांच्यानंतर महाराष्ट्र गिळंकृत करायला आलेला बादशहा औरंगाबाद तब्बल पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी झुंजला आणि इथेच माझ्याच सावलीत त्याने शेवटचा श्वास घेतला . कुठे म्हणून विचारता , अहो भिंगारच्या पुढे आलमगीरला. आजही औरंगाबाद बादशहाचे काही अवशेष माझ्याच मातीत विसावा घेत आहेत. इथेच औरंगाबाद बादशहाने हाताने लिहिलेली कुराणची प्रत सुद्धा उपलब्ध आहे. सबंध हिंदुस्थानावर पन्नास वर्षे राज्य करणाऱ्या औरंगाबाद बादशहाच्या या अहमदनगर संबंधाची आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे ……!!
“स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ….!” अशी सिंहगर्जना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली हे आपल्याला माहितीये ,पण ती त्यांनी माझ्याच भूमीवर कोहिनूरच्या मागे असलेल्या इमारत कंपनीच्या प्रांगणात केली हे आपल्याला माहीत नाही कदाचित , आधुनिक मराठी साहित्यातील एक महत्वाचे नाव म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि ‘स्मृतिचित्रे’ लिहिलेल्या त्यांच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई नारायण टिळक हे सुद्धा माझ्याच कुशीत समाधिस्त झालेत हे ही आपल्याला माहीत नसतं ….!!
इंग्रजांनी इंग्रजी आमदनीत सुरू केलेल्या अगदी सुरवातीच्या इंगर्जी शाळा सुद्धा नगर मध्ये होत्या ,न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडे यांच्या पुढाकारातूनच येथे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली ,ज्या संस्थेने अनेक नामवंत कलाकार , कार्यकर्ते महाराष्ट्राला दिले . अहमदनगर हे महाराष्ट्राचे जेरुसलेम म्हणून ओळखले जायचे त्यातूनच शंभर वर्षांपूर्वी ह्यूम चर्च खिस्ती गल्लीत बांधण्यात आले , हातमपुऱ्यातील पारशी अग्यारी ( अग्नी मंदिर ) आणि त्यात गेल्या एकशे साठ पेक्षा जास्त वर्षांपासून सतत पेटता ठेवलेला पवित्र अग्नी किती जणांनी जाऊन पाहिलाय….?
बेचाळीस च्या चाले जावं आंदोलनात अनेक राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या किल्ल्यात नजर कैदेत ठेवले होते पण याच बेचाळीसच्या आंदोलनात भूमिगत चळवळ चालवणाऱ्या अच्युतराव पटवर्धन आणि रावसाहेब पटवर्धन यांची जन्मभूमी नगर आहे आणि पटवर्धन चौकातच दादा चौधरी विद्यालयासमोर त्याचा राहता वाडा आहे , हे शेकडो वेळ त्या वाड्यासमोरून जाऊन सुद्धा आपण कधी पाहिलं नाही ……!!
लष्कराच्या दृष्टीने महत्वाचे ठाणे असणारा मी ते महत्व आजही टिकवून ठेवलं आहे , पण त्याबरोबरच स्वातंत्रोत्तर काळात इथे निर्माण केलेला रणगाडा संग्रहालय ,आशिया खंडातील आपल्या सारखे एकमेव संग्रहालय आहे , दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी जर्मनीचा रणगाडा बरोबरच इंग्लंड ,अमेरिका ,फ्रान्स या देशातील रंणगड्यांबरोबर पाकिस्तानचा पॅटन टॅंक आणि जालियनवाला बाग हत्याकांडातील जनरल डायरचे सिल्व्हर घोस्ट हे चिलखती वाहन देखील या संग्रहालयाची शान वाढवतोय ,नाही म्हणायला सहलीच्या माध्यमातून अनेक जण हे संग्रहालय पाहायला आवर्जून येतात हाच काय तो माझ्यासाठी आनंद …..!!
ग्रामदैवत असणारं विशाल गणपतीचे सुंदर मंदिर , आनंद ऋषी महाराजांचे आनंद धाम , अवतार मेहरबाबा यांच्या समाधीचे मेहराबाद हे ठिकाण अशा सर्वधर्मीय प्रार्थनस्थळांनी नटलेला मी , पण माझ्या या वैशिष्टपासून अनभिज्ञ असणारे तुम्ही …..!!
अशा मध्ययुगीन काळापासून तर स्वातंत्रोत्तर काळा पर्यंत ऐतिहासिक वास्तू , ऐतिहासिक व्यक्ती ,थोर राष्ट्रपुरुषांनी नटलेला मी पण याची कुठलीही कल्पना नसलेले तुमच्यापैकी अनेकजण मला कर्मदरिद्री समजतात , माझी थट्टा करतात ते पाहिलं की मला दुःख होतं , माझाच जीवावर इथे जन्मापासून वास्तव्याला असणाऱ्या तुम्हा सारख्या लाखो लोकांना या गोष्टींची माहिती नाहीये ,त्याचा गर्व तर सोडा साधा अभिमान नाही ते बाहेरच्यांना तुम्ही काय सांगाल ओ ….? पाचशे वर्षांपेक्षा जास्त काळ माझी वाटचाल पाहणाऱ्या मला अशा निष्क्रिय वृत्तीची किळस आल्याशिवाय रहात नाही , इतिहासाने पोट भरत नाही हे सत्य आहे पण इतिहास विसारणारे इतिहास घडवू शकत नाही हे ही तितकंच सत्य आहे .कोकण ,जुन्नर ते बीड दौलताबाद असा विस्तीर्ण प्रदेश आपल्या राज्यात असलेल्या अहमद निजामशहाने आपल्या राजधानी साठी ठिकाण पहात असतांनाची एक गोष्ट सांगितली जाते , माझ्या याच भूमीत त्याने एका सशामागे कुत्रा लागल्याचे पाहिले,भित्रा ससा पळून पळून पाळणार किती तेव्हा त्याची शिकार नक्की होणार असे अहमद निजामशहाला वाटले पण पुढे जाऊन पाहतो तर काय ससा उलटून कुत्र्यावर चाल करून आलेला त्याने पहिला ,मग ज्या भूमीत सशासारख्या भित्र्या प्राण्यात लढण्याचे बळ निर्माण होते त्याच भूमीत आपली राजधानी निर्माण केली पाहिजे म्हणून अहमद निजामशहा ने मला राजधानी म्हणून निवडलं,पुढे जवळजवळ दीडशे वर्षे मी महाराष्ट्राचीच राजधानी होतो,असे वैभवशाली दिवस पाहिलेल्या मला,भग्नावस्थेतील या इतिहासाच्या खुणा अंगाखांद्यावर खेळवताना तेवढे दुःख होत नाही जेवढे त्याच्या अज्ञानातून तुम्ही त्याच्याकडे केलेल्या दुर्लक्षाने होते …..!!
वर माझ्या म्हणून वैशिष्ट्याच्या काही मोजक्याच गोष्टींचा उल्लेख मी केला आहे , आज मी सर्व क्षेत्रात झपाट्याने पुढे जातोय. तुमच्या पैकी काही जण माझ्या या गुणांच्या प्रचार प्रसारासाठी सातत्याने प्रयत्न करतायेत त्याही पेक्षा माझ्यातल्या चांगल्या बाबी शोधण्याचा प्रयत्न करतायेत आज स्थापना दिनाच्या निमित्ताने का होईना पण तुम्हाला माझी आठवण आली , हे पाहून म्हणावे वाटते ,
” होऊ द्या किती गाव वेगळे
किती देश अन नाव वेगळे
मी माझ्यामधला अटल भगीरथ
किती कराल जरी राज वेगळे….
विसरला कुणी जो इतिहास कालचा,
आठवण माझी त्याला द्याल का?
एक नगरात भविष्य जागण्या
आज त्याचा वेध घ्याल का?
अलीकडे माझ्याकडे पाहण्याचा तुमचा बदलता सकारात्मक दृष्टिकोन पुन्हा एकदा माझी प्रगतीच्या दिशेने वाटचालीची आशा दाखवणारा वाटतो , सगळे एकत्र या , स्वतःच्या या जन्मभूमीचा , कर्मभूमीचा अभिमान बाळगा येणारा काळ पुन्हा एका नव्या इतिहासाच्या सोनेरी पानासह आपली सर्वांची वाट पाहतोय .माझी ,तुमची आपली , चला तर मग पुन्हा एकदा तुमच्या आपल्या अहमदनगर शहराला वैभवशाली दिवस दाखवूया…..!!
🖋️ नारायण चंद्रकांत मंगलारम
२८ मे २०२०
( २८ मे २०२० रोजी अहमदनगर शहराच्या स्थापनेला ५३० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने या ऐतिहासिक शहराचे मनोगत मांडण्याचा एक प्रयत्न ….!!)