वाचन प्रेरणादिनी विद्यार्थ्यांनी केली मतदार जनजागृती
वाचन प्रेरणादिनी विद्यार्थ्यांनी केली मतदार जनजागृती …!!
त्यातून
चिमुकल्या पंखाना आणि लोकशाहीला बळ देणारा प्रेरणादिन
अर्थात
वाचनप्रेरणादिन ….
जागतिक अंधदिन….
जागतिक हात धुवादिन ….
स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती…
आज मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ रोजी आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,केंद्र उंबरे ,ता राहुरी ,जि अहमदनगर येथे भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिम्मित ‘वाचनप्रेरणादिन’ , तसेच जागतिक पातळीवरचा ‘जागतिक अंध दिन’ ‘जागतिक हात धुवा दिन’ आणि
महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक निवडणूक निमित्त
‘स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती’
मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला …..!!
या वेळी सर्वप्रथम प्रास्ताविक करताना शाळेतील शिक्षक श्री नारायण मंगलारम यांनी या तीनही दिनाचे औचित्य आणि ते राज्यभर ,भारतभर किंवा जगभर कसे साजरे केले जातात याची थोडक्यात माहिती दिली ,वाचनप्रेरणादिन ज्यांच्या प्रेरणेने साजरा केला जातो आशा भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याची ,त्यांच्या संघर्षाची ,देशसेवेची ,साहित्यप्रेमाची थोडक्यात ओळख करून दिली.
मुख्य मार्गदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत सर यांनी विद्यार्थ्यांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवनापासून ,वाटचालीपासू प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपले जीवन घडवले पाहिजे ,’वाचलं तर वाचलं आणि सब पढे, सब बढे’ हे सांगितलं. तसेच जागतिक अंध दिन ,अंधांच्या समस्या ,त्यांच्या प्रति आपली कर्तव्ये ,लुई ब्रेल यांचे अंधांसाठीचे कार्य ,ब्रेल लिपी यांची माहिती अतिशय ओघवत्या भाषेत सांगितली .
जिथे जिथे दिसते पुस्तक,
तिथे व्हावे नतमस्तक.
जिथे पुस्तकांचा साठा,
तिथे समृद्धीचा नाही तोटा.
ग्रंथ हे आपले गुरु,
वाचनासाठी हाती धरू.
आशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी शालेय परिसर दणाणून सोडला.
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि निवडणूक हा या लोकशाहीमधील सर्वात मोठा उत्सव तेव्हा त्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि 100 टक्के मतदान करून लोकशाहीची शान वाढवावी असे आवाहन राऊत सर यांनी केले.
नारायण मंगलारम यांनी ‘वाचन प्रेरणादिनाच्या निमित्ताने’ मराठी भाषेतील काही अभिजात साहित्यकृतींच्या पुस्तकांच्या कव्हरचे लार्ज प्रिंट करून आणले होते आणि त्यातून विद्यार्थ्यांना ,’ययाती ,मृत्यूंजय ,छावा ,शेतकऱ्यांचे आसूड ,गुलामगिरी ,बटाट्याची चाळ ,राणीची बाग ,अजब खाना ,भारतीय संविधान यांची ओळख करून दिली.
नंतर विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणदिनाच्या निमित्ताने काही कविता वाचन ,गीत गायन केले – साईराज तरवडे याने ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कवी विंदा करंदीकरांची ‘आकाशातला हत्ती’ ही बालकविता अतिशय भारदस्त पद्धतीने सादर केली ,अजित ब्राम्हणे याने ज्यांची जयंती आपण ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरी करतो आशा ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या कुसुमाग्रजांची ‘ कणा ‘ ही कविता आपल्या ढंगात सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना जिंकून घेतले.प्रियांकाने सुद्धा विंदांची ‘आयुष्याला द्यावे उत्तर’ ही जगण्याचे बळ देणारी कविता अफलातून अशी सादर केली.
“बिनभिंतींची उघडी शाळा ,
लाखो इथले गुरू ,
झाडे वेली पशु पाखरे ,
यांशी गोष्ट करू ….!!
यंदाचे वर्ष हे वरील कवितेची रचना करणारे आधुनिक वाल्मिकी अर्थात ‘ग दी माडगूळकर’ यांचे आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असणाऱ्या पु ल देशपांडे यांच्या जन्म शताब्दीचे वर्ष म्हणून आपण साजरे करतो आहोत ,महाराष्ट्राच्या या दोन महान सुपुत्राना त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी आदरांजली म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या काही रचना आजच्या दिवशी सादर केल्या – गोपाळवाडी शाळेची गाणं कोकिळा अर्थात स्वरांजली जाधव हिने तिच्या गोड आवाजात सर्वप्रथम गदिमा गीतकार असणारे आणि पुलंनी जे गीत संगीतबद्ध केले आहे असे अबालवृद्धांचे आवडते गीत ‘नाचरे मोरा आंब्याच्या वनात…..’ हे एक लोकप्रिय गीत तिच्या मधुर अशा आवाजात सादर केले ,त्यांनतर स्नेहल कुर्हे हिने आपल्या बहारदार कविता वाचनानंतर ‘गोरी गोरीपान फुलासारखी छान …’ हे एक सुंदर बालगीत सादर करून वातावरणात चैतन्याचे रंग भरले …..!!
गदिमांच्या या सुंदर गीतांनी त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर कृष्णा जाधव याने पुलंच्या ‘तुम्ही कोण होणार ,मुंबईकर ,पुणेकर की नागपूरकर’ या एकपात्री कथाकथनातील ‘जाहीर पुणेरी आणि खाजगी पुणेरी’ हे छोटा एकपात्री कथाकथन अगदी पुलंच्या स्टाईल मध्ये सादर करून उपस्थितांचा भरपूर हशा आणि टाळ्या मिळवल्या.
या नंतर विद्यार्थ्यांनी ‘स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती करण्यासाठी दिवाळीचे औचित्य साधून उपस्थित पालकांना दिवाळीच्या आकारातील भेटकार्ड, त्यावर मतदार जनजागृतीपर शुभेच्छा लिहून दिले.
“वाचाल तर वाचाल ,
आणि
मतदान कराल तर वाचाल…!”
“ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा ,
योग्य उमेदवारच निवडून द्यावा…!”
“एक बार वोट करके तो देखो ,
अच्छा लागता है ….!!”
आशा शुभेच्छा लिहिलेली आणि दिव्याच्या आकारातील शुभेच्छा पत्र पाहून पालकांनी 100 टक्के मतदान करण्याचा शब्द विद्यार्थ्यांना दिला.
या वाचन प्रेरणदिनाच्या कार्यक्रमानंतर राऊत सर आणि अंगणवाडी सेविका श्रीम जाधव मॅडम ,कुर्हे मॅडम यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे 7 नियम सांगितले आणि सगळ्यांना प्रत्यक्ष साबणाने स्वच्छ हात धुवायला लावले ,त्याच बरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी आणि आरोग्यदायी सवयीचे महत्व पटवून सांगून त्यांचे उदबोधन केले.
यानंतर विद्यार्थ्यांना डॉ अब्दुल कलाम यांच्या जिवनावरील ‘उडान’ हा माहितीपट तसेच भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिले पुस्तकांचे गाव असणाऱ्या भिलार या गावाविषयीच्या माहितीचा ‘भिलार – पुस्तकांचे गांव’ हा माहितीपट दाखवला.
सकाळच्या या कार्यक्रमांनी भरगच्च राहिलेल्या पहिल्या सत्रानंतर दुपारी जेवणानंतरच्या दुसऱ्या सत्रात सर्व विदयार्थी आणि शिक्षक यांनी शालेय परिसरातील ‘डॉ ए पी जे अब्दुल कलाम वाचन कट्ट्यावर’ बसून गोष्टीची ,चित्रांची ,द्वैभाषिक पुस्तके यांचे सलग २ तास वाचन केले आणि खऱ्या अर्थाने ‘वाचनप्रेरणादिन’ साजरा केला.तसं शाळेत रोजच दुपारच्या सुट्टी नंतर विद्यार्थी वाचन करत असतात पण आजच्या दिवसाच्या विविध कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा वाचनासाठीचा उत्साह काही औरच होता .
“वाचन संस्कृती घरोघरी ,
तिथे फुले ज्ञानपंढरी…..!”
असा हा घरा घरात वाचन संस्कृती निर्माण करणारा ,ज्ञानपंढरी फुलवणारा आजचा हा दिवस आमच्या गोपाळवाडीच्या ‘चिमुकल्याच्या पंखामध्ये प्रेरणेचे नवे बळ’ देणारा ,खूप काही अनुभव देणारा ,समृद्ध करणारा ,शिकवणारा असाच मोठया उत्साहात ,आनंदात संपन्न झाला……!!
शब्दांकन
नारायण मंगलारम