‘बालिका दिन अर्थात करूया लेकीचा सन्मान…!!’
आज 3 जानेवारी आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती , जो दिवस आपण ‘बालिका दिन’ म्हणून साजरा करतो ,त्यानिमित्ताने आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी ,जि अहमदनगर येथे ‘ लेक वाचवा ,लेक शिकवा ‘ अभियानांतर्गत ‘करूया लेकीचा सन्मान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली ,सर्वप्रथम आमच्या शाळेची स्टार बाल कलाकार प्रियांका प्रमोद हापसे हिने ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ हे एकपात्री सादर करून ,सावित्रीबाईंना मुलींची शाळा काढतांना आणि मुलींना शिकवताना काय काय अडचणी आल्या आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढून यश मिळवले हे सांगितले.
सावित्रीबाईच्या कर्तृत्वाने ,त्यागाने आज समाजजीवनाच्या सर्वच अंगात महिला पुढे आहेत अशाच काही विशेष महिलांच्या वेशभूषा सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी आज सादर केल्या ,त्यात विजया बाबासाहेब जाधव हिची जेष्ठ समाजसेविका सिंधू ताई सपकाळ ,एकता दीपक गायकवाड हिची झाशीची राणी लक्ष्मीबाई ,स्वरांजली रमेश जाधव हिची गाणंकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर ,चिमुकल्या मंजू दत्तात्रय हापसे ची जगत सुंदरी ऐश्वर्या राय यांनी सर्वांच्याच टाळ्या मिळवल्या .
” आज जरी मुली सहज शाळेत येत असतील आणि महिला सुद्धा सर्व क्षेत्रात पुढे जात असतील तरी ,सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंनी दिडशे वर्षांपूर्वी केलेले धाडस खूप मोठे होते ,त्या साठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले ,लोकांची बोलणी खावी लागली ,वेळप्रसंगी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या लोकांनी ,पण ते हटले नाही डगमगले नाहीत आणि त्याचेच फलित आज आपल्याला सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे दिसते .मुली आज मुलांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत ,मुलगा हा वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही दोन्ही घरांना प्रकाश देणारी पणती आहे ,तेव्हा आपण लेकीचा यथोचित सन्मान केला पाहिजे म्हणून हा विशेष कार्यक्रम आपण आयोजित केला आहे ” असे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले.
यावेळी स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी ,स्त्रीविषय प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि ‘करूया लेकीचा सन्मान’ उपक्रमांतर्गत गावातून प्रभात फेरी काढून सर्व मुलींच्या नावाच्या पाट्या त्यांच्या घरावर लावण्यात आल्या व मुलींचे औक्षण करण्यात आले. याप्रसंगी ‘लेक वाचवा ,लेक शिकवा’ ‘save girl child’ असा संदेश देणारा चेहरा रंगवलेला आकाश आसाराम काळापहाड व ‘बेटी बचाओ’ चा मुकुट घातलेली श्रुती गणेश गायकवाड हे विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते .
याप्रसंगी अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव ,मदतनीस छाया कुर्हे यांच्यासह मोठ्यासंख्येने पालक उपस्थित होते.
क्षणचित्रे https://youtu.be/fyIwAjGSESs
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर