गोपाळवाडी शाळेत ‘जागतिक वन्यजीव दिन’ साजरा
‘वन्यजीव आणि वनस्पतींचे संरक्षण ही काळाची गरज’
गोपाळवाडी शाळेत ‘जागतिक वन्यजीव दिन’ साजरा
आज ३ मार्च अर्थात जागतिक वन्यजीव दिन , त्यानिमित्ताने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडीच्या युनेस्को स्कूल क्लबच्या वतीने शाळेत ‘वर्ल्ड वाइल्डलाईफे डे’ चे आयोजन करण्यात येऊन त्यात विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाची माहिती देण्यात आली.
युनायटेड नेशन जनरल असेंम्बली ( युएनजीए ) च्या ६८ व्या अधिवेशनात २० डिसेंबर २०१३ रोजी , ज्या दिवशी वन्यजीव प्राणी ,पक्षी आणि वनस्पती संरक्षण आणि संवर्धनाचा ठराव युएनजीए मध्ये संमत करण्यात आला तोच ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव युएनजीए मध्ये १९७३ साली ३ मार्च रोजीच जागतिक वन्यजीव प्राणी ,वनस्पती संरक्षण आणि संवर्धनासंदर्भात लोकजागृती करण्यासाठी संमत करण्यात आला होता. जागतिक वन्यजीव दिन हा आता जगातील वन्यजीव संवर्धनासंदर्भातील अत्यंत महत्वाचा दिवस ठरत आहे.
यंदाच्या वर्षीचा जागतिक वन्यजीव दिन हा , जगातील जैवविविधतेचे मुख्य घटक म्हणून सर्व वन्य प्राणी आणि वनस्पती प्रजातींचा समावेश करून , ‘पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन टिकवून ठेवणे’ या थीम अंतर्गत यंदाच्या वर्षीचा जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जात आहे .
“पृथ्वी ही अगणित , मोजता येणार नाही इतक्या सजीव प्राणी आणि वनस्पतींचे निवासस्थान आहे ,ही जैव विविधता अब्जावधी वर्षांपासून टिकून आहे आणि आपल्याला आणखी सुरक्षित जीवन जगायचे असेल तर ही विविधता टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे ” असे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
“गेल्या सहा महिन्यात जगात दोन मोठे भीषण असे वणवे पेटले होते ,अमेझॉनच्या जंगलाला आणि ऑस्ट्रेलियातील जंगलाला आग लागली आणि त्यात करोडो वन्यजीव जळून भस्मसात झाले , कित्येक दुर्मिळ प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती नष्ट झाल्या ,ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे , आणखी काही वर्षे मानवाला पृथ्वीवर राहायचे असेल तर आपल्याला या वन्यजीव आणि वनस्पतींचे एकंदरीतच पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या सजीवांचे रक्षण करावे लागणार आहे ,ही आपली जबाबदारी आहे.” असे नारायण मंगलारम म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी वाघ ,सिंह ,हत्ती ,जिराफ ,कोल्हा ,माकड ,ससा ,कासव , गाय ,बैल , म्हैस ,मोर , फुलपाखरू ,मासा आदी अनेक वन्य जीवांचे मुखवटे आणि फिंगर पपेट घालून त्यांची ओळख आणि जीवन चक्रातील त्यांचे महत्व सांगितले. श्रावणी हापसे ने पृथ्वी वाचवा संदेश देण्यासाठी पृथ्वीचा मुकुट डोक्यावर धारण केला होता ,तर सार्थकने पृथ्वीच्या वाढत्या तापमानाची जाणीव करून देणारा मुकुट डोक्यावर घातला होता.
प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडली तर पृथ्वी पुन्हा नंदनवन होईल म्हणून आपल्यापरीने आपण वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता झाली.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर