70 वा भारतीय राष्ट्रगीत दिन
70 वा भारतीय राष्ट्रगीत दिन
24 जानेवारी 2020
‘जनगणमन – अधिनायक जय हे ,
भारत भाग्यविधाता ।
पंजाब , सिंधू ,गुजरात ,मराठा ,
द्राविड ,उत्कल ,बंग ….
हे आपले राष्ट्रीगीत ऐकले की अभिमानाने ज्याचे ऊर भरून येते ,ज्याच्या अंगात वीरश्री संचारत ,धमन्यामधील रक्त सळसळायला लागत आणि कुठे ही ,कसे ही असलो तरी पटकन सावधान अवस्थेत उभे रहातो तोच सच्चा भारतीय ,नाही का….?
पण या राष्ट्रगीताचा इतिहास आहे का आपल्याला माहिती ? तर नोबेल पारितोषिक विजेते कवी आणि भारताचे थोर तत्त्ववेत्ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 साली मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘भारतो भाग्य विधाता’ या गीतावर संस्कृत भाषेचे संस्कार करून लिहिलेल्या ‘भारत भाग्य विधाता….’ मधील पाहिले कडवे आपल्या संविधान सभेने आजच्याच दिवशी म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी अधिकृतपणे भारताचे ‘राष्ट्रगीत’ म्हणून जाहीर केले. स्वतंत्र भारताला स्वतःच्या अस्मितेची जाणीव करून देणारे आपल्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक असणारे हे राष्ट्रगीत 52 सेकंदात म्हणण्याचा प्रघात आहे आणि कलकत्ता येथे 1911 साली भरलेल्या ‘राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात’ ते सर्वप्रथम जाहीर व्यासपीठावर गायले गेले.
प्रत्येक शाळेत शालेय दिनक्रमची सुरवातच राष्ट्रगीत गायनाने होते ,तसेच सर्व सरकारी कार्यालयात राष्ट्रीय सणांच्या दिवशी आदराने आणि सन्मानाने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत राष्ट्रीगीत गायन केले जाते ,नोव्हेंबर 2016 पासून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चित्रपट गृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य आहे .
तर असा इतिहास असणाऱ्या आज आपल्या राष्ट्रगीताचा आज ’70 वा भारतीय राष्ट्रगीत दिन’….!! त्यानिमित्ताने आज 24 जानेवारी 2020 रोजी आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी ,जि अहमदनगर येथे आपल्या भारताच्या राष्ट्रगीत दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी सर्वप्रथम राष्ट्रीगीत गायन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. “आपले राष्ट्रगीत म्हणजे आपला अभिमान आहे ,कधीही आणि कुठल्याही वेळी आपले राष्ट्रीगीत ऐकले की आपल्यामध्ये देशभक्ती संचारते ,सगळ्या भारताला एका सूत्रात जोडणारी जी राष्ट्रीय प्रतीके आहेत त्यापैकी एक म्हणजे आपले राष्ट्रगीत त्याचा आपण योग्य मान राखला पाहिजे.” असे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले.
“सुजलाम ,सुफलाम भारत भूमीचे इथल्या संस्कृती ,भाषा आणि प्रदेशाचा गौरव करणारे असे हे राष्ट्रगीत आहे ,गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1911 साली लिहिले आणि 1950 ला त्याला अधिकृतपणे ‘भारताचे राष्ट्रगीत’ म्हणून मान्यता मिळाली. एकूण चार कडव्यांचे असणाऱ्या ह्या राष्ट्रगीतातील मात्र फक्त पाहिले कडवे जाहीर म्हणण्याची प्रथा आहे ,राष्ट्रीगीत गायन चालू असताना अजिबात हालचाल न करता सावधान अवस्थेत उभे राहून आपण राष्ट्रगीताचा यथायोग्य मान राखला पाहिजे.” असे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम हे म्हणाले.
यावेळी भारतीय तिरंगी ध्वज आपल्या चेहऱ्यावर रंगवून घेणारे आणि ‘मेरा भारत महान ,जय हिंद’ असे संदेश देणारे सार्थक बाबासाहेब जाधव ,निलेश विठ्ठल कुर्हे आणि साईराज महेश तरवडे हे विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते .
यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,उपसरपंच सीताराम जाधव ,राजू जाधव अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव ,छाया कुर्हे यांच्यासह पालक उपस्थित होते. आपल्या राष्ट्रगीताचा माहिती आणि अभिमान जागवणारा हा कार्यक्रम ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीत गायनाने संपन्न झाला.
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर