“अनबॉक्सिंग कल्चरल बॉक्स – या मेमोरेबल मोमेंट”
“अनबॉक्सिंग कल्चरल बॉक्स – या मेमोरेबल मोमेंट”
अर्थात
“दक्षिण कोरियातून आलेला कल्चरल बॉक्स उघडतानाचा गोपाळवाडी शाळेतील आजचा एक अविस्मरणीय क्षण …”
“किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला….!!”
असाच अवर्णनीय ,आकाश दोन बोट ठेंगणे होईल एवढा आनंद आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरीच्या चिमुकल्याना आज झाला ,त्याला कारणही तसेच घडले होते ना …..!!
भेट म्हणून अगदी छोटीशी गोष्ट जरी मिळाली तरी हरखून जाणे हा आपला मनुष्यस्वभाव ,त्यात गोपाळवाडी सारख्या ग्रामीण भागातील चिमुकल्याना आधुनिक जगाला विशेष न वाटणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचीही नवलाई ….!! आज पर्यंत जास्तीत जास्त मामा ,काका किंवा आत्याकडून भेट मिळालेली ही लेकरं आज प्रचंड आनंदात होती ,कारण त्यांच्या साठी भेट आली ती दुसऱ्या शहरातुन ,राज्यातून नव्हे तर चक्क दुसऱ्या देशातून ….!!
हो आमच्या गोपाळवाडीच्या बाळगोपालांसाठी चक्क दक्षिण कोरिया देशातील ‘ग्येओनगी डो’ या प्रांतातील ‘संमोरऊ एलमेंटरी स्कूल’ येथून त्या शाळेतील बालमित्रांनी पाठवलेला ,त्यांच्या भारतातील बालमित्रांसाठी ‘कल्चरल एक्सचेंज’ अर्थात सांस्कृतिक देवाणघेवाण अंतर्गत दक्षिण कोरियाच्या संस्कृतीची झलक दाखवणारा भला मोठा ‘कल्चरल बॉक्स’ आज आमच्या शाळेला प्राप्त झाला.
अविवाहित स्त्री आणि पुरुषाने परिधान करावयाचा पोषख घातलेले ‘हनबोक बाहुल्या’ ,त्यांचा सर्वात जुना आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ ‘सई-वू-ककंग’ ,चोको पै ,दोन तीन प्रकारचे नूडल्स आणि जिभेवर बऱ्याच वेळ चव रेंगाळत ठेवणारे स्ट्रॉबेरी फ्लेवर चे चॉकलेट हा सगळा खाऊ ,याबरोबरच दक्षिण कोरियाचा राष्ट्रध्वज ,यिन यांग हे शुभ चिन्ह धारण केलेला हात पंखा ,मोजे ,कि चेन ,त्यांचे पारंपरिक खेळ , अगदी वेगळेच लाकडी भोवरे ,भिंगऱ्या ,पेन्सिली ,पाउच आणि त्यांच्या संस्कृतीतील लकी बॅग ( आपल्या अजीबाईच्या बटव्यातील चंची सारखी ) या सगळ्या वस्तू भरलेला हा कल्चरल बॉक्स म्हणजे आमच्या साठी जादूई पेटाराच होता . या पेटीतून बाहेर येणाऱ्या एक एक वस्तू बरोबर विद्यार्थ्यांचे डोळे कुतूहल , आनंद ,आश्चर्य याने चमकत होते. “वॉव ,आरे ,काय भारी ,लई भारी” असे त्यांचे सुस्कार सर्व काही सांगून जात होते.
आज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,ग्राम पंचायत सदस्य सीताराम जाधव ,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव ,राजु जाधव ,रुक्मिणी जाधव ,लताबाई जाधव या पालकांच्या आणि कृष्णा कुर्हे , प्रशांत जाधव ,योगेश जाधव ,स्नेहल कुर्हे ,प्राजक्ता हापसे या कुतूहलाने आलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कल्चरल बॉक्स उघडण्यात आला .
” दक्षिण कोरिया सारख्या दूर देशातून आलेली ही भेट म्हणजे आपल्या साठी प्रेरणा आणि प्रोत्साहन आहे ,आज एवढ्या लांबून आपल्याला भेट आली आहे ,आपण सर्वांनी एक दिवस शिकून या देशाला भेट देण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे ” असे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.
“युनेस्को स्कूल क्लब आणि मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर कम्युनिटीच्या माध्यमातून आपल्याला ही सांस्कृतिक देवाण घेवणीची संधी मिळाली आहे ,या शाळेतील ‘अलिसिया जे एम’ या शिक्षिकेने यासाठी पुढाकार घेऊन आपल्या ग्रामीण भागातील एका छोट्या शाळेला इतकी अनमोल भेट पाठवली आहे ,त्याबद्दल त्यांचे आणि शाळेचे मी मनापासून आभार मानतो .” असे नारायण मंगलारम हे म्हणाले.
” एका मागास समाजाच्या वस्तीवरच्या शाळेत जिथे यायला पक्का रस्ता ही नाही अशा ठिकाणी दक्षिण कोरिया सारख्या देशातील शाळेतून पाठवलेली ही भेट आपल्याला प्राप्त होते ,त्यातही त्यांच्या संस्कृतीची ओळख करून देत ते त्यांचा राष्ट्रध्वज ही आपल्या शाळेसाठी पाठवतात ही आपल्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. ” असे माजी सरपंच ज्ञानदेव जाधव म्हणाले
“गत वर्षी दिल्लीचे पथक शाळा भेटीसाठी आले होते आणि यंदा परदेशातून आलेली ही भेट ,आमच्या शाळेने देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा आपली ओळख निर्माण केली ,याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.” असे सीताराम जाधव म्हणाले.
जल्लोष ,आनंद , उत्साहात सुरू झालेला हा कार्यक्रम याच कल्चरल बॉक्स मध्ये आलेल्या चॉकलेटचे वाटप करून आणि कोरिया वरून आलेल्या चॉकलेटचे रॅपर विद्यार्थ्यांनी फेकून न देता कौतुकाने घरी आपल्या घरच्यांना दाखवण्यासाठी आपल्या खिश्यात घातले आणि आज ज्या संस्कृतीची झलक पहिली तिला एक दिवस नक्की भेट देण्याची स्वप्ने मना मनात रंगात कार्यक्रम संपन्न झाला.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर