जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त गोपाळवाडीत 108 कविता/ गीतांचे मॅरेथॉन अभिवाचन गायन….!!
“माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा ,
हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा ..!”
ही कुसुमाग्रजांची मराठी भाषेची महती सांगणारी कविता …!!
“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी ,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ,
धर्म पंथ जात एक मानतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी ….!”
हे मराठीची कीर्ती वर्णन करणारे सुरेश भटांचे गीत …!!
“उठ उठ सह्याद्रे घुमवित बोल मराठी खडे ,
समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे ….!!”
हे विंदांचे स्फूर्तिगीत असेल ….!!
अशी एका मागे एक मराठी भाषेतील गीत ,कविता यांचे वाचन गायन विद्यार्थी गोपाळवाडीच्या चौका चौकात करत होते .औचित्य होते आजच्या कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीचे जो दिवस ‘जागतिक मराठी राजभाषा दिन’ म्हणून आपण साजरा करतो , त्यानिमित्त आज गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी शाळेने कविता, बडबडगीते ,बालगीते ,भक्तिगीते ,भजन ,गौळण ,अभंग ,भारुडे,पोवाडे ,देशभक्तीपर गीते ,गझल आदी विविध प्रकारच्या पद्य साहित्याचे अभिवाचन ,गायन गावात विविध चौकात आयोजित केले होते.
त्यासाठी गावातील चार चौकात कविवर्य कुसुमाग्रज कट्टा ,कविवर्य विंदा करंदीकर कट्टा ,कविवर्य मंगेश पाडगावकर कट्टा आणि कवियत्री बहिणाबाई चौधरी कट्ट्यावरून आयोजित करून या कट्ट्यावरून पालक ,ग्रामस्थांच्या समक्ष मॅरेथॉन १०८ पद्य प्रकारांचे अभिवाचन गायन करण्याचा आणि मराठी भाषेचा डंका घरा घरात ,चौक चौकात वाजवणारा कविता/ गीते वाचन गायनाचा मॅरेथॉन उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
“आकाशातला हत्ती ,जमिनीवर आला ,त्याने लोळून ,एक खड्डा केला …” ही विंदांची बालकविता पाहिलीतल्या मंजू हपसेच्या मुखातून ऐकून तिचे पालक जाम खुश झाले ,तिचे पाहून मग श्रावणी सुद्धा आपल्या बोबड्या बोलत , “अग्गोबाई ,ढग्गोबाई म्हणायला लागली ….!” , अजित आमचा शाळेचा मुख्यमंत्री मग त्याने कुसुमाग्रजांची , ‘कणा’ अतिशय आवेशात सादर केली. मागे राहील ती प्रियांका कुठली मग तिने सुद्धा , ‘माझ्या मराठीची गोडी ,मला वाटते अवीट ….!!’ ही वि म कुलकर्णींची कविता तालात सादर केली .
साईराज तरावडे ,कृष्णा जाधव , आकाश काळापहाड ,निलेश कुर्हे ,एकता गायकवाड ,भक्ती गायकवाड , श्वेता गावांदे यांच्या सह सर्वच विद्यार्थ्यांनी कोणी दोन ,कोणी तीन तर कोणी पाच -सहा कविता गीते सादर केली आणि सगळी गोपाळवाडी मराठीमय करून टाकली.
” मराठी ही आपल्या महाराष्ट्राची राजभाषा असण्याबरोबरच मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचे प्रतीक सुद्धा आहे ,प्रत्येकाला आपल्या या भाषेचा अभिमना वाटावा ,आपल्या या भाषेची श्रीमंती लक्षात यावी म्हणून हा उपक्रम आम्ही चौक चौकात आयोजित केला.” असे शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत म्हणाले.
“मराठी ही आपली राजभाषा असण्याबरोबरच एक समृद्ध भाषा आहे ,याची जाणीव विद्यार्थ्यांत निर्माण करण्यासाठी आणि हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे देऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही आज हा उपक्रम आयोजित केला ,ज्यात विद्यार्थ्यांनी अगदी बडबडगीते ,बालगीते ,आपल्या पाठय पुस्तकातील कविता ,भक्तिगीते ,गौळण ,भारुड ,अभंग ,अंगाई गीते ,पोवाडा ,स्फूर्तिगीत अशी चौफेर काव्य वाचन आणि गायनाची मेजवानी पालकांना त्यांच्या अंगणात उपलब्ध करून दिली.” असे नारायण मंगलारम सर म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या या काव्य वाचन गायनाने प्रेरित होऊन चेडगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ज्ञानदेव जाधव यांनी ही एक अभंग सादर केला ,तर इयत्ता बारावी ला शिकणारी विद्यार्थिनी प्रीती संजय जाधव हिने सुंदर अशी भावगीते सादर करून आपणही या कार्यक्रमात रंग भरले.
यावेळी विद्यार्थ्यांनी हातात मराठी साहित्यातील ‘ययाती ,छावा , मृत्युंजय ,बनगरवाडी ,गुलामगिरी ,शेतकऱ्यांचे आसूड, राणीची बाग, बटाट्याची चाळ ,अजबखाना ,विशाखा अशा काही अजरामर साहित्य कृतींच्या मुखपृष्ठाचे बॅनर हातात धरून विद्यार्थ्यांनी हे साहित्य पालकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी ‘लाभले आम्हांस भाग्य …..!!’ हे गीत विद्यार्थ्यांनी अतिशय कलात्मक सादर करून आजचा दिवस हा मराठीमय करून टाकला .मराठी प्रतिज्ञा घेण्यात येऊन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,सीताराम जाधव ,दादासाहेब जाधव ,राजू जाधव आदींनी अतिशय मोलाचे सहकार्य केले.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर