छत्रपती शिवराज्याभिषेक – एक अपूर्व सोहळा
“निश्चयाचा महामेरू ,
बहुत जणांसी आधारू ,
अखंड स्थितीचा निर्धारु ,
श्रीमंत योगी..!!”
महाराष्ट्रातील जनाजनांवर आणि जनाजनांतील मनामनांवर अधिराज्य गाजवणारे, राजसारखे मन आणि मनासारखा राजा असं ज्यांच्यासाठी म्हंटल जातं असे महाराष्ट्राचे खरे ‘जाणते राजे’, राजे शिवछत्रपती ….!!
बालपणापासून महाराज किंवा राजे म्हंटल की एकच नाव, एकच राजे आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय, इयत्ता ४ थी ला असतांना शिकलेला इतिहास, पुस्तकाचे नावच मुळी ‘राजा शिवछत्रपती’ आणि त्यातील एक माझा आणि माझ्यासह महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी मावळ्यांचा आवडता धडा, धड्याचे नाव ‘एक अपूर्व सोहळा’ अर्थात छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा…..!!
‘एकचं धून ,सहा जून….!!’
गेल्या सात वर्षांपासून जेव्हा जेव्हा मी हा अदभुत सोहळा अनुभवतो तेव्हा तेव्हा मला या अदभुत सोहळ्याचे वर्णन करण्यासाठी फक्त आणि फक्त हेच शब्द आठवतात, ‘एक अपूर्व सोहळा’ खरंच इतका नितांत सुंदर, गर्वाने छाती फुलवणारा आणि यापूर्व कधीही पाहिला नसेल असा ‘अपूर्व सोहळा’…..!!
मध्ययुगीन भारतात जवळजवळ सारी भारतभूमी मुघलांच्या आणि महाराष्ट्रभूमी पाच शाह्याच्या टापाखाली भरडली जात होती, तेव्हा साक्षात राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने, अष्टप्रधान मंडळ, साधूसंत, अठरा पगड जातीचे, विविध धर्माचे स्वराज्य ह्या एकाच ध्येयाने प्रेरित झालेले हजारो मावळे यांच्या साक्षीने आणि लक्षावधी महाराष्ट्रीय गोरगरीब जनतेच्या आशेच्या रूपाने शिवराय छत्रपती झाले, शककर्ते झाले…!!
६ जून १६७४ मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक अदभुत, अभूतपूर्व, अपूर्व क्षण, तेव्हा ही हा सोहळा असाच ‘एक अपूर्व सोहळा’ होता आणि आज इतक्या वर्षानंतरही हा तसाच ‘एक अपूर्व सोहळा’ आहे…!!
त्याला कारणही तसेच होते आणि आहे, पाचशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्ततेचा पहिल्या स्वातंत्र दिनाचा, सार्वभौमत्वाचा हा क्षण …!!
आनंदातिशयने सहयाद्रीने, सहयाद्रीच्या दर्याखोऱ्याने उत्सव साजरा करण्याचा अलौकिक, अद्वितीय क्षण ….!!
युगायुगाच्या अंधारातून युगांताच्या क्षितीजापर्यंत नेणाऱ्या स्वराज्याच्या वैभवाचा, किर्तीचा क्षण…!!
युगप्रवर्तक, शककर्ता, प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावंतौस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधीराज, श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण क्षण ….!!
६ जून २०१९, ३४५ वर्षांपूर्वीच्या या अपूर्व सोहळ्याची आठवण करून देणारा, तितकाच दैदिप्यमान, दिमाखदार , वैभवशाली उत्साह, उल्हास, जोश, जल्लोष आणि आनंदाने भरलेला ३४६ वा शिवराज्याभिषेक सोहळा ….!!
आपल्या राजाच्या कौतुक सोहळ्याचा पुन्हा एकदा साक्षीदार होण्यासाठी नेत्रदीपक सजावटीने सजलेला दुर्गराज रायगड …!!
या राज्याभिषेक सोहळ्याला गतवैभव प्राप्त करून देणारे आणि तमाम मराठी जणांचे श्रद्धास्थान छत्रपती युवराज संभाजीराजे आणि युवराज कुमार छत्रपती शहाजीराजे, मा खासदार छत्रपती उदयनराजे …!!
या ऐतिहासिक सोहळ्याचे अविस्मरणीय क्षण याची देहा, याची डोळा पाहण्यासाठी फक्त राज्यच्याच नव्हे तर देशाच्या कान्याकोपर्यातून लाखोंच्या संख्येत उपस्थित शिवभक्त मावळे आणि पहिल्यांदाच असे काही अदभुत, अविश्वसनीय पाहणारे चीन, पोलंड, टुयनिशिया, ग्रीस, बुल्गेरियासह एकूण 5 देशांचे राजदूतही उपस्थित होते…..!
ढोल, नगारे, झान्ज यांचा दणदणाट, शाहिरी पोवाडे, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिके, मराठा लाईट इन्फेन्ट्रीचा कडक मिलिटरी बँड, नगरखाण्या समोरचा सारा आसमंत कवेत घेणारा रुबाबदार भगवा जरीपटका….!!
पुष्पांच्या सुंदर सजावटींनी सजलेली राजसदर आणि शिव समाधी स्थळ, तितकीच सुंदर शिवपालखी, मानाची सासनकाठी, पालखी बरोबरची अश्वारूढ शिवकन्या ….!!
आणि सोबतीला ऊन वारा, आभाळ, आणि अधून मधून बरसणाऱ्या पावसाच्या मंद सरी, दिल्लीच्या तख्तालहि हादरवून टाकणाऱ्या गगनभेदी शिव घोषणा, ललकाऱ्या….!!
अशा या जल्लोषपूर्ण वातावरणात युवराज आणि युवराज कुमार छत्रपतींच्या हस्ते मेघडंबरी वरील छत्रपतींच्या प्रतिमेवर सप्तगडावरील पाणी, पंचामृत, सुवर्ण मोहरा यांचा वैदिक मंत्रोचारांच्या साक्षीने अभिषेक करून राज्याभिषेक संपन्न झाला, यावर्षी राज्याभिषेक सोहळ्यात महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करीत असताना छत्रपती युवराज संभाजीराजे व युवराजकुमार शहाजीराजेंच्या सोबत राजसदरेवर बसण्याचा बहुमान उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाला देण्यात आला होता…!!
दोन वर्षांपूर्वी मा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली ‘रायगड विकास प्राधिकरणाची’ मुहूर्तमेढ आणि त्या विकास प्राधिकरणाच्या कामाला या सुरवातीच्याच काळात आलेली सुंदर फळे पाहून मनस्वी आनंद झाला, नाणेदरवाजाचा मार्ग आणि त्या मार्गातील उत्खननात सापडलेला ऐतिहासिक ठेवा यंदाच्या राज्यभिषेक सोहळ्याला आणखी आनंद देऊन गेला….!!
गेल्या सात वर्षापासून पहात आलेल्या, अनुभवत आलेल्या अशा या अपूर्व सोहळ्याचे पुन्हा एकदा साक्षीदार होता आले याचा मनस्वी आनंद, अभिमान आणि गर्व आहे ….!!
या वेळी सोबत होते माझा जिवलग मित्र शिवप्रेमी श्रीकांत गमे सर, अविनाश अडसरे सर, अर्जुन कराड सर आणि श्रीनिवास एल्लाराम हे माझे जिवलग शिवप्रेमी स्नेही…!!
या अपूर्व सोहळ्याचे माझ्यासाठीचे काही अविस्मरणीय सुवर्ण क्षण….!!
‘तुमचे आमचे नाते काय ….?
जय जिजाऊ ,जय शिवराय…!!
रक्ता रक्तात भिनलय काय ….?
जय जिजाऊ ,जय शिवराय…!!’