जाऊ पक्षांच्या जगात….!! अर्थात पक्षांची गणना करतांना
जाऊ पक्षांच्या जगात….!! अर्थात पक्षांची गणना करतांना
“चिऊ ये ,दाना खा ,
पाणी पी ,भुर उडून जा…”
हे बडबड गीत ऐकल नाही असं महाराष्ट्रात विराळाच नाही का ….? किंवा हा चिऊताईचा घास ,हा काऊताईचा घास असं ऐकत ऐकत महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातल्या चिमुकल्याने कदाचित आपला पहिला घास घेतला असेल.
चिमणीच घरटं होत मेणाच आणि कावळ्याच घरटं होतं शेणाच हि किंवा तहानलेला कावळा ही तर अबाल वृद्धांची आवडती गोष्ट ….!!
‘घर चिमणी’ हा तसा सगळीकडे सहज आढळणारा पक्षी ,साधारण 2010 पर्यंत शहरातल्या ही घराघरात हा पक्षी अगदी सहज दिसायचा ,अंगणामध्ये दाणे वेचणारा अगदी घरात सुद्धा येणारा म्हणूनच जुन्या पुस्तकात सुद्धा ‘पाखरांची शाळा’ सारखी कविता सुद्धा होती पण आताशा हा पक्षी शहरातून जवळजवळ गायब झाला आहे ,ग्रामीण भागात तसा हा पक्षी अजून दर्शन देतोय म्हणा ,जी स्थिती चिमण्यांची तीच कावळा ,कबुतर ,पोपट यासारख्या पूर्वी सहज दिसणाऱ्या आणि चिरपरिचित असणाऱ्या पक्षांची …..!!
हे असेच चालू राहिले तर लवकरच आपल्याला अनेक वैशिष्ट्यपूर्ण पक्षांना कायमचे मुकावे लागेल आणि ते पक्षी आपल्याला फक्त गोष्टीत ,पुस्तकात किंवा चित्रातच पाहायला मिळतील ,ही परिस्थिती बदलली पाहिजे , आपल्याला आपल्या भोवतालचे पर्यावरण समजले पाहिजे या साठी ,आपल्या परिसरातील अनोळखी पक्षांची माहिती व्हायला पाहिजे ,त्यांची गणना व्हायला पाहिजे या सगळ्या उद्देशाने डोळ्यासमोर ठेवून अहमदनगर जिल्हा पक्षी गणना उपक्रम 2019 – वर्ष 10 वे मध्ये आम्ही भाग घेतला.
त्या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे शुक्रवार दिनांक 25 जानेवारी 2019 रोजी आयोजित पक्षी निरीक्षण व पक्षी गणना या उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत पक्षी निरीक्षण आणि गणना करण्याचा आनंद घेतला….
चेडगांव ग्रामपंचायत अंतर्गत गोपाळवाडी वस्ती ,परिसरातील शेती ,दोन मोठ्या विहिरी या ठिकाणी आपल्या परिसरातील आढळणाऱ्या विविध पक्षांची माहिती विद्यार्थ्यांनी बॉम्बे न्याचुरल हिस्ट्री सोसायटीचे सन्माननीय सदस्य आणि जिल्ह्यातील जेष्ठ पक्षी निरीक्षक श्री जयराम सातपुते सर यांच्या सहकार्याने आणि शाळेतील शिक्षक श्री नारायण मंगलारम सर यांच्या मदतीने समजाऊन घेतली,
‘नर सुगरण आपल्या मादी साठी सुंदर असे घरटे विणतो ,ते घरटे मादीला आवडले नाही तर नर सुगरण ते घरटे अर्धवटच सोडून देतो ,अशी अनेक घरटी आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात …..!!’ हे असेल किंवा ‘भारतीय उपखंडात आढळणारा हा पक्षी साधारणपणे नेहमी 6 ते 10 च्या गटात आढळतो ,म्हणून याला ‘सात भाई’ म्हणतात ….. ‘ , ‘रवीराजची कीर्ती गाणारा गोड गळ्याचा भाट – कोकीळ’ किंवा ‘सप्तरंगी इंद्रधनुषी रंग आपल्या पंखांवर ल्यालेला आपला राष्ट्रीय पक्षी मोर’ अशी एक ना अनेक पक्षांविषयीची मनोरंजक माहितीसह पर्यावरणाचे समतोल राखण्या साठी पक्षी संरक्षणाचे महत्व यावेळी मुलांना समजावून सांगितले , त्याच बरोबर पक्षी निरीक्षणातील बारकावे , पक्षांच्या वेगवेगळ्या जाती , प्रजाती कशा ओळखायच्या याचेहि मार्गदर्शन मुलांना केले, आपण आपल्या अवतीभवती रोज पाहत असणारे हे विविध पक्षी त्यांच्या विषयीची मनोरंजक माहिती ,काही ओळखीच्या पण नावे माहीत नसलेल्या पक्षांची नावे माहीत करून घेऊन ,त्यांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना ‘पक्षांच्या जगात फेरफटका मारून’ खूप आनंद झाला ….!!
मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या 19 पक्षांचे निरीक्षण व गणना यावेळी केले. या मध्ये 256 पक्षांची गणना केली ,त्याची माहिती अहमदनगर जिल्हा पक्षी अभ्यास तज्ञांकडे सुपूर्त करून पक्षी गणना संपन्न झाली.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी ,
ता राहुरी जि अहमदनगर