एक मूठ धान्य…एक ओंजळ पाणी
एक मूठ धान्य
एक ओंजळ पाणी
एक रुपया पशुपक्षांसाठी
जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी
दुष्काळात अन्नपाण्यासाठी पशुपक्षी तडफडत आहेत ,अशा परिस्थितीत काही माणसातील ,मुलांमधील माणुसकी जागी होते , पशुपक्षी यासाठी आपण काहीतरी करू ही मनातील कल्पना जेव्हा सत्यात उतरते तेव्हा मात्र मिळणारा आनंद गगनात मावत नाही.
राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी चेडगांव हा तसा पाण्याखालचा भाग ,पण यंदा या परिसरातही दुष्काळाची दाहकता वाढत असून पाण्यासाठी माणसांची भटकंती होत आहे. अशा दिवसात पशुपक्षी तर अन्न पाण्यासाठी तडफडत मरत आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे हा विचार मी आमच्याही शाळेतील मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव ,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव आणि विद्यार्थ्यांना बोलून दाखवून आवाहन केले की ,एक ओंजळ धान्य व पाण्यासाठी एक रुपया जमा करूयात आणि त्याला या छोट्याशा वस्तीच्या ,आमच्या लहान वयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मानाने खूपच चांगला प्रतिसाद मिळाला ,मग आम्ही आमच्या युनेस्को क्लब ऑफ गोपाळवाडी शाळेच्या वतीने आयोजित या उपक्रमातंर्गत मात्र 38 विद्यार्थी संख्या असणाऱ्या गोपाळवाडी शाळेमधून जवळजवळ पन्नास किलो धान्य व पाण्यासाठी तीनशे पंचवीस रुपये जमा झाले.
‘निसर्गाचा ढासळलेला समतोल , दिवसेंदिवस निर्माण होत असलेली दुष्काळी परिस्थिती , पाणीटंचाई ,वृक्षतोड , पक्षांची घटत चाललेली संख्या आणि एकूणच जैवविविधतेवर आलेले संकट ही आपल्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. काळाची पावले ओळखून जर आपण ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले नाही तर आपली पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही सर्वांनी पुढाकार घेऊन निसर्ग, वन्यजीव पशुपक्षी वाचवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आपल्या जिल्ह्यात निसर्गप्रेमी संघटनेने खूप मोठे काम उभे केले आहे या संघटनेतील निसर्गप्रेमी श्री जयराम सातपुते सर ,श्री लहू बोराटे सर यांच्याकडून प्रेरणा घेऊन ‘एक ओंजळ अन्नधान्य व एक रुपया वन्यजीवांसाठी’ या उपक्रमासाठी गोपाळवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यां , शिक्षक आणि ग्रामस्थांपर्यंत हा संदेश पोहचवा ,असे यावेळी बोलतांना मी म्हणालो.
अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटनेच्या सहकार्याने वन्यजीवांच्या संवर्धनसाठीच्या आणि दानापाणी ठेवण्यासंदर्भातील काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना सुद्धा आम्ही यावेळी विद्यार्थ्यांना दिल्या…
- पशु पक्षांसाठी पाणी ठेवताना मातीचेच भांडे वापरावे.प्लॅस्टीकचा वापर पुर्णपणे टाळावा.!
- धान्य संकलन करताना त्यात ज्वारी,बाजरी,तांदुळ यांचा समावेश असावा व ते गोळा करतानाच एकञित स्वरूपात गोळा करावे
- पक्षांसाठी धान्य ठेवताना ते शक्यतो शेळ्या खातील असे खाली ठेवु नये,ते उंचावर /टांगलेल्या स्थितीत ठेवावे.पक्षांना त्याच्याजवळ बसणे व खाणे सोईस्कर झाले पाहिजे.धान्य कुठेही फेकु नये ते किडे मुग्यांद्वारे फस्त होवु शकते
- पाणी व धान्याची सोय करताना नियमितपणा हवा..न चुकता नियमित ठेवावे यामुळे दररोज तेच पक्षी पाणवठ्यांवर भेटी देताना व आपल्या इतर नातेवाईक मिञांनाही हळुहळु घेवून आल्याने पाणवठ्यावरील पक्षांची संख्या व प्रजातींची संख्या हळुहळु वाढत जाते.
- नवीन पाणवठे तयार करताना पाण्याचे बाष्पीभवन कमी व्हावे यासाठी ते शक्यतो मोठ्या वृक्षाच्या सावलीखाली बांधावेत..!
- जे पाणवठे खुप उन्हात आहेत असे पाणवठ्यांवर तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने एका बाजुने बांबु व पोते/गोण्यांच्या सहाय्याने सावली देण्यासाठी प्रयत्न करावा(वरच्या बाजुने पक्षांना पाणी दिसले पाहिजे याची काळजी घ्यावी.)
या उपक्रमाच्या माध्यमातून भूतदया ,आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांच्या अंगी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे , अशा पद्धतीने आपण आपल्या घरच्या परिसरातही वन्यजीवांसाठी पिण्याचे पाणी ठेवून त्यांचे संवर्धन करा असे सांगत ,या उपक्रमात परिसरातील इतर शाळांनीही सहभागी होण्याचे आणि वन्यजीव व पर्यावरण राक्षणातील आपला खारीचा वाट उचलण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री राऊत सर यांनी यावेळी बोलताना केले.
हा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव ,उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव ,ग्रामपंचायत सदस्य सीताराम जाधव ,अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव ,मदतनीस छाया कुऱ्हे यांनी अतिशय मोलाची मदत केली.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर