लेखिका आपल्या भेटीला ..!!
धड्यातल्या लेखिकाच जेव्हा गोष्टीची कथा सांगतात.
अर्थात लेखिका आपल्या भेटीला ..!!
“मला वाटायचं लेखक म्हणजे ,कुणी तरी खूप मोठे आणि भारी वैगेरे लोक असतील ,मी त्यांना कधी भेटू शकेल की नाही ? , त्यामुळे माझी गोष्ट कधी पुस्तकात येईल का हे मला माहित नव्हतं . अशात जेव्हा किशोर मासिकातून छापून आलेली माझी गोष्ट पाठ्यपुस्तकासाठी घेतलेली कळलं ,तेव्हा मला खूप म्हणजे खूप आनंद झाला.” लेखिका आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या ,” तुमची गोष्ट पुस्तकात छापून आल्यावर तुम्हाला कसं वाटलं ?” या प्रश्नाच्या उत्तरात श्रीम. अंजली अत्रे बोलत होत्या.
निमित्त होते आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी ता.राहुरी ,जि अहमदनगर येथे आयोजित केलेल्या ‘लेखिका आपल्या भेटीला’ या उपक्रमाचे आणि त्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी बालभारतीच्या
पाठयपुस्तकातील ‘मिठाचा शोध’ या पाठाच्या लेखिका मा.श्रीम अंजलीताई अत्रे यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पाचे ,विचारलेल्या विविध प्रश्नांचे आणि घेतलेल्या व्हर्चुअल मुलाखतीचे.
विद्यार्थ्यांच्या मुलाखत घेणे या कौशल्याच्या विकासासाठी आणि आपण ज्यांचा पाठ शिकतो आहोत तो पाठ ,ती कथा त्यांना कशी सुचली ,त्यामागची प्रेरणा काय ? ,लेखकांना गोष्टी कशा सुचतात ? कधी सुचतात ?हे प्रत्यक्ष त्यांच्या कडूनच जाणून घेण्यासाठी उपयुक्त अशा या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर श्रीम. अंजलीताई यांनी अतिशय सुंदर पद्धतीने व विद्यार्थ्यांना समजतील अशा भाषेत उत्तरे देत विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
ताईंनी सुरवातीलाच विद्यार्थ्यांना दोन बालकथा अगदी हावभावासकट आणि अतिशय प्रभावीपणे सांगून वातावरण आल्हाददायक केले ,मुलांना बोलत केलं आणि नंतर विद्यार्थ्यांनी कुतूहलाने विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तुम्हाला कथा कधी सुचतात ? ,तुम्ही कधी ठरवले तुम्हाला लेखिका व्हायचे ? ,तुमची गोष्ट पुस्तकात आल्यावर तुम्हाला कसं वाटलं ? ,आम्ही गोष्ट लिहू शकतो का ? त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे ? आदी प्रश्नांच्या उत्तरातून मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. सव्वा तास चाललेल्या
या मुलाखतीत अंजली ताईंनी आपल्या गृहिणी ते बालकथा लेखिका हा प्रवास उलगडतांना सांगितले ,” मी बालपणी आजी ,आई वडिलांकडून भरपूर कथा ऐकल्या होत्या ,माझ्या मुलीला मी या कथा सांगायचे ,त्या तिला खूप आवडायच्या आणि मग मी विचार केला की माझ्या मुली सारख्याच या कथा सगळ्यांना ऐकायला ,वाचायला मिळाल्या तर ,त्यातून मी बालकथा लेखनाकडे वळले.” ‘मिठाचा शोध’ ही कथा तुम्हाला कशी सुचली याचे उत्तर देतांना त्या म्हणाल्या , “ही खरतर एक दंत कथा आहे ,ती मला माझ्या वडिलांनी सांगितली होती आणि त्यांना त्यांच्या आईने ,पिढ्यान पिढ्या ऐकत आलेली ही कथा एकदा सहज बोलत बोलत मी माझ्या मुलीला म्हणाले ,तुला माहितीये का मिठाचा शोध कसा लागला ?, ती म्हणाली नाही . आणि मग त्यातूनच मी ही कथा लिहून काढली ,ती आधी किशोर मासिकात आणि तिथून पाठयपुस्तकात छापून आली.” ही गोष्ट सांगण्या बरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वलिखित गोष्टीची इतर पुस्तके दाखवत गोष्टी सांगितल्या आणि भरपूर अभ्यास करा ,वाचन आणि लेखन ही करा असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
आपला कथा लेखनाचा प्रवास सांगतांना ताई पुढे म्हणाल्या , ” आजूबाजूच्या घटना कुतूहलाने पहा ,त्यात कथा बीज आहे का याचा शोध घ्या ,सुरवातीला मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा ,तुमच्या आईवडील ,शिक्षक यांची मदत घ्या आणि आपल्या कल्पनाशक्तीला वाव द्या ,आपल्या कथा कागदावर उतरवण्यापूर्वी मी पण त्यावर खूप विचार करते ,तुम्ही सुद्धा अशी सवय लावून घ्या ,तुम्ही सुद्धा नक्की गोष्टी लिहाल.” “तुम्ही लिहिलेल्या गोष्टी मला पण पाठवायला विसरू नका ….!” हे ही त्यांनी आवर्जून सांगितले.
ज्यांचा धडा आपण पुस्तकात वाचतो त्यांना आज प्रत्यक्ष भेटून,त्यांच्याशी बोलून विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. आमची बाल स्टार कलाकार प्रियांका हापसे हिने ही ,” मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ हे एकपात्री तर कृष्णा जाधव याने ‘तुम्हाला कोण व्हायचय ‘ हे पू लंचे एकपात्री सादर करून मॅडमची शाबासकी मिळवली.
“विद्यार्थी खूपच चुणचुणीत आणि बोलके आहेत ,त्याबद्दल त्यांचे आणि शाळेचे अभिनंदन ,मला तुमच्या शाळेला प्रत्यक्ष भेटायला आवडेल” असे सांगत ,अंजली ताईंनी शाळेचे कौतुक केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांनी प्रास्ताविक करतांना अत्रे मॅडमचे व्हर्चुअल स्वागत केले ,तर नारायण मंगलारम यांनी श्रीम. अत्रे मॅडम यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले……!!
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर