एक वही, एक पेन, पूरग्रस्त मुलांसाठी
एक वही ,एक पेन ,पूरग्रस्त मुलांसाठी…
कोल्हापूर ,सांगली या भागात आलेल्या आस्मानी संकटाने लाखो लोक बाधित झाले ,गावेच्या गावे वाहून गेली. घरे – दारे , शेती – भाती गेली तिथे शाळा ,दप्तर आणि चिमुकल्यांच्या वह्या पुस्तकांची काय गत….!
पूर ओसरून हळू हळू या भागातील जनजीवन सुस्थिर होत असतांना भिजलेले दप्तर ,वह्या आणि पुस्तके ही या चिमुकल्याच्या शिक्षणाच्या वाटेतील सर्वात मोठी समस्या ठरू पहात आहे.शासनाने आपल्या स्तरावरून मोफत पाठ्यपुस्तके पूरवण्याचा निर्णय तर घेतला आहेच पण तरीही वह्या ,पेन आणि दप्तरांची समस्या आहेच ,त्यांची हीच समस्या ओळखून तिथल्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वही देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे ‘एक वही , एक पेन ,पूरग्रस्त मुलांसाठी’ या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
पूरग्रस्त भागातील छायाचित्रे ,व्हिडिओ टीव्हीवर ,वर्तमानपत्रात आणि आपल्या पालकांच्या मोबाईलवर मुले पाहताच होती ,त्यांच्या दैनेची चर्चा आज महाराष्ट्राच्या घरा घरात चालू आहे ,अशा या संकट समयी आपल्या देशाचे बांधव म्हणून लाखो हात सारसावल्याचे ही विद्यार्थी एकतायेत पाहतायेत ,मग आपणच का मागे राहावे ? म्हणून मग विद्यार्थ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निश्चय मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत सर यांच्याकडे व्यक्त केला ,त्यातून विद्यार्थ्यांना काल परवाच्या रक्षाबंधन सण आणि इतर निमित्ताने काका – मामांकडून मिळालेल्या खाऊच्या पैशातून पूरग्रस्त भागातील आपल्या या चिमुकल्या बांधवांच्या मदतीला धावून जायचे असा निश्चय केला आणि ,
‘एक वही ,एक पेन पूरग्रस्त विद्यार्थ्यांना देऊ ,
या चिमुकल्याना शिक्षणाच्या प्रवाहात घेऊ …!!’
असे म्हणत ,’ एक हात मदतीचा … एक हात माणुसकीचा ….!!’ पुढे करत फक्त 38 विद्यार्थी संख्या असणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांनी 100 वह्या आणि 100 पेन हे शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त भागातील विद्यार्थी मित्रांसाठी मिळवले.आज हे साहित्य विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव ,ग्रामपंचायत सदस्य सीताराम जाधव ,महेश तरवडे ,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव यांच्या मार्गदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांच्या कडे जमा केले. आपल्या मदतीने पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार हे पाहून विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.जिल्हा परिषदेच्या शाळा या माणूस घडवणाऱ्या शाळा आहेत ,आणि आज या महापुरामुळे माणुसकीचे दर्शन घडवण्याची आवश्यकता आहे म्हणून इतरही शाळांनी याचे अनुकरण करावे व अधिकाधीक मदत या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळवून द्यावी…!’ असे आवाहन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत यांनी केले
विद्यार्थ्यांच्या मधील माणुसकीचा झरा चेतवणारा हा उपक्रम असून ,जमा केलेले हे साहित्य योग्य ठिकाणी पोहोच केले जाईल ,आज या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवूनच नव्हे तर सोबत अशी छोटीशी मदत करून लढ म्हणण्याची वेळ आहे . आपल्या प्रत्येकाचा खारीचा वाटा हा या चिमुकल्यानी उद्याची अशा दाखवणारा असेल …..!!
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर