जिल्हा परिषद गोपाळवाडी ,ता राहुरीची शाळा भरणार थेट मंगळावर
“या वाऱ्याच्या बसुनी विमान
सहल करूया गगनाची ,
चला मुलांनो आज पाहूया
शाळा चांदोबा गुरुजींची …!!”
वाऱ्याच्या विमानी बसून ,आकाशाच्या वर्गात भरणाऱ्या ‘चांदोबा गुरुजींच्या शाळेचे’ हे गीत आपल्या बालपणी ऐकले नसेल असा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात तरी विराळाच ,पण आता अहमदनगर जिल्ह्यातील ,राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषदेची शाळा थेट ‘मंगळ’ ग्रहावर भरणार आहे , त्यासाठीचे शाळा ,शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही बोर्डिंग पास आले आहेत …!!
मथळा आणि वरचा परिच्छेद वाचुन बुचकुळ्यात पडलात ना ,तर त्याचे असे आहे की, अमेरिकेच्या National Aeronautics & Space Administration अर्थात ‘नासा’ या जगतविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे ‘मंगळ रोव्हर 2020’ हे अंतरिक्षयान ‘लाला ग्रह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे ,या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे.ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत
नासाच्या पसाडेना ,कॅलिफोर्निया येथील जेट प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या ( JPL ) मायक्रोडिव्हायसेस लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिप वर मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या ( 75 नॅनोमिटर ) रुंदीत आपण नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत. इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. ह्या चिप रोव्हर वर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जातील .
“या ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी रोव्हर तयारी करत असताना ,सर्वजण या नव्या मोहिमेत सामील व्हावेत ,सर्वाना याची माहिती व्हावी असे आम्हाला वाटते ” असे नासाच्या वॉशिंग्टन येथील ‘सायन्स मिशनचे डारेक्टरेट’ (SMD) थॉमस झुरबुचेन म्हणाले.त्याअंतर्गत इथल्या जि प शाळा गोपाळवाडीच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व शाळेचेही नावे या उपक्रमसाठी नोंदवले होती ,त्याची ऑनलाईन आलेले बोर्डिंग पासचे वाटप शाळेत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव ,दादा जाधव , अहिलाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले ,ज्ञानदेव जाधव यांनी शिक्षकांचे कौतुक करतांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या ….!!
“या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नासा ही अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणारी संस्था ,मंगळ ग्रह – त्या ग्रहावरची नासाची चालू असलेली मोहीम आणि पाठवले जाणारे रोव्हर 2020 हे अवकाशयान यांची माहिती मिळेल”,असे शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत हे म्हणाले.
“आम्ही विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना या नव्या क्षेत्राची प्राथमिक माहिती व्हावी ,तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या चिमुकल्यानी आपली नावे मंगळावर पाठवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच आम्ही विद्यार्थ्यांना नासाच्या रोव्हरच्या काही चित्रफिती दाखवून त्यांच्या ज्ञानात भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे .” असे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम हे म्हणाले.
आतापर्यंत जगभरातून 70 लाख पेक्षा अधिक लोकांनी यासाठी आपली नाव नोंदणी केली आहे , एकट्या तुर्की या देशातून 24 लाख पेक्षा जास्त नोंदणी झाली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आपला भारत देश आहे ,भारतातूनही 8 लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपले नाव मंगळावर पाठवण्यासाठी नोंदवले आहे.
“आम्ही आमच्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची नावे या माध्यमातून मंगळावर पाठवण्यासाठी नोंदवली आहेत ,तुम्ही सुद्धा 30 सप्टेंबर 2019 च्या रात्री 11.59 पर्यंत आपल्याला या उपक्रमांतर्गत नाव मंगळावर पाठवण्यासाठी mars. nasa.gov या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे ,तरी भारतातून जास्तीतजास्त लोकांनी आपले नाव नोंदवून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊयात ,आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा ,अवकाश संशोधन शास्त्राचा प्रचार प्रसार करूयात “,असे ही नारायण मंगलारम हे म्हणाले.
रोव्हर 2020 हे यान ‘ऍटलस V 541 या रॉकेट च्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून 17 जुलै 2020 ते 5 ऑगस्ट 2020 मध्ये लॉन्च केले जाणार आहे जे 2021च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे.
या उपक्रमांतर्गत आपले नाव मंगळावर पाठवण्यासाठी खलील लिंकला स्पर्श करा आणि आपला बोर्डिंग पासही मिळवा….
https://go.nasa.gov/Mars2020Pass
- नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
केंद्र उंबरे ,ता राहुरी
जि अहमदनगर