National Teacher Award Winner 2020 - Smart use of Technology in school education

एक दिवाळी अशीही ….!!

General 1020

एक दिवाळी अशीही ….!!

        आज एक छोटा पण थेट काळजाला भिडणारा व्हिडीओ पाहण्यात आला , व्हिडीओ तसं साधाच पार्श्वभूमी दिवाळी सणाची – दिवाळी सण आनंदाचा ,उत्साहाचा ,चैतन्याचा ,प्रकाशाचा -एक गरीब पणत्या विकणारा पिता आणि त्याच्या शेजारी त्याचा 4-5 वर्षाचा असेल असा मुलगा ,मुलगा वडिलांना अत्यंत आशाळभूतपणे दिवाळी साजरी करायची ,नवीन कपडे घ्यायचे ,मिठाई घ्यायची अशी ईच्छा व्यक्त करतो ,गरीब वडील अतिशय दिनवाणीपणे त्याला पणत्या विकल्यावर आपण दिवाळी नक्की साजरी करू असा शब्द देतात ….!!सकाळची दुपार होते पण कोणीच पणत्या घ्यायला तयार नाही ,वडिलांचा चेहरा पडायला झालाय ,येणाऱ्या जाणार्याला पणत्या घेण्याची विनवणी तो करतोय पण कोणालाच पणत्या घेण्यात स्वारस्य नाही.दुसऱ्या प्रसंगात तीन तरुण मित्र भेटलेत एक जण दिवाळीच्या मुहूर्तावर बाईक तर एक जण कार खरेदी करतोय ,दोघे ही तिसऱ्या मित्राला आपल्या आनंदात सहभागी होण्याचे निमंत्रण देतात ,गप्पां मारत मारत ते तिघे त्या गरीब पणतीवाल्याच्या समोरून जातात तर तो करुणपणे त्यांना पणत्या घेण्याची विनवणी करतो ,चंगळवादी प्रवृत्तीचे ते तरुण त्याच्या मातीच्या पणत्यांची थट्टा करत पुढे निघून जातात ….!! तिसरा मित्र मात्र संवेदनशील ,पणतीवाल्याचे पणत्या घेण्याचे आर्जव त्याला मनातून हेलावून टाकते, आपल्या बेफिकीर मित्रांना तो माघारी बोलावून दिवाळी म्हणजे नेमकं काय असं विचारतो …? मित्र कुत्सित हसतं दिवाळी म्हणजे नवीन वस्तूंची खरेदी ,धमाल ,मस्ती असे सांगतात ,तर हा संवेदनशील तरुण म्हणतो दिवाळी म्हणजे फक्त आपले सुख ,आपला आनंद ,धमाल मस्ती आणि नवीन वस्तूंची खरेदी नव्हे तर दिवाळी म्हणजे एकमेकांना आनंद वाटणे ,दुःखी कष्टी व्यक्तीच्या जीवनातील अंधकार दूर करून आनंदाचा प्रकाश पसरवणे…..!!

          आज आपण वाटतो आहोत का आनंद …..?

आज आपण आपल्या कुठल्या प्रयत्नांनी कोणाचं आयुष्य समृद्ध करतो आहोत का ….?

आज आपण कुणाच्या आयुष्यातील दुःखाचा अंधकार दूर करून प्रकाश पसरवतो आहोत का ….?

        आजच योगायोगाने तालयोगी परिवाराबरोबर अहमदनगर मधील एका वृद्धाश्रमात आजीआजोबांबरोबर दिवाळी साजरी करण्याची ,त्यांना फराळ देण्याची संधी मिळाली ,साधारण संख्येत ५० च्या आसपास असणारे आणि वयाने साठी किंवा त्यापुढचे हे  सगळे आजीआजोबा ,नगर जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातून विविध कारणांनी या ठिकाणी आलेले ,काहींना कोणीच नव्हतं तर काहींना सगळे असूनही त्यांच्या साठी कोणी नव्हतं – आमच्यासारख्या त्रयस्थाना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले केविलवाण हास्य ,आलेल्या आमच्या चेहऱ्यांमध्ये त्यांच्या नातवंडांचे ,पंतवंडांचे लेकाचे ,लेकीचं चेहरे शोधण्याची त्यांची धडपड ,आपल्या कुटुंबियांच्या सहवासात व्यतीत केलेल्या मधुर आठवणीने गहिवरून आल्यावर त्यांच्या जीवांची होणारी तडफड…..!!बोलायला मिळाल्यानंतर निरंतर बोलणारे एक आजोबा तर कदाचित माझे रक्ताचेच माझे नाही होऊ शकले मग हे काय असा विचार करून शून्य नजरेने आमच्याकडे पहात निर्विकार भाव चेहऱ्यावर ठेवून एकही शब्द न बोलणारे एक आजोबा ,ह्या दोन व्यक्ती म्हणजे तिथल्या त्या सगळ्या सदस्यांचे भावविश्व व्यक्त करणाऱ्या दोन टोकाच्या दोन मनोवृत्तीच…..!!

        सगळं आयुष्य ज्या आपल्या लेकरांसाठी ,त्याच्या सुखासाठी ,समाधानासाठी काढले अशी आपलीच चिमणी पाखरं जर पंखांमध्ये बळ येताच आपल्याला असं एकट ,बेवारस सोडून दूर उडून जात असतील तर मग जगायचं कसं आणि कोणासाठी अशी काहीशी अवस्थ या पमारांची ,समोर उभी असलेली अंधकारमय भयावह परिस्थिती त्यांना जगूही देत नाही आणि हे दिवस कधी तरी बदलतील ,पुन्हा आपण आपल्या परिवारात नातवंडांसह असू ही भाबडी ,वेडी आशा त्यांना मरू ही देत नाही .

        आयुष्यभर काबाडकष्ट केले ,लेकरांना वाढवलं ,स्वतःच्या ईच्छा मारल्या फक्त मुलांच्या सुखाचा विचार केला पण आज त्या मुलांना त्यांचा संसार महत्वाचा आहे ,त्यांची बायको -पोर महत्वाचे आहेत ,वृद्ध आई बापाकडे लक्ष द्यायला ,त्यांचे दोन शब्द ऐकून घायला ,त्यांच्या हाकेला ओ द्यायला ,त्यांची सेवा करायला त्यांच्याकडे अजिबात वेळ नाही ,याची खंत त्यांच्या बोलण्यातून कुठेतरी खोलवर जाणवते. दहावी पास झालेल्या बहिणीला कमी शिकलेली म्हणून सासरचे टोमणे मारायचे तर त्यांच्या टोमण्याच्या जिद्दीवर तिने एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले अशा या जिद्दी ,मेहनती बहिणीचा मी भाऊ आहे तेव्हा मी पण किती जिद्दी असायला हवं असं सांगत आपल्या सुजलेल्या गुढघ्याची जखम दाखवत एक आजोबा सांगत होते ,अंगाला थरकाप सुटतो ,बोलतांना बोबडी वळते पण ती कोणाच्या भीतीने नाही तर शरीरातील कमी झालेल्या रक्ताच्या प्रमाणामुळे. औषधोपचार चांगले मिळतात ,औषधे ही मोफत मिळतात पण ती तितक्याच काळजीने खाऊ घालणारा ,त्याच्या वेळांची आवर्जून आठवण करून देणारा कोणी आपला नाही ही भावना मनाला त्या आजारापेक्षा जास्त खाते.

           आयुष्यच्या या शेवटच्या टप्यावर आपल्या कुटुंबियांच्या सहवासात ,त्यांच्या सुखात आणि दुखत ,आनंदात आणि संकटात आपलाही सहभाग असावा इतकीच माफक अपेक्षा या पिकलेल्या पानांची ,नंतर आपल्याला गळुनच पडायचं आहे ,पण त्याच कुटूंबाने आज वाळीत टाकलंय यांना ,वाऱ्यावर सोडलंय या वृद्धाश्रमात सोडून , याची जाणीव असणारी पण आपल्या जीवनात हा कधी संपेल की नाही माहीत नसलेला अंधःकार पसरलेला असतांना भेटायला आलेल्या लोकांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम हे आजी आजोबा करतायेत ,आपल्या विनोदी गीतांनी ,मजेशीर शेरोशायारीने ,गप्पांनी आणि आलेल्याला आनंद वाटेल अशीच आपण प्रतिक्रिया द्यायची ,हसायचं ,काही खायला दिल तर ते छान आहे असं म्हणायचं ,नसेल आवडलं तरी खायच ,पुन्हा नक्की या भेटायला ,अस म्हणायचं अशा मायेची पखरण ते करतायेत .

        इथला प्रत्येकजण काहीतरी छोटा मोठं का होईना काम करतोय ,कोणी बागेमधील झाडांना पाणी घालतंय तर कोणी किचन मध्ये स्वयंपाकात ,सफाईत मदत करतंय ,एक आजोबा मात्र रोजच गेटमनच काम करतात असं समजलं ,का विचारलं तर कधी तरी त्याच गेटच्या बाहेर कायमच जायला मिळेल ,कोणी तरी आपला आपल्याला घ्यायला नक्की येईल ही भाबडी आशा .डोळ्यांची खाचड व्हायची वेळ येते पण ही आशा काही पूर्ण होत नाही आणि मग पसरते ती भयाण ,निरव आणि जीवघेणी शांतता.

        वृद्ध महिलांची तर अवस्थ आणखी करुण ,समोरच्या गर्दीत एखादा चेहरा ओळखीचा वाटला तर त्यांचा मायेचा बांध फुटणार ,ममतेच्या स्पर्शाची लालसा बळावणार पण तिला काबूत ठेवत आपल्या नातवंडांच्या वयाच्या मुलामुलींसामोर हात जोडायचे ,दोन प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या ,कोणी विचारपूस केली की समग्र जीवनपट उलगडून दाखवायचा न थकता ,न थांबता ,आपल्या आश्रमातील या वृद्धांना सोडून कोणीतरी बोलायला भेटतंय याचंच जास्त अप्रूप ,मग त्याच्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगता सांगता थोडं हसवणार आणि नकळत आपल्या पापण्यांच्या कडाही ओलावणार ….!!

         दिलेल्या फराळातील पदार्थांपेक्षा आलेल्या लोकांची भेट ,झालेल्या थोड्या गप्पा आणि त्याच्या बरोबर व्यतीत केलेला हा वेळ हे त्यांच्या साठी जास्त अनमोल आहे हे तिथून निघतांना त्यांच्या कातर झालेल्या ,गहिवरलेल्या स्वरांवरून आणि खोल गेलेल्या डोळ्यांवरून लगेच लक्षात येत.

        आज भौतिकवादाच्या या जगात रोजचाच दिवस आपल्या साठी दिवाळी झाली आहे तेव्हा या दिवाळ सणाचं हवं ते अप्रूप आपल्याला नाही ,आपल्या पिढीने तरी ते अनुभवलं आहे तेव्हा आपल्या गतस्मृतीत त्याचा मृदगंध टिकून आहे पण आजच्या या हायटेक पिढीला त्याच काहीच कौतुक नाही ही आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी बाब आहे .प्रत्यक्ष दिपावली साजरी करून आनंदाची पखरण करण्यापेक्षा आपण समाज माध्यमातून ,मोबाइलवरून एकमेकांना भरभरून शुभेच्छा पण देतोय ,त्यातच आपण जास्त धन्यता मानतोय ,दिल्याजणार्या शुभेच्छा आटता आटत नाहीयेत  पण आज आपण खरंच दिपावली हा ‘आनंद वाटण्याचा उत्सव’ म्हणून साजरा करतो आहोत का …..?

किती जणांच्या जीवनात आपण या दीपावलीच्या निमित्ताने आनंद पेरलाय ….?

की मात्र या आभासी जगात सगळ्यांच्या बरोबरीने आपण ही आहोत हे दाखवण्यासाठी इतर कोणाच्या तरी आलेल्या शुभेच्छा पुढे पाठवण्यात आपण धन्यता मानतो आहोत ….?

असं म्हणतात की ,

“दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक

दिपमाळ तयार होते,फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलहार तयार होतो,आणि माणसाला माणूस जोडत गेलं की ‘माणूसकीचं’ एक सुंदर नातं तयार होतं.”

        असं माणसाला माणूस जोडत ‘माणुसकीच’ एक सुंदर नातं तयार करायची वेळ आता आली आहे ,आभासी जगात हजारोंच्या पटीत असणारी मित्रांची संख्य आणि प्रत्येक्षात माणसाला पारखा झालेला माणूस ही दरी बुजवण्याची आज गरज आहे ,दुखीतांच्या ,वंचितांच्या जीवनात आनंद पेरण्याचे आज गरज आहे ,आपल्या सुखासाठी स्वतःच्या जीवाचे रान करणाऱ्या आपल्या मागच्या पिढीसाठी आपण आपल्या जीवाचे रान करण्याची आज गरज आहे …..!!

           “असा एक आकाशकंदील

            आपल्या हातून घडावा

            आपल्या अंगणातील प्रकाश

            अंधाऱ्या घरात पडावा”

                   असं दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणणार आकाशकंदील यंदाच्या दिवाळीत लावूयात ,चला दुःखी ,कष्टी ,वंचित ,शोषितांचे जीवन उजळवूयात ….!!

         आंनद घेऊयात ,आनंद देऊयात …!! घराघरात आणि मनामनात साठवली जाईल अशी दिवाळी साजरी करूयात ……!!

नारायण चंद्रकांत मंगलारम

Narayan Mangalaram

संपर्क 9272590119 9421196987 मेल :narayanmangalaram1980@gmail.com, narayanmangalaram2006@gmail.com, zppsgopalwadi67@gmail.com.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All rights reserved @ Narayan Mangalaram!
Need Help? Chat with us!  
Start a Conversation
Hi! Click one of our members below to chat on WhatsApp  
We usually reply in a few minutes