National Teacher Award Winner 2020 - Smart use of Technology in school education

“जगण्याचे व लढण्याचे बळ देणाऱ्या अटलजींच्या कविता ….!!”

General 952

“जगण्याचे व लढण्याचे बळ देणाऱ्या अटलजींच्या कविता ….!!”

           माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्वातंत्रोत्तर भारताच्या इतिहासातील  सहस्रकातील एक रत्न होते.आपल्या अमोघ वाणी ,स्पष्ट विचार आणि दुरदृष्टिपूर्ण निर्णयाने दिलेले त्यांचे योगदान देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. संवेदनशील, कवी मनाचे असलेल्या अटलजींनी देशहितासाठी प्रसंगी वज्राहून कठोर निर्णय घेतले.

          भारतमातेच्या भूमीवर या सहस्रकात ज्या नररत्नांनी जन्म घेतला त्यापैकी अटलजी एक होते. ते संत मनाचे, संवेदनशील हृदयाचे, देशासाठी प्रसंगी कणखर भूमिका घेणारे, कवी मनाचे, हिमालयापेक्षा उत्तुंग कर्तृत्व असलेले, अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. देशासाठी सर्वांना एकत्र करुन देशाच्या सर्वांगिण विकासाचा विचार त्यांनी केला. देशाच्या प्रगतीचा ध्यास अखंड बाळगला. देशाच्या विकासातील त्यांचे खूप मोठे योगदान आहे.

          ‘भारत जमीन का तुकडा नही, जीता जागता राष्ट्र पुरुष है’ असे श्रद्धेय अटलजी नेहमी म्हणायचे. त्यांचे विचार देशावर प्रेम करणाऱ्या भारतमातेच्या सुपूत्रांसाठी प्रेरणादायी ठरतील.

          शांतता प्रिय सहजीवनाचा पुरस्कार करणारा भारत देश हा स्व संरक्षणासाठी कोणावरही अवलंबून नाही तर तो स्वतः जगातील एक अण्वस्त्रधारी देश आहे हे भारताने जगातील महासत्तांचा विरोध असतानाही 1998 ला पोखरण येथे केलेल्या परमाणू चाचणीतून दाखवून दिले ,आणि त्यासाठीची खंबीर आणि कणखर भूमिका होती श्रद्धेय अटलजी यांचीच.

          ‘हम लडेंगे और जितेंगे भी’ असे म्हणत त्यांनी पाकिस्तानच्या कुरपतींवर मात करत भारताला कारगिलच्या युद्धात विजयश्री मिळवून दिली. त्या नंतरही दक्षिण आशियात शांतता नांदावी ,भारताचे आपल्या शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारावे या साठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले.

            बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या अटलजींनी आपल्या ऐन तरुण्यातच आपले समग्र जीवन देशसेवेसाठी वाहून घेण्याचा निश्चय केला आणि तो तसा पाळला ही, जनसंघाच्या रूपाने राजकारणात प्रवेश केलेल्या अटलजींनी जनता सरकारच्या काळात ‘विदेश मंत्री’ म्हणूनही आपल्या कामाची छाप सोडली होती. त्यांच्या वक्तृत्वाची प्रभाव साक्षात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही पडला होता .पंडितजींनी , ‘हा तरुण एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल.’ असे भाकीत केले होते जे अटलजींनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवून खरे करून दाखवले.

            देशसेवा ,समाजकारण ,राजकारण आणि त्यातील मोठं मोठी पदे उपभोगल्यावरही अटलजींच्या मूळ पिंड जो आहे तो एक संवेदनशील ,हळवा कवीचा होता .त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने जशा अनेक सभा जिंकल्या तशाच त्यांनी आपल्या कवितांनी ही अनेकांना जगण्याचे ,लढण्याचे बळ दिले ,प्रेरणा दिली.असे असतांनाच त्यांच्यातील कार्यकर्ता आजूबाजूची परिस्थिती पाहून लगेच विद्रोह ही करतो ,

              ‘पंन्द्रह अगस्त का दिन कहता – आझादी अभी अधुरी है ।,

                सपने सच होने बाकी है ,राखी की शपथ न पुरी है ।”

             त्यांच्या ‘पंन्द्रह अगस्त’ या कवितेतील विद्रोह मला अगदी अण्णाभाऊंच्या ‘ये आझादी झुठी है ,देश की जनता भूकी है’ ची आठवण करून देणारा वाटतो.त्यातच पुढे अटलजी म्हणतात ,

               ‘जिनकी लाशो पर पग धर कर आझादी भारत में आई ।,

                वे अब तक है खानाबदोश गम की काली बदली छाई ।’

           स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे सर्वसामान्य अजूनही त्या खऱ्या स्वातंत्र्यापासून वंचित आहेत हेच अटलजींनी या कवितेतून म्हणायचे आहे असे मला वाटते.

            वरच्या कवितेत स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती पाहून उद्विग्न झालेले अटलजी ,

   ‘आओ फिर से दिया जलाए ,

    भरी दुपहरी में अंधियारा ,

    सुरज परछाई से हारा ,

    अंतरतम का नेह निचोडे ,

    बुझी हुई बाती सुलगाए ,

    आओ फिर से दिया जलाए.”

                या आपल्या ‘आओ फिर से दीप जलाए’ या कवितेच्या माध्यमातून आशावाद व्यक्त करतांना आपण पुढाकार घेऊन हा अंधकार दूर करण्यासाठी एक दिवा पेटवण्याची अपेक्षा व्यक्त करतात ,नवभारताच्या निर्माणसाठी हे खूप आशावादी असे स्वप्न अटलजी आपल्या या कवितेतून दाखवतात.

        ‘बाधाए आती है आए ,

         घिरे प्रलय की घोर घटाए ,

         पावो के नीचे अंगारे ,

         सिर पर बरसे यदी ज्वालाए ,

         निज हाथो में हसते हसते ,

         आग लागाकर जलना होगा ,

        कदम मिलाकर चलना होगा…!’

                कितीही संकटे ,समस्या आल्या तरी घाबरून हताश होऊन बसू नका तर एक एक पाऊल टाकून चालत रहा हा विश्वास अटलजी वरील काव्य पंक्ती मधून देतात.देशा समोर असलेल्या अडचणींचा डोंगर पार करण्याची ताकत जसे हे शब्द देतात तसेच जगण्याची शक्ती ही वृद्धिंगत करतात.पुढे ते आपल्या शब्दांवरील प्रभुत्व सिद्ध करतांना अत्यानंदात हरळून जाऊ नका आणि दुःखाने व्यथित होऊ नका हे सांगतांना म्हणतात ,

       ‘उजियारे मे अंधकार में ,

       कल कहार मे ,बीच धार में ,

       घोर घृणा में ,पूत प्यार में ,

       क्षणिक जीत मे ,दीर्घ हार में ,

       जीवन के शत शत आकर्षक ,

       अरमानो को ढलणा होगा ,

       कदम मिलाकर चलना होगा…!!’

             संघाच्या मुशीत घडलेले आणि कट्टर हिंदुत्ववादी असणारे अटलजी मात्र सर्व धर्माना मानाने वागणूक देणारे ,सर्व धर्मांचा आदर करणारे होते , पायजवळचा फायदा पाहून जेव्हा या देशात जातिजाती मध्ये आणि धर्माधर्मामध्ये भांडणे लावली गेली तेव्हा त्यांच्यातला माणूस जागा होतो आणि ते म्हणतात ,

     ” खून क्यो सफेद हो गया

       भेद में अभेद खो गया ,   

       बँट गये शहीद ,गीत कट गये ,

       कलेजे में कटार दड गई ,

       दूध में दरार पड गई….!!”

                जातीच्या नावावर ,धर्माच्या नावावर आपण रंग वाटून घेतले ,तसे गीत वाटून घेतले एवढंच काय आपण आपल्या देशासाठी प्राणार्पण करणारे शहीद सुद्धा वाटून घेतले याने अटलजींमधला संवेदनशील देशभक्त व्यथित होतो.

            अशा या आशावादी अटलजींनी जेव्हा एका आजारपणात मृत्यू समोर दिसायला लागला तेव्हा त्यांच्यातील जिगरबाज लढवय्ये व्यक्तिमत्व मृत्यूलाच आव्हान देत म्हणते,

    “ठण गयी ,मौत से ठण गयी ,

     जुझने का मेरा इरादा न था ,

 मोड पर मिलेंगे इसका वादा न था ,

    मैं जी भर जिया ,मैं मन से मरू,

   लौटकर आऊगा,कूच से क्यो डरु ,

     तू दबे पाव चोरी छिपे न आ ,

   सामने से वार कर फिर मुझे आजमा….!!”

                  साक्षात मृत्यूला आव्हान देणाऱ्या ह्या काव्य पंक्ती पाहूनच कदाचित मरणावरच्या त्या दुखण्यातून अटलजी सुखरूप बाहेर आले.

              असा हा लढवय्या नेता तसाच लढवय्या व्यक्ती सुद्धा होता ,प्रस्थापितांविरुद्ध आजीवन संघर्षात घालवलेल्या अटलजींनी आपल्या तत्वांशी कधी ही तडजोड नाही केली ,आणि जे राजकारण केले ते शुद्ध अंतकरणाने ,देशभक्ती ने ,देशाच्या प्रगतीसाठी ,विकासासाठी.

          ‘अंधेरा हटेगा ,सुरज ऊगेगा ,कमल खिलेगा …!!’ असा उदंड आणि काव्यमय आशा वाद आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना देणारे श्रद्धेय अटलजी जातांना खरंच संपूर्ण भारतात फुललेला कमल बघतच गेले.हा देश फक्त की किंवा माझा पक्षानेच चालवला पाहिजे या पेक्षा ,

‘सरकारे आएगी – जाएगी ,मगर ये देश रेहना चाहीये ,यहा का लोकतंत्र रेहना चाहीये ….!!’ असे म्हणत हा देश मोठा आहे आणि हा देश सदैव उन्नत माथ्याने जगात टिकून राहिला पाहिजे असे म्हणणारा आणि बोले तैसा चाले असे वागणारे तेजस्वी नेतृत्व म्हणजे कणखर 56 इंची छातीचे पण देशासाठी तितक्याच कोमल हृदयाचे आणि संवेदनशील कवी मनाचे होते श्रद्धेय अटलजी.

          आज त्यांची जयंती ,जगण्याचे आणि लढण्याचे बळ देणाऱ्या त्यांचा पवित्र स्मृतीस माझे कोटी कोटी वंदन…..!!

नारायण चंद्रकांत मंगलारम

जि प प्रा शा गोपाळवाडी ,

ता राहुरी ,जि अहमदनगर

मोबाईल -9272590119

Narayan Mangalaram

संपर्क 9272590119 9421196987 मेल :narayanmangalaram1980@gmail.com, narayanmangalaram2006@gmail.com, zppsgopalwadi67@gmail.com.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All rights reserved @ Narayan Mangalaram!
Need Help? Chat with us!  
Start a Conversation
Hi! Click one of our members below to chat on WhatsApp  
We usually reply in a few minutes