जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी , ता राहुरी येथे वाचन प्रेरणा पर्वाचे आयोजन : पहिला संवाद : अंजलीताई अत्रे यांच्याबरोबर…..!!
“पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते आणि सुधारलेलं मस्तक हे कोणा पुढे सुद्धा नतमस्तक होत नसतं….!!” या एका वाक्यातच वाचनाचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केलेलं आहे. पुस्तकासारखा मित्र नाही आणि आत्मविश्वासासारखा गुरू नाही, याच अनुषंगाने विद्यार्थी आणि पुस्तकांची मैत्री व्हावी या हेतूने दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपल्या महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ औचित्याने आम्ही आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी, तालुका राहुरी येथे ‘वाचन प्रेरणा पर्वाचे’ आयोजन केले होते. या पर्वाच्या पहिल्या भागात आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी दुरदृश्य आभासी प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालसाहित्यिका आणि अनेक मालिकांमध्ये अभिनय केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री अंजली अत्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
“मोबाईल किंवा इतर तांत्रिक साधनांचा वापर वाढला असला तरी, आपले खरे मित्र पुस्तके आहेत. माझ्या आजीला गोष्टी मोठमोठ्याने वाचून दाखवत दाखवत मला वाचनांची आवड लागली आणि पुढे मुलींसाठी केलेल्या ‘मिठाचा शोध’ या गोष्टीचा लेखनातून सुरू झालेले माझे लेखन बहरत गेले. आज माझी मुलांसाठी सात पुस्तके प्रकाशित आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाला खरा आकार वाचन देते, तेव्हा विद्यार्थ्यांनी गोष्टी, चरित्रे, माहितीपर पुस्तके असे भरपूर वाचन आणि कल्पना विस्तार सदृश लेखन केलं पाहिजे….!!” असे अंजली अत्रे म्हणाल्या. त्या भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी, ता राहुरी, जि अहमदनगर येथे आयोजित वाचन प्रेरणा पर्वात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बोलत होत्या.
डॉ कलाम भारताच्या सर्वदूर दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील एका गरीब कष्टकरी अश्या मोठ्या कुटुंबातील सदस्य, त्यांना वर्तमानपत्र वाटप करता करता कशी त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली, त्यातून त्यांना अनेक गोष्टींचा कसे ज्ञान मिळत गेले, पायलट होण्याचे स्वप्न ते भारतीय अग्निबाणांच्या मोहिमेचे प्रमुख आणि पुढे भारताचे राष्ट्रपती पदापर्यंतची त्यांची वाटचाल हे सगळं आणि यातून ‘वाचन प्रेरणा दिनाचे’ महत्व, डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची बालपणीची जडणघडण उदाहरणसह गोष्ट रुपात सांगत या संवादाची सुरवात झाली. कलाम चाचांच्या बालपणीच्या आठवणी सांगतांना अंजली ताईंनी मुलांना ‘अग्निपंख’ हे कलम साहेबांचे आत्मचरित्र आणि रॉकेटचे मॉडेल ही दाखवले व रॉकेट कशा पद्धतीने लॉन्च होते, त्या क्षेत्राची आवड त्यांना कशी निर्माण झाली, त्यात त्यांनी कोणकोणती भर घातली याचीही खूप छान माहिती गोष्टींच्या रुपात सांगितली. डॉ कलामांच्या जीवनातील पुस्तकांचे महत्व, त्यांना असलेली पुस्तक वाचनाची आवड आणि आपण साजरा करत असलेला वाचन प्रेरणा दिन याचीही छान सांगड घातली.
पुढच्या टप्प्यात तुम्हाला वाचनाची आवड कशी लागली ? तुम्ही आतापर्यत कोणकोणती पुस्तके वाचली ? तुमचे आवडते लेखक कोण ? तुम्हाला लेखिका व्हावंसं का वाटलं ? तुम्ही लेखनाकडे कशा वळल्या ? तुम्ही कोणकोणती पुस्तके लिहिली आहेत ? अश्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या एक न अनेक वाचन लेखनाशी संबंधित प्रश्नांबरोबरच तुम्ही शाळेत लेखन करायच्या का ? तुमच्या लहानपणीची एखादी मजेशीर आठवण असे गंमतीशीर प्रश्न ही विद्यार्थ्यांनी ताईंना विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे अतिशय मिश्किल पद्धतीने, हसतमुख चेहऱ्याने सोप्या, सुंदर, सहज आणि मुलांना समजेल अश्या भाषेत उत्तर देत तब्बल दीड वर्षे शाळेपासून आणि औपचारिक शिक्षण, आपले मित्र मैत्रिणींपासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांना खुश करत अंजलीताईंनी हा संवाद खुलवला.
“आपल्या पाठ्यपुस्तकात ज्यांचा धडा आपण अभ्यासतो, त्या एका धड्याच्या लेखिकेने आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद आणि वाचनाचे सांगितलेले महत्व नक्कीच त्यांच्यात वाचनाची प्रेरणा निर्माण करेल आणि भविष्यात हे विद्यार्थी उत्तम वाचक आणि त्याच बरोबर चांगले लेखक होतील असा मला विश्वास आहे ….!!” असे वर्गशिक्षक नारायण मंगलारम म्हणाले.
यावेळी शाळेचे विद्यार्थी पृथ्वीराज जाधव आणि स्वरांजली जाधव यांनी सुंदर असे भावगीत गायन करून वातावरण प्रसन्न करून टाकले तर, योगेश गव्हाणे याने अंजली ताईंचे आभार मानले. प्रेरणा पर्वातील हा संवाद यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत, अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव, व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश जाधव, शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत जाधव, सार्थक जाधव, कृष्णा जाधव आदींनी परिश्रम घेतले. पत्रलेखन आणि इतर माध्यमातून ताईंनी शाळेशी संपर्क ठेवण्याचा व भविष्यात कधीतरी शाळेला भेट देण्याचा शब्द देत कार्यक्रमाची सांगता झाली. प्रत्यक्ष संवाद पाहण्यासाठी खालील 👇🏻👇🏻👇🏻लिंकला स्पर्श करा ……!!