पतंग बनवू चला आणि तीळगूळ घ्या ,गोड गोड बोला
लहानपणी माझा सगळ्यात आवडता सण कुठला असे जर कोणी मला विचारले असते तर तेव्हाचे उत्तर नक्कीच ‘मकर संक्रांती’ हे असते ,त्याला कारणही तसेच आहे – आमच्या नगर मध्ये संक्रांतीला मोठया प्रमाणात पतंग उत्सव सुद्धा असतो आणि मला तेव्हा ही आणि आजही पतंग उडवायला खूप आवडतो ,तेव्हा तर त्याची रंगतच न्यारी असायची ,नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्या की आम्ही पतंगाला लागणार मांजा बनवायला लागायचो ,लहानपणी आता सारखा तयार मांजा मिळायचा नाही किंवा जो मिळायचा तो परवडायचा नाही तेव्हा स्वतःच मांजा बनवायचा आणि काही काही ,खूप आठवणी …..!!
आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे उद्या मकर संक्रांत आणि पुन्हा पतंगोत्सव म्हणून आज आम्ही आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी येथे पतंग बनवू चला हा उपक्रम आयोजित केला होता ,शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना परिपाठातच संक्रांतीचे भौगोलिक ,अध्यात्मिक महत्व सांगितले ,सूर्याचे संक्रमण ,उत्तरायण ,मकर राशीतील प्रवेश ,सुदृढ आरोग्यासाठी तीळ आणि गुळाचे महत्व आणि गुजरात सह भारताच्या बऱ्याच भागात साजरा केला जाणार पतंगोत्सव हे सगळं ऐकल्यावर दुपारच्या सत्रात लेकरांनी सुद्धा उत्साहाने पतंग बनवायला सुरवात केली …..!!
आणि दुसरीकडे मुख्याध्यापक श्री राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी तिळाचे अतिशय चवदार आणि आकर्षक लाडू बनवले ,अगदी इयत्ता दुसरीच्या स्वरांजली जाधव हिनेही खूप मस्त लाडू बनवले ,किंबहुना सगळ्यात चांगले लाडू बनवले .आणि इकडे पतंगाच्या आघाडीवर मुलेही भिडली होती ,पतंगाचा ताव कागद ,कामट्या आणि डिंक यांचा वापर करून वेगवेगळ्या आकाराचे सुंदर पतंग मुलांनी पटापट बनवले ,इतक्यात मुलीही आपले लाडू बनवून आल्या आणि त्यांनीही पतंग बनवायला सुरवात केली …..!!
रंगीबेरंगी सुंदर ,आकर्षक पतंग तयार झाले ,मग कोणी तरी म्हणाल सर त्याला आपण डोळे लावू ,आणखी कोणी म्हणालं की त्याला शेपटी लावू ,आणखी कोणी म्हणाल आपण पतंगावर संदेश लिहू ….!!
मग पतंगाला डोळे आले ,शेपटी आली आणि संदेशाने पतंगे सजली ,संदेशही किती छान छान – ‘झाडे लावा ,झाडे जगवा’ , ‘ज्ञानाचा दिवा ,घरोघरी लावा’ , ‘मुलगा मुलगी एक समान ,दोघांना ही शिकवू छान ‘ , ‘स्वच्छ भारत ,सुंदर भारत’ , ‘मुलगा वंशाचा दिवा आहे ,तर मुलगी सुद्धा पणती आहे’ , ‘शौचालय बाधा घरोघरी ,आरोग्य नांदेल दारोदारी’ , ‘लेक वाचवा ,लेक शिकवा’ आशा अनेक संदेश घेऊन विद्यार्थी पुढे येत होते ….!!हे सगळे पाहून मला सहावीच्या जुन्या पुस्तकातील आर्यांची कविता आठवली ,
‘पतंगा रे पतंगा ,किती तुझे रंग,
आणि किती मऊ मऊ तुझे अंग’
मग शेवटी स्वतः बनवलेले पतंग विद्यार्थ्यांनी सोबत नेले उडवण्या साठी आणि मुलींनी ‘तिळगुळ घ्या ,गोड गोड बोला….!’ असे म्हणत एकमेकींना तिळाचे पौष्टिक लाडू भरवले ,मुलांना सगळ्यांना खायला दिले ….!!
आशा प्रकारे दफ्तरमुक्त सोमवारची दुपार विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदात आणि उत्साहात सत्कारणी लावली ,शाळेच्या वतीने सगळ्यांना मकर संक्रांती च्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि शाळा सुटली …..!!
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी , जि अहमदनगर