चला सूर्यग्रहण पाहूया
चला सूर्यग्रहण पाहूया …
सूर्यग्रहण ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण भौगोलिक घटना असून तिच्या भोवती अनेक समज -गैरसमज समाजात पसरले आहेत ,हेच गैरसमज दूर होऊन ,चिमुकल्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे ‘चला सूर्यग्रहण पाहूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जरेवाडी जि प शाळा आष्टी ,बीड येथील उपक्रमशील शिक्षक प्रवीण शिंदे यांच्या सहकार्याने आम्ही मागच्या आठवड्यातच हे सूर्यग्रहण पाहण्याचे विशेष गॉगल मिळवले होते आणि अत्यंत उत्सुकतेने आम्ही आज विद्यार्थ्यांना शाळेत खास ग्रहण पाहण्यासाठी एक तास आधी म्हणजे सकाळी 9.30 पूर्वीच येण्याची सूचना केली ,त्या प्रमाणे आमचे चिमुकले 9 वाजल्यापासूनच अत्यंत उत्सुकतेने ग्रहण पाहण्यासाठी शाळेच्या परिसरात जमा व्हायला लागले.
पण सूर्याला जसे चंद्राचे ग्रहण लागले तसे आजच्या या सुर्यग्रहणाला झाकोळल्या अभाळाचेच ग्रहण लागले जणू ,9.30 ते 10 वाजे पर्यंत अजिबात संधी न देणारे हे आभाळ 10 च्या पुढे थोडे थोडे कुठेतरी संधी निर्माण करून देत होते . 10.30 ते 10.50 च्या दरम्यान आमच्या शाळेच्या प्रांगणातून आम्हाला तीन चार वेळा काही सेकंदांसाठी का होईना आभाळ हाटून हे ग्रहण पाहण्याचा योग जुळून आला.
अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज असणारी ही भौगोलिक घटना पाहून आमचे चिमुकले विद्यार्थी हरखून गेले. रोज गोल दिसणारा सूर्य कसा चंद्रासारखा कोरित दिसायला लागला याचे तुलना आश्चर्य वाटायला लागले.
“चंद्राची पृथ्वीभोवतालची कक्षा थोडी लंबवर्तुळाकार असल्याने, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सतत थोड्याफार प्रमाणात बदलत असते. याचा परिणाम म्हणून चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा आकारही (कोनीय माप) बदलत असतो. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असताना चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये एका रेषेत आल्यास चंद्राचे कोनीय माप हे सूर्यापेक्षा लहान झाल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. त्यामुळे चंद्रामागे झाकल्या गेलेल्या सूर्यबिंबाचा आकार बांगडीसारखा दिसतो. या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.” अशी माहिती उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांनी दिली.
“सूर्यग्रहण ही एक भौगालिक आणि नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे समज गैरसमज दूर सारून लोकांनी मोठ्या प्रमाणात सूर्यग्रहण पहायला पाहिजे ,भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी अशा घटना म्हणजे एक सुवर्णसंधी आहे.”
“सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याने ग्रहणाचे चष्मे लावूनच, किंवा सूर्यबिंबाचे आरसा वापरून प्रतिबंबाचे भिंत किंवा पडद्यावर प्रक्षेपण करून पाहणे निर्धोक असते, त्यामुळे विशिष्ट काळजी घेऊन कोणतीही भीती न बाळगता या भौगोलिक व नैसर्गिक दुर्मिळ योगाचा अनुभव घ्या ,आपण खास हे सूर्यग्रहण पाहण्याचे चष्मे आणले आहेत त्याने ग्रहण पाहून आनंद घ्या ,ज्ञान मिळवा ” असे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना सुर्यग्रहणाविषयी ही शास्त्रीय माहिती सांगून त्यांना खास गॉगल चा वापर करून सूर्यग्रहण दाखवण्यात आले.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर