National Teacher Award Winner 2020 - Smart use of Technology in school education

वाढदिवस माझ्या टूटुनचा…वाढदिवस लाडक्या डुग्गुचा ….

General 1817

#वाढदिवस माझ्या टूटुनचा…

#वाढदिवस लाडक्या डुग्गुचा ….

प्रिय तनिष्का,

      २५ जानेवारी २००६ ला लक्ष्मीच्या पावलाने तु आमच्या घरात आलीस आणि माझं अवघ जीवनच व्यापून राहिली आहेस त्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली. १३ वर्षांपूर्वी आमच्या आयुष्यतही नसलेली तू , आज तुझ्याशिवाय आमचं आयुष्यच नाही ,अगदी काल परवा आयुष्यत आली अशी वाटणारी तू ,किती भराभर बदलत आहे सगळं… किती लवकर लवकर मोठी होत आहेस … वयानं आणि समजूतीने पण ….. जन्मानंतर दुसऱ्या दिवशी मी तुला पाहिलं ,वास्तविक तू येणार म्हणल्यावर मी तिथे असायला हवा होतो पण ….. पाहिल्यादा तुला पाहिलं आणि कायमचाच तुझ्या प्रेमात पडलो ,आता काही दिवसांपूर्वीपर्यंत सोफ्याच्या एका कोपर्यात मावणारी आणि हॅप्पी मॅन सारखे दोन्ही हात वर करून झोपणारी तू, झोपेत इवल्याशा वळलेल्या बाळ मुठी एका वेगळ्याच लयीत पोटावर फिरवणारी आजून आहेस डोळ्यासमोर ,काका ला ताता ,करुणा आत्याला तरुणा अत्या असं ‘क’ ला ‘त’ म्हणतानाचे तुझे बोबडे बोल ,त्या बोबड्या मुखातून अगणित वेळा ऐकलेली कित्येक बडबड गीतं …. तुझी कढईची अदा आणि गंगुबाईवर नगरकर कसे झालते फिदा ,आज सगळं सगळं आठवतंय….. गल्लीत तू एकटीच लहान म्हणून लहानपणी एकटीच  खेळणारी तु कधी जिवाभावाच्या मैत्रिणींमध्ये ,तुझ्या बहिणींमध्ये रमायला लागली समजलंच नाही ,लुटू लुटू चालतांना ही अडखळणारी ,पाहील्यांदा सायकल चालवतांना पाहून किती आंनद झाला होता मला आणि आताशी लगेच गाडी चालवायचे विचार येतात तुझ्या मनी….,अण्णाची गोटीराम ,मोठ्या पापांची टिंगुबाळ ,सोनू काकांची बुट्या ,मम्मीची चिऊताई ,सिद्धी बाळाची बोचू दीदी आणि अरुष आणि अनुश्रीची ‘त’ दिदी आज बघता बघता १३ वर्षांची झाली….!!

        बघता बघता आज तुझ्या मम्मीच्या उंचीला आलेली तू आमचीच आई सारखी माया , प्रेम आणि काळजी करतेस… मम्मीला तिच्या कामात मदत करतेस आणि स्वतःच सगळं स्वतःच आवरून घेतेस ,अगदी गुणी बाळ ती…. तसं १३ म्हणजे हे काही फार मोठे वय नाही पण तु तर लहान पणा पासून अशीच  खेळकर असली तरी समजूतदार आहेस ,अवखळ असली तरी कधी कोणाला त्रास दिला नाहीस आता पर्यंत कधी हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हट्ट केलेला आठवत नाही की कधी रड़ा रड ,पडा पड़ केलेले स्मरत नाही ….. तरीही तुझ्याच असण्याने घर भरून जातं ,घरात शिरल्या शिरल्या पहिला प्रश्न मनात येतो ‘माझी टूटुन कुठे आहे….? अभ्यासापेक्षा  खेळण्यात ,बागडण्यात ,नृत्यात ,संगीतात, अभिनयात आणि भावंडात रमणारी तू ,एखाघ्या नाट्य छटेतील संवाद मी जसा तुला शिकवला तसा च्या तसा म्हणून दाखवणारी तू …’ आपल्या कुटुंबाची नाट्य परंपरा पुढे घेऊन जाणार असे अण्णा म्हणातात तेव्हा मला तुझं कोण कौतुक वाटतं ,आजही अनेक नगरकर आम्हाला आमच्या नावपेक्षा तुझे पालक म्हणून ओळखतात तेव्हा उर अभिमानाने भरून येतं ,तू सादर केलेली ‘ती फुलराणी’ अजूनही डोळ्यासमोरून हटत नाही ,हे सगळं असतांनाच अभ्यासात ही तू नीटनेटकी ,टापटीप आणि वक्तशीर , शिक्षकांची आणि शाळेतल्या मैत्रिणींची लाडकी …. किती गुणी आणि समंजस आहेस तू….आज हे लिहीत असतांना तुझ्या जन्मापासून ते काल पर्यंतचे काही प्रसंग आठवले….

            नौकरी निम्मित मी बाहेर असल्याने तुला लहानच मोठं होतांना जास्त वेळ देता आला नाही ,आजही कामामुळे मी तुला हवा तेवढा वेळ देत नाही तरीही तुझी आठवण रोज यायची आता ही तू सोबतच असते ,शनिवार ते शनिवारी होणारी तुझी भेट म्हणजे खरंच सांगतो माझा कधी कधी अंत पाहणारी असायची ,दमलेल्या बाबांची कहाणी हे गीत ऐकलं की हृदय भरून यायचं ,डोळ्यातून अश्रू आपसूक गळायला लागायचे आणि हे गीत माझ्यासाठीच लिहिलं आहे की काय असं वाटायचं ….!! पण इतकं असूनही तुझी नी माझी नाळ आहे ती त्याने कुठे कमी पडली नाही , माझ्यावर जीवापाड़ प्रेम करणारी ही डुग्गु एक दिवस लग्नानंतर आपल्या ‘पप्पू मे भय्यू’ ला सोडून जाणार या साध्या कल्पनेनेच मला असहाय्य होते.मागे तिरुपतीला काही क्षणांसाठी तू आमच्या पासून लांब गेलीस तर आम्ही राडायचेच बाकी होतो ,मागच्या वर्षी पर्यंत नेमक्या तुझ्या वाढदिवसाला मला हजर राहता यायचे नाही , तेंव्हा तुला फोन वर बोलताना विचारले की ‘नाना तुला काय गिफ्ट आणु…?’  तर तु म्हणायची पप्पा काही नको, तुम्ही उद्या लवकर या मग आपण मज्जा करू, तुझे ते शब्द एकूण डोळ्यात पाणी यायचं…. दुसऱ्या दिवसाची अतुरतेने वाट पाहत ,धावत पळत यायची ,माझ्या साठी आणि सुरवातीच्या पाच वर्षे तर माझ्या मित्रांसाठी ही तो एक महोत्सव असायचा ,आजच्या सारख मोठ्या हॉटेल किंवा हॉल मध्ये नाही केला आम्ही तुझा कोणताच वाढदिवस साजरा पण जो केला तू मनसोक्त केला ,शानदार केला ,जोरदार केला ,अजूनही करत आहोत आणि भविष्यातही करत राहू ,कारण तू आमचा जीव की प्राण आहेस …..

          आई – अण्णा ,आत्या ,काका-काकू ,मावशी ,मामा-मामी आणि सगळ्या बहिणींची तु लाडकी म्हणून तेव्हा ही तू २५ आणि २६ अशा दोनदा आपला वाढदिवस साजरा करायची आणि आजही तू २५ ला मध्यरात्री आणि दिवसा असा दोनदा वाढदिवस साजरा करतेस ,तुझ्यावर जीव ओळवणारे ,तुझे लाड पुरवणारे आणि तुझं सगळं ऐकणारे खूप जण कमावलेस तू – रक्ताच्या नात्या बरोबर स्वतःच्या वर्तनाने तू काही नाती जोडली आहेस ती तशीच जप ,वाढव ,बहर निर्माण कर….

         एक विशेष आठवण आजही मला तुझ्याशी बोलता यावं यासाठी मोपेड वर पुढच्या बाजूला बसणारी तू ,परवा वैष्णवदेवी च्या आपल्या दर्शनाच्या वेळी माझ्या काळजीने घाबरून रडणाऱ्या मम्मीला मोठ्या समंजसपणे धीर देणारी तू मला पाहिल्यावर मात्र तुझा ही बांध फुटला ,तेव्हा तुझ्या समोर नाही माझ्या डोळ्यातून पाणी आलं पण इतकं जपणारी आणि बापाची काळजी घेणारी लेक परमेश्वराने मला दिली म्हणून मी भरून पावलो, खरंच ‘लाडकी लेक’ म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडाच ,ते कोणी तरी म्हंटल आहे ना ,

 “Every girl may not be queen to her husband ,

  But she is always princess to her father ….!!”

        खरंच तू माझी परी आहेस ,जिने माझ्या जीवनात अनोखे रंग भरले आहेत ,तुझ्या वाढण्या बरोबर तुझा बाप म्हणून तुझ्यासोबत वाढणं हे ही खूप आनंददायी, अविस्मरणीय आहे…

  “व्हावीस तू शतायुषी

   व्हावीस तू दीर्घायुषी

   हि एकच माझी इच्छा

   तुझ्या भावी जीवनासाठी

   वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!!”

           पुन्हा एकदा तुला खूप खूप मनस्वी शुभेच्छा नाना तुला …..💐🎂💐🎂

पुट्टीन रोजुई शुभकांक्षालु …..💐🎂💐🎂

Love You Duggu….💐💐💐

                    तुझेच

                     पप्पा

Narayan Mangalaram

संपर्क 9272590119 9421196987 मेल :narayanmangalaram1980@gmail.com, narayanmangalaram2006@gmail.com, zppsgopalwadi67@gmail.com.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All rights reserved @ Narayan Mangalaram!
Need Help? Chat with us!  
Start a Conversation
Hi! Click one of our members below to chat on WhatsApp  
We usually reply in a few minutes