लाभले आम्हांस भाग्य,बोलतो मराठी
लाभले आम्हांस भाग्य … बोलतो मराठी …
अर्थात
जागतिक मराठी राजभाषा दिन
२७ फेब्रुवारी २०१९
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
संतश्रेष्ठ माऊलींनी सुद्धा ज्या भाषेची थोरवी वर्णन करतांना अमृतांशीही पैजा जिंकणारी म्हणून वर्णन केला अशी आपुली मायबोली अर्थात मराठी ….!!
माझ्या मराठीचा संग
तिला तुक्याचा अभंग
तिच्या आबीराचा रंग
काय वर्णावा….!!
जीचा महीमेच वर्णन करता येत नाही अशी ही आपुली मायबोली अर्थात मराठी ….!!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..!!
गझल सम्राट सुरेश भटांची ही मराठी भाषा अभिमान जागवणारी कविता सादर करणारी कोमल असेल .
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा..!!
ही मराठी भाषेविषयी गौरवास्पद वर्णन करणारी कुसुमाग्रजांची कविता सादर करणारा शुभम असेल.
माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवीत….!!
ही मराठी भाषेची गोडी वर्णन करणारी वि म कुलकर्णी यांची कविता सादर करणारी चिमुकली स्वरांजली असेल. असे एका मागे एक आमचे चिमुकले विद्यार्थी येत होते आणि अशाच एका पेक्षा एक बहारदार कविता सादर करत होते.
निमित्त होते आपल्या महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील मानबिंदू ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त जेष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर ( तात्यासाहेब ) यांची जयंती जी संपूर्ण जगात ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरी केली जाते त्याचे …..!!
मराठी भाषेची थोरवी सांगणाऱ्या या किवतांच्या अभिवाचनानंतर,
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना…!!”
ही कुसुमाग्रजांचीच वेगळ्या धाटणीतील ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ ही कविता ओंकार याने सादर केली.त्या चिमुकल्या ओठातून इतकी आशयघन कविता ऐकतांना खरंच मनातून वाटलं की लाभले आम्हास भाग्य ऐकतो मराठी ……!!
प्रेमगीतासारखा वेगळा विषय हाताळल्यावर ,
गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के!
ही आमच्या जयश्रीने विंदांच्या कवितेच्या माध्यमातून आजच्या राजकीय परिस्थितीचे यथोचित वर्णन करणारी कविता अगदी थेट विंदांच्या पावलावर पाऊल ठेवून सादर केली आणि उपस्थित बालगोपालांची वाह वाह मिळवली…..!!
विंदांची ही राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी कविता ऐकून आमच्या अजितने वातावरण पुन्हा हलके फुलके करण्यासाठी ,
“विठोबापुढे
ठेवून वही
उदयने मागितली
त्याची सही.
विठोबा म्हणाला
त्याला मजेत,
“देवांना नसतें
लिहायला येत!”
ही आणि
“सोलापूरहून
येते काकू;
माझ्यासाठी
आणते चाकू.
कोल्हापूरहून
येते आते;
माझ्यासाठी
आणते पत्ते.
राजापूरहून
मावशी येते;
माझा एक
पापा घेते.!!”
ही ,ह्या विंदांच्याच दोन अतिशय लहान पण अशयाने महान असणाऱ्या कविता सादर करून सगळ्यांनाचा थक्क केले ….!!
वातावरणातील ही आल्हाददायक परिस्थिती तशीच ठेवत किंबहुना त्यात आणखी रंग भरत आला रोहन आणि घेऊन आला ,
गुंडूच्या स्वप्नात आला चेंडू
आणि म्हणाला , ” ए गुंडू ,मला आलेत दोन पाय ,
आता तुला सोडणार नाय “
ही विंदांच्या अतिशय मजेशीर अशी बालकविता सादर करून मराठी राजभाषा दिनाच्या या कार्येक्रमात एक वेगळीच रंगत निर्माण केली…..!!
इयत्ता तिसरी चौथीच्या आपल्या बांधवांच्या मोठं मोठ्या कवींच्या या सुंदर सुंदर कविता ऐकून पहिली दुसरीचे त्यांचे बांधव प्रेरित झाले नसते तरच नवल झाले असते ,त्यांनीही मी मी म्हणून एकच गिल्ला केला आणि मग सगळ्यात आधी पुढे आला पहिलीच पृथ्वीराज ,आपल्या भावंडांसारखा जाऊन थेट त्या कवितेचे अभिवाचन करणाऱ्या आपल्या भावंडांच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि लगेच सुरू झाला ,
“अग्गोबाई ,ढग्गोबाई लागली कळ ,
ढगांना उन्हाची केवढी झळ ….!!
संदीप खरेंची ही इयत्ता पहिलीच्या पुस्तकातील अबाल वृद्धांच्या अत्यंत आवडीची कविता सादर करून त्याने शालेय प्रांगणाला डुंबायच्या डबक्याचा तलावच केला जणू ,पण इथे सगळे मराठी भाषेच्या रसास्वादात आकंठ डुंबले होते …!!
त्याचे पाहून अतिशय खोडकर पण चुणचुणीत असणारा महेश उर्फ छोट्या पुढे आला आणि खुर्चीवरून थाटात त्याने ही ,
“लोठे बाबा ,लोठे बाबा ,
आठ तास दिवसा आठ तास रात्री ….”
ही पाहिलीच्याच पाठयपुस्तकातील कविता सादर करून सगळ्यांनाच मनसोक्त हसवले…..!!
ही कविता ऐकून आमच्या इयत्ता पहिलीच्या एकताने,
” गाडी आली गाडी आली चला पळा रे,
गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे ….!!” ही मुलांना आवडणारी कविता तिच्या तितक्याच नाजूक आवाजात पण अतिशय तन्मयतेने सादर केली….!!
मग तिसरीच्याच कोमलने पाठयपुस्तकातील ‘दोस्त’ तर दुसरीच्या कृष्णाने ‘जाऊ फुलांच्या जगात ‘ ही कविता सादर केली …!!
हे सगळे चालू असताना मग पुन्हा आमची स्वरांजली म्हणाली, “सर मी हंबरून वासराले चाटती जवा गाय” ही कविता गाऊन दाखवू …..!!” हो म्हणताच त्या लेकरांने जो सूर लावला की बस ऐकतच राहावं …….!!
कविता वाचनाच्या या कार्यक्रमानंतर मराठी भाषेचे अलंकार असणाऱ्या गौळण ,भावगीत ,भक्तीगीत ,पोवाडा हे ही गीत प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले …..!!
संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडीओ लवकरच आपल्या भेटीला Youtube च्या माध्यमातून येणार आहे ….!!
राजभाषा दिनाच्या दिवशी आपल्या मातृभाषेचे हि श्रीमंती अनुभवून तृप्त होऊन कार्यक्रम संपन्न झाला …..!!
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर