‘बालिका दिन’ अर्थात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती
क्रांतीज्योतीची ‘काव्यफुले’
“मजवर सकळाची भाव भक्ती विशाला
हृदय भरून येते, वाटते हे कशाला
उपकर कृती आहे, भार होई मनाला
सुजन हितकारांना अर्पिते ही सुमाला….!!”
ही काव्य सुमाला कोणाची आणि कोणी अर्पिली आहे का आपल्याला ठाऊक ….!!
आज ३ जानेवारी ‘बालिका दिन’ अर्थात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती, सावित्रीमाई म्हंटल की आपल्याला क्रांतीज्योती ,आद्यशिक्षिका ,पहिल्या महिला मुख्याध्यापिका किंवा मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या थोर समाजसेविका अशी त्यांची ओळख आहे ,काही अंशी महात्मा जोतिबा फुलेंच्या सार्वजनिक सत्यधर्माच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी केलेले सामाजिक कार्य किंवा प्लेग च्या साथीच्या काळातील रुग्ण सेवा हे ही आपल्याला माहिती असते ,पण आज मी आपल्या समोर सावित्रीमाईंच्या व्यक्तित्वाचा एक वेगळाच पैलू उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे ……!!
सावित्री जोतिबा फुले म्हणजे आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आज 21 व्या शतकात विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या विविध महिला या सावित्रीच्या लेकीं म्हणवून घेण्यात धन्यता मानतात पण या क्रांतीज्योतीची महती इथपर्यंतच मर्यादित नव्हती तर ती त्याचाही खूप पुढे होती …..!
‘एक तुतारी द्या मज आणून
फुंकीन जी मी स्वप्राणांनी …!!’
ही अजरामर काव्यकृती निर्माण करणाऱ्या मराठी साहित्यातील केशवसुतांना मराठी नवकवितांचे जनक मानले जाते ,पण आपल्या सर्वांना कदाचित वाचून आश्चर्याचा धक्का बसेल की केशवसुतांच्या जन्माच्या 30 वर्ष आधीच क्रांतीज्योती सवित्रीमाईंनी ‘काव्यफुलें’ नावाचा नवकवितांचा संग्रह लिहून प्रकाशित केला होता .
स्त्री शिक्षण ,रुग्ण सेवा ,सामाजिक कार्य या मध्ये त्यांच्या या काव्य प्रतिभेकडे साऱ्यांनीच कानाडोळा केला असावा असे मला वाटते. आज या लेखाच्या माध्यमातून मी सवित्रीमाईंच्या काव्यफुलातील काही निवडक काव्य पंक्तीच्या माध्यमातून त्यांची काव्यप्रतिभा सर्वसामान्यांच्या नजरेसमोर आणण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे.
सवित्रीमाईंच्या काव्य निर्मिती मागची प्रेरणा आणि प्रोत्साहन कोणाचे होते हे आपल्याला ‘बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ या आपल्या बावन्न कडव्यांच्या काव्य रचनेतुन लक्षात येते. सवित्रीमाईंनी आपल्या काव्य रचनेची प्रेरणा आणि श्रेय जोतिबा असल्याचे यात नमूद केले आहे .तसेच आपल्या रचना या जोतिबांनाच अर्पण पण केल्या आहेत ,हे ऋणनिर्देश करतांना सावित्रीमाई अतिशय काव्यमय अंदाजात म्हणतात ,
“जयाचे मुळे मी कविता रचिते ।
जयाचे कृपे ब्रम्ह आंनद चित्ते ।।
जयाने दिली बुद्धीही सावित्रीला ।
प्रणाम करी मी यती जोतिबाला ।।
करी शूद्रसेवा दिले धैर्य त्यांना ।
क्रियाशील नेता अशा जोतिबाचा ।।
नसे जात ज्याला ,नसे पंथ काही ।
तया वंदूनी सावित्री काव्य वाही ।।”
आपली कविता करण्याची प्रेरणा ,मिळालेली बुद्धी किंवा विचारशक्ती ,काव्य रचनेच्या माध्यमातून मिळवत असलेला आनंद याचे श्रेय जाणाऱ्या जोतिबाला माझे प्रणाम ,शुद्रातीशूद्रांची सेवा करतांना ,जात पात ,पंथ काहीही न मानणारा असा हा नेता यालाच मी माझे हे काव्य ही अर्पित करते असे सांगतांना ज्यांच्या मुळे आपल्या हातून हे लोकोत्तर कार्य घडते आहे हे ते सावित्रीमाई जाणून होत्या आणि त्याचा त्यांना अभिमान ही होता .
आपण आपल्या पतीला आपल्या काव्याची प्रेरणा का मानतो हे सांगताना आपल्या काव्यफुले मधील जोतिबांना नमस्कार मध्ये सावित्रीमाई म्हणतात ,
“जोतिबांना नमस्कार । मनोभावे करतसे
ज्ञानामृत आम्हां देई ।अशा जीवन देतसे
थोर जोती दीन शूद्र । अतिशूद्र हाक मारी
ज्ञान ही ईर्षा देई । तो आम्हाला उध्दारी”
दीन अशा शूद्रातीशूद्रांना ज्ञान देऊन त्यांना उद्धारायचे काम करत असलेल्या थोर जोतिबांना माझा नमस्कार ,अर्थात सावित्रीमाई या जोतिबांच्या अंध भक्त नव्हे तर डोळस अनुयायी होत्या ,आपले पती काय काम करत आहेत आणि ते किती पुरोगामी विचारांचे आहेत याची जाण त्यांना होती आणि म्हणूनच सावित्रीमाई जोतिबां समोर नतमस्तक होतायेत.
समकालीन आपल्या ज्ञानसूर्याच्या कार्याने प्रेरित झालेल्या या क्रांतीज्योती सवित्रीमाईंनी इतिहासाची सुद्धा पुरेपूर जाण होती आणि या इतिहासातील आपला स्वाभिमान अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचेसुद्धा आपल्याला विस्मरण न होता ते आपल्याला प्रातः स्मरणीय आहे हे सांगताना सावित्रीमाई म्हणतात ,
“छत्रपती शिवाजीचे । प्रातः स्मरण करावे
शुद्रादि अति शूद्रांचा । प्रभू वंदू मनोभावे
नळराज युधिष्ठर । द्रौपदी ही जनार्दन
पुण्यश्लोक पुराणात । इतिहासी शिवानंन ।”
अर्थात नलराज ,युधिष्ठर ,द्रौपदीचे रक्षण करणारा जनार्दनहे सगळे पुण्य आत्मे पुराणात,तसा किंवा त्यापेक्षा इतिहासातील पुण्यवान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शूद्रातीशूद्रांचा प्रभू ,दररोज प्रातः त्यांना मनोभावे स्मरण करून त्यांना वंदन केले पाहिजे असे सांगणाऱ्या सावित्रीमाईची ही रचना म्हणजे महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणाऱ्या त्यांच्यावर लिहिलेल्या पहिला पोवाडा ज्याची रचना ज्ञानसूर्य महात्मा जोतिबा यांनी केली आहे त्याच्या उंचीचे हे कार्य मला वाटते.
छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाबरोबरच महाराणी छत्रपती ताराबाई यांच्या पराक्रमाची महती सुद्धा सवित्रीमाईंना ज्ञात होती आणि त्यांच्या पराक्रमाची महती सुद्धा त्यांनी अतिशय समर्पक शब्दात गायली आहे ,महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन करतांना सावित्रीमाई म्हणतात ,
“छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई,
कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाई
शत्रूवर घाली छापा ,
काळ तयाची ती होई.
जेरीस शत्रूला करुन ,
करी बेफाम चढाई.
न्हाऊन टाकी रणभूमी शत्रू रक्तानी सारी ,
चपलता विजेची जैसी तशीच कडाडे संहारी.”
महाराणी ताराबाईच्या पराक्रमाची तुलना करतांना त्यांना सावित्रीमाई जगदंबा ,अंबाईची उपमा देते जि शत्रूवर तुटून पडतेय ,त्यातच आणखी पुढे म्हणतात ,
“ताराबाई माझी मर्दानी ,
भासे चंडिका रणांगणी .
रणदेवी ती श्रद्धास्थानी ,
नमन माझीये तिचिया चरणी.”
रणांगणावर शत्रूच्या समोर चंडिकेचे रूप धारण करून शत्रूचे निर्दालन करणाऱ्या या मर्दानी ताराबाईंच्या चरणी माथा टेकवून नमन करते.
आपल्या साहित्य निर्मितीचे श्रेय त्या जोतिबांना देतात पण काव्य निर्मितीची मूळ प्रेरणा ही त्याच्या निर्मितीतून मिळणारे आंतरिक समाधान असल्याचे आपल्याला त्यांच्या प्रस्ताविकेतून लक्षात येते ,त्यात त्या म्हणतात ,
“अर्पित फुले ही तुम्हा सुगंधी साची
काव्यात ओवते माळ करुनिया त्यांची
आहेत मजेची काव्यफुले ती सारी
वासाने तयांच्या शांती मिळे अंतरी…”
अशा आपल्या तेजस्वी इतिहासाची कल्पना असणाऱ्या आणि जोतिबांबरोबर धगधगणारा वर्तमान जगात असतांना ,दीन दलित ,दुःखीतांची खरी समस्या ही अज्ञान आहे हे सावित्रीमाईंनी जाणले होते ,ज्ञानदानाचा वसा त्यांनी अतिशय सुज्ञपणे घेतला होता हे सांगतांना त्या म्हणतात ,
“एकच शत्रू असे आपला
काढू पिटुन मिळुनि तयाला
त्याच्याशिवाय शत्रूच नाही
शोधून काढा मनात पाही
सांगतो पहा दृष्ट शत्रूचे
नाव नीट रे ऐक तयाचे
‘अज्ञान’
धरुनी त्याला पिटायाचे
आपल्यामधुनि हुसकायाचे”
आपल्या उत्कर्षाच्या मार्गातील आपला शत्रू म्हणजे एकच आणि तो म्हणजे अज्ञान ,त्याला पिटाळून लावायचा ,हुसकून लावायचा तरच आपला प्रगतीचा मार्ग प्रशस्त आहे हे त्या जाणून होत्या .
हे अज्ञान दूर करण्यासाठी विद्येची आराधना करून विद्या मिळवणे या शिवाय तरणोपाय नाही हे ही या क्रांतीज्योतीला माहीत होते आणि म्हणून हे सांगताना त्या म्हणतात ,
“अभ्यास करी विद्येचा । विद्येस देव मानून
घे नेटाने तिचा लाभ । मनी एकाग्र होऊन
विद्या हे धन आहे रे । श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी । ज्ञानी तो मानती जन”
विद्या हे धन साऱ्या धनाहून श्रेष्ठ आहे ,किती हा क्रांतिकारी विचार जेव्हा बहुजनांनी विद्या ग्रहण करणेही पाप मानले जात होते ,ज्ञान काय ,अभ्यास काय ,त्याविषयी बहुजनांनी बोलणेही निषिद्ध मानले जायचे तेव्हाचा .
आपला आणि इथल्या बहुजन जनतेचा उध्दार करण्याची ताकत फक्त शिक्षणात आहे हे सावित्रीमाई चांगल्या प्रकारे जाणून होत्या आणि म्हणून ही विद्या घेण्यासाठी ,ज्ञान मिळवण्यासाठी आता मागेपुढे पाहू नका ,हायगाय करू नका ,स्वस्थ बसू नका असे सांगतांना सावित्रीमाई म्हणतात ,
“विद्येविन गेले । वाया गेले पशु
स्वस्थ नका बसू । विद्या घेणे
शूद्र अतिशूद्र । दुःख निवाराया
इंग्रजी शिकाया । संधी आली”
इंग्रजी भाषेचे शिक्षण म्हणजे जगाच्या ज्ञानाची खिडकी ही जी आजची संकल्पना आहे याची जाणीव त्यांना होती ,इंग्रजीच्या शिक्षणाने आणि ज्ञान ग्रहणाने शुद्रतिशूद्रांची दुःखे ,कष्टे दूर होणार आहेत हे त्या जाणून होत्या आणि म्हणूनच इंग्रजी शिक्षणाची उघडलेली कवाडे जवळ करा असे त्या सामन्यांना आवाहन करतायेत .
कल करे सो आज कर …. ही म्हण कदाचित नंतर अस्तित्वात आली असेल पण तसाच मितीतार्थ सांगणारी रचना आजपासून दिडशे वर्षांपूर्वी करतांना सावित्रीमाई म्हणतात ,
“करणे काम आजी ते । आताच कर खेचुन
जे दुपारी करायचे । ते आताच कर जाऊन
क्षणानंतरचे काम । या क्षणी कर ठोकून
झालं काम का नाही । न पुसे मृत्यू कारण”
आपण जे काम करायला जन्माला आलो आहोत ते काम झाले की नाही हे विचारून मृत्यू येणार नाहीये ,तेव्हा त्या मृत्यने आपल्याला गाठण्या आधी जीवित ध्येय गाठण्याचा,सतत दीर्घिद्योगी राहण्याचा विचार या काव्य पंक्ती देतात नाही का …..?
इतिहास ,सामाजिक परिस्थितीच नव्हे तर माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाने कसं वागलं , जगलं पाहिजे हे आपल्या सुज्ञ मानवाची लक्षणे या काव्यातून सांगतांना सावित्रीमाई म्हणतात ,
“तयास मानव म्हणावे का ?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेचि गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का ?”
यातच पुढे त्या म्हणतात ,
“ज्योतिष रम सामुद्रिक हो
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशूत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का ?”
“बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशुपक्षी ऐसें नाही
तयास मानव म्हणावे का ?”
“गुलामगिरीचे दुःख नाही
जराही त्यास जाणवत नाही
माणुसकी ही समजत नाही
तयास मानव म्हणावे का ?”
पशु पक्ष्यात नसणारी स्वर्ग नरक ,ज्योतिष ,हस्त सामुद्रिक ही कल्पना ज्या मानवाने घेतली त्याला काय म्हणावे ? घरातील स्त्री राबराब राबतेय ,काबाड कष्ट करतेय आणि पुरुष चकाट्या पिटत एतोबासारखा बसून खातोय त्याला सुद्धा काय म्हणावे ? गुलामला गुलामगिरीची जाणीव नाही ,त्याचे दुःख नाही तो सुद्धा मानव म्हणवण्याच्या लायकीचा नाही .
अशी मानवाची क्रांतिकारी व्याख्या सांगणाऱ्या सवित्रीमाईंनी जगतगुरु तुकोबारायांच्या ‘नवसे कन्या पुत्र होती ,का करणे लागे पती’ या अभंगाच्या तोडीस तोड अभंग लिहिला आहे ‘नवस’ त्यात त्या म्हणतात ,
“धोंडे मुले देती । नवसापावती
लग्न का करती । नर नारी
सावित्री वदते । करुनि विचार
जीवन साकार । करुनि घ्या ।।”
दगड धोंड्यानं नवस करून जर पुत्र होत असतील तर मग स्त्री पुरुष लग्नच का करतात नाही का ? प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करून जीवन साकार ,आनंदी ,समाधानी करा असा क्रांतिकारी विचार सावित्रीमाई आपल्या या काव्यातून मांडतात .
सवित्रीमाईंनी मात्र अशा सामाजिक ,ऐतिहासिक विषयांवरचे काव्य रचना केली असे नाही तर स्वतःची जन्मभूमी असणाऱ्या नायगावं वर सुद्धा त्यांनी त्यांच्या ‘माझी जन्मभूमी’ या कवितेतून काव्य फुले उधळली आहेत ,
“नायगावं हे माझे माहेर जुनाट गाव खेडे
तयाचे छान गीत पवाडे
बारा बलुती ,बारा अलुती ,कितीक जाती जमाती
शिवारात या सुखे नांदती
पाऊसपाणी छान पडतसे येती पिके सारी
विहिरीवर फळे फुले गोजिरी
गुलजार पक्षी गाती मनोहर फिरती फुलपाखरे
ऐसा निसर्ग तिथे वावरे
बळी राजा थोर होई शेतकरी दानशूर
जणू माझी जन्मभूमी बळीचे कश्यपपूर
आम्ही तयांचे वंशज ,रडगाणे नच गाणारे
जन्मभूमीही मला सांगते फुले कराया ती
तीच उधळते मी तिजवरती….”
आपल्या जन्मगावाची तुलना बळीराजाच्या कश्यपपूर बरोबर करतांना आपण त्या बळीराजाचे वंशज आहोत हे ही त्या अभिमानाने सांगतात ,या काव्यात आपल्या गावचे वर्णन करतांना त्यात तात्कालिक गाव ,गावाच्या भोवतालचा निसर्ग ,ग्रामसंस्कृती याचेही सुंदर वर्णन आपल्याला त्यात पाहायला मिळते .
या आणि अशा इतर कवितांबरोबर सवित्रीमाईंनी बोलक्या बाहुल्या ,पिवळा चाफा आणि जाईचे फुल अशा काही हलक्याफुलक्या कवितांची सुद्धा रचना केलेली आहे ,त्यांच्या जाईचे फुल या कवितेत त्या म्हणतात ,
“फुल जाईचे
पहात असता
ते मज पाही
मुरका घेऊन
रीत जगाची
कार्य झाल्यावर
फेकुन देई
मजला हुंगून”
हलकी फुलकी रचना करतांना ही त्यातून एक खोल संदेश त्या देऊन जातात .
स्वतः आपण कवी आहोत तर आपली तुला सुद्धा त्या प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या विश्वमित्र बरोबर तर कधी खुळ्या व्यक्ती बरोबर तुलना करतात ,
“द्रष्टा कवी कधी कल्पि मी ‘विश्व’ मित्र आहे
काव्य माझे हे प्रतिसृष्टी आहे
दिव्य सृष्टीचे काव्य हे तयाचे
जीणे राहते सुंदर शिव साचे
पुढे म्हणतात,
खुळे काव्य व खुळा कवी
कल्पित रचतो कवी काव्य
सुखदुःखे तो कधी भव्य
अनुभव घेतो स्वर्गाचा
भोग भोगतो नरकाचा….”
आपल्या कल्पनांचे इमले बांधून भव्य दिव्य अशी रचना करणाऱ्या कवयित्री म्हणजे साक्षात सावित्रीमाई या सुद्धा दुर्लक्षिल्या गेल्या नाही का ……?
मराठी साहित्यामध्ये नवकवितांचे पर्व सुरू करणाऱ्या ,त्याला तात्कालिक परिस्थिती मध्ये एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या सावित्रीमाई म्हणजे मला मराठी साहित्यातील अनमोल रत्न वाटतात .
“या काव्य ज्योतीने जोतीची पेटवली ज्ञानज्योती ,
प्रेरणेने तिच्या तेवत राहो युगे युगे लक्ष लक्ष नवज्योती”
हेच मागणे मागत आजच्या त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या थोर कार्याला आणि काव्यप्रतिभेला माझे विनम्र अभिवादन …..!!
नारायण चंद्रकांत मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
राहुरी ,अहमदनगर
मोबाईल 9272590119