गोपाळवाडी शाळेची पहिली आंतरराष्ट्रीय व्हर्चुअल ट्रिप
✈ *गोपाळवाडी शाळेची पहिली* ✈
*आंतरराष्ट्रीय व्हर्चुअल ट्रिप*
*अर्थात*
*गोपाळवाडी ते ( क्रासनायर्क्स )*
*सैबेरिया ,रशिया*
*थ्रू*
*FACEBOOK VIDEOCALL…*
आज बुधवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी शाळेतील मुलांनी रशियातील सैबेरीया प्रांतातील येनिसेई नदीच्या काठी वसलेल्या (Krasnoyarsk) क्रासनायर्क्स या शहरातील शाळेत कार्यरत असणाऱ्या लॅरिसा तारासेविच मॅडम या National Geographic Certified Educator असणाऱ्या शिक्षिकेशी Facebook व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला.
मागच्या आठवड्यातील 15 फेब्रुवारी या दिवशीच आम्ही आजची वेळ ठरवून घेतली होती कारण भारतीय वेळ व तेथील वेळेत जवळजवळ दीड तासांचा फरक आहे. आज सकाळी आम्ही बरोबर 11.30 ला जेव्हा आमचा संवाद सुरू केला होता तेव्हा तिथे दुपारचे 1 वाजले होते .जेवणाची सुट्टी होऊन त्यांची दुपार सत्रातील शाळा सुरू झाली होती ,तरीही ठरलेल्या वेळे नुसार लॅरिसा मॅडम यांनी आमच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
सर्वप्रथम भारतीय पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांना नमस्कार म्हणून अभिवादन केले ,नंतर त्यांनी मागच्याच महिन्यात भारताला दिलेली भेट आणि त्या प्रसंगी जगप्रसिद्ध आग्र्यातील ताजमहाल ,कुतूबमिनार ,हुमायुनचा मकबरा ची भेट याविषयी सांगत आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणांच्या प्रतिकृती आणि फोटो दाखवून ही ठिकाणे ओळखायला सांगितली.
आपण या पूर्वी भारताला भेट दिली आहे का ? या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी नाही ही माझी पहिलीच वेळ होती असे सांगितले.तुमच्या देशाचे नाव काय असे विचारले असता आपल्या देशाचा राष्ट्रध्वज दाखवत त्यांनी रशिया असे नाव सांगितले आणि रशिया हा भारताचा खूप जुना मित्र आहे हे ही नमूद केले. आपल्या देशाविषयी अधिकची माहिती सांगतांना त्यांनी त्यांच्या देशातील राष्ट्रीय बाहुली ‘मतारेशका’ ही दाखवली – एकात एक अशा सहा बाहुल्या बसणारी ही वैशिष्ट्यपूर्ण बाहुली पाहून आमचे विद्यार्थी ही हरखून गेले.
आमचा देश तुम्हाला कसा वाटला हे विचारले असता ,खूप छान असे त्यांनी सांगितले ,दिल्लीतील सरकारी शाळेला भेट दिली होती आणि ती शाळा पण खूप छान वाटली असे त्यांनी सांगितले. इथले तुम्हाला सर्वाधिक काय आवडले असे विचारले असता ,तिथले लोक ….!! जे खूपच चांगले आणि प्रेमळ आहेत असे त्यांनी सांगितले.
आमच्या शाळेतील विद्यार्थी मोकळे पणाने संवाद साधत आहेत हे पाहून लॅरिसा मॅडम यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची ही आम्हाला भेट घडवली, पूर्व प्राथमिक वर्गातील हे चिमुकले विद्यार्थी अतिशय लाजत होते ,पण दूर देशातील आमच्या मुलांना पहिल्याच आंनद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता,त्यांची प्राथमिक शाळा ,शाळेचा परिसर यांची सुद्धा लॅरिसा मॅडम यांनी आमच्याशी भेट घडवली.
त्याचबरोबर रशियातील हवामान,पाऊस,पिके,प्राणी,आहार या विषयी माहिती फोटो दाखवून दिली.दोनच दिवसांपूर्वी लॅरिसा मॅडम यांचा वाढदिवस होता त्याच्या शुभेच्छा आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांना दिल्या , आमच्या चिमुकल्यांच्या शुभेच्छानी त्याही खुश झाल्या .तिकडे सध्या दुपारचे 1.30 मिनिटे झाली आहेत हे ऐकून मुलांना थोडेसे कुतूहुल निर्माण झाले होते.सैबेरियाचा हा प्रांत अतिशय शीत प्रदेश असून तिथे आता बर्फवृष्टी होतेय ,
बर्फवृष्टी झालेनंतर तेथील रस्ता व गाड्यांवरती साचलेला बर्फ याचे फोटोही त्यांनी मुलांना दाखवले.
तसेच रशियातील महत्वाची ठिकाणे ,त्यांच्या शहराच्या जवळून वाहणारी येनिसेई ही नदी यांचीही माहिती मुलांना दिली.
पुढच्या वेळी भारतात आल्यानंतर महाराष्ट्रात मुंबई आणि गोपाळवाडी शाळेला नक्की भेट देण्याचे लॅरिसा तारासेविच मॅडम यांनी मुलांना आश्वासन दिले.
*लॅरिसा तारासेविच मॅडम यांचे मनोमन आभार कारण त्यांनी वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला.*
या वर्षी यापूर्वी गोपाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतमातेच्या सीमांचे रक्षण करणारे आमच्या गोपाळवाडीचे भूषण BSF जवान दीपक गायकवाड यांच्याबरोबर काश्मीर येथून तर NCERT च्या AIL च्या गुजरातमधल्या मास्टर ट्रेनर निमिषा परमार मॅडम यांच्या बरोबर व्हर्चुअल ट्रिपच्या माध्यमातून संवाद साधला ,पण भारता बाहेरील व्यक्तीशी हा आमचा पहिलाच संवाद होता…..!!
इंग्रजी बोलण्यात विद्यार्थ्यांना अडचण जाणवत असली तरी म्हणतात ना मन जुळली की संवादाला मर्यादा येत नाहीत ,मी विद्यार्थ्यांचा दुभाषी म्हणून हा संवाद यशस्वी करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला….!!
*शब्दांकन*
*नारायण मंगलारम*
*जि प प्रा शा गोपाळवाडी*
*ता राहुरी ,जि अहमदनगर*