‘इस दिवाली कुछ अच्छा करते है …!’
‘इस दिवाली कुछ अच्छा करते है …!’
अर्थात
‘मतदार जनजागृती’ आणि ‘पर्यावरण पूरक आणि फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प’
” सप्तरंगात न्हाऊन आली ,
आली माझ्या शाळेत ही दिवाळी “
अगदी बरोबर वाचले तुम्ही ,आपापल्या घरी तर दिवाळी यायला आणखी आठ दिवसांचा अवधी आहे ,पण आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे आजच दप्तरमुक्त शनिवारच्या निमित्ताने आणि प्रथमसत्रातील शेवटच्या कार्यदिनी दिवाळी आली.
महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक मतदार जनजागृती ( स्वीप ) अंतर्गत मतदार जनजागृती साठी आज सकाळी प्रभात फेरी काढून ,ग्रामस्थांच्या समोर पथनाट्य सादर करण्यात आले. 100 टक्के मतदान होण्यासाठी शाळेत मतदार जनजागृती ‘सेल्फी पॉईंट’ तयार करण्यात आले आणि अनेक पालकांनी तेथे सेल्फी घेऊन 100 टक्के मतदानाचा संकल्प केला ,आमच्या शाळेतील चिमुकल्यानाही यात सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.
बदलणाऱ्या वातावरणामुळे धरणी मातेसमोर निर्माण झालेले संकट ,पर्यावरण संवर्धनाची असलेली गरज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती पासून लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदी यासर्व गोष्टींचा विचार करून आज आमच्या शाळेत ‘पर्यावरण पूरक आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला.
लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघण्याचा दिन म्हणजे दीपावली आणि म्हणून सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मातीच्या पणत्या अतिशय सुंदर आणि कल्पक पद्धतीने रंगवल्या ,चिमुकल्या हातानी रंगवलेल्या या पणत्या खूपच सुंदर दिसत होत्या ,त्या नंतर विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक असे भेटकार्ड तयार केले ,त्यावर दिवाळी शुभेच्छा बरोबर मतदान जनजागृती करणारे संदेश ही लिहिण्यात आले ,हे तयार केलेले भेटकार्ड पर्यावरण पूरक अशा वर्तमानपत्रापासून तयार केलेल्या कागदी पिशवीवर चिकटवन्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांनी येत्या दिवाळीत प्लॅस्टिकचा वापर न करता ,पर्यावरण पूरक ,मतदार जनजागृती करणाऱ्या आशा दिवाळीच्या शुभेच्छा कार्ड लावलेल्या आणि स्वतःच वर्तमान पत्राच्या कागदापासून तयार केलेल्या ‘कागदी पिशव्या’ वापरण्याचा ,तसेच वायुप्रदूषण टाळण्यासाठी ‘फटाके न वाजवण्याचा’ संकल्प केला.
“मतदान हा आपला हक्क आणि अधिकार आहे ,आपण 100 टक्के मतदानाचा हक्क बाजवला पाहिजे ,ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे क्षण आणणारी ठरो ,आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत….!!” आशा शुभेच्छा मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. “पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्लास्टिकचा 100 टक्के त्याग केला पाहिजे आणि बाजाराला सुद्धा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे तसेच ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे” असे नारायण मंगलारम हे म्हणाले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या शुभेच्छा कार्ड व मतदार जनजागृतीपर संदेश चिकटवलेल्या कागदी पिशव्या ,रंगवलेली एक पणती सोबत कालच कोरियामधून आलेल्या कल्चरल बॉक्स मधील चोको पाय आणि त्यांचे नूडल्सचे पाकीट हा खाऊ देऊन ‘इस दिवाली कुछ अच्छा करते है…!!’ असे म्हणत , पर्यावरण पूरक,100 टक्के मतदान व फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेत कार्यक्रम संपन्न झाला.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी ,
ता राहुरी ,जि अहमदनगर