शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी Evm चा वापर
शालेय मंत्रिमंडळ निवडणूकीसाठी Evm चा वापर ….!! हो हो ….!! ऐकून झालात ना चकीत! हो हे खरे आहे.राहुरी तालूक्यातील गोपाळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आज शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक झाली.या निवडणूकीत आम्ही Voting macine या ॲन्ड्राॕईड ॲपचा वापर करून टॕबच्या सहाय्याने मतदान घेतले.
आपला भारत देश हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे.आपल्या देशाचा दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतचा कारभार पाहण्यासाठी जनतेतून लोकप्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया राबवून निवडून दिले जातात .
देशाच्या करभारासारखाच शाळेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी व लोकशाही मूल्यांची रुजवणूक होण्यासाठी आमच्या शाळेत आम्ही दरवर्षी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेतच असतो. गतवर्षी पर्यंत मतपत्रिका छापून व बाण फुलीचा शिक्का मारून आम्ही मतदान घेत होतो ,यंदा मात्र आम्ही सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून EVM मशीन या अँड्रॉईड अँपच्या मदतीने मतदान घेण्याचे निश्चित केले.
गोपाळवाडी शाळेत एकूण ८ पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.काल ॲपमध्ये नामनिर्देशन फॉर्म भरून घेऊन उमेदवारांची नावे नोंदविण्यात आले.निवडणूकीतून माघार घेण्याची वेळही देण्यात आली.प्रचाराला जोरात सुरुवात झाली.अखेर सायंकाळी आजच्या मतदानाची वेळ स.११.१५ ची ठरविण्यात आली.
आज सकाळपासूनच शाळेत निवडणुकीचे वारे जाणवत होते ,काल विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केल्याचेही विद्यार्थी सांगत होते. आपला प्रचार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले छायाचित्र व चिन्ह असलेले बॅनर सुद्धा बनवून घेतले आणि आपल्या समर्थकांसह शाळेत प्रचार सुद्धा केला.
निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांच्या देखरेखीखाली ठिक ११.०५ मिनिटांनी Mock Poll सर्व उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी समोर घेण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुरेश जाधव ,उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव ,सदस्य आसाराम काळापहाड व शिक्षक उपस्थित होते.
सदर निवडणूक प्रक्रियेत शालेय मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री या प्रतिष्ठित पदासाठी ८ विद्यार्थी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.मतदान अधिकारी क्रमांक १,२,३ अर्थात ओळख पटवणे ,सही घेणे ,बोटाला शाई लावणे ही कामे सुद्धा विद्यार्थी अधिकाऱ्यांनीच पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव राऊत हे ballot देत होते व प्रत्येक मतदार मुख्यमंत्री पदासाठी मतदान करत होता.
शाळेचा पट ३८ असून १००% उपस्थिती दररोज असते व आज मतदानही १००% झाले.ठिक १२.१५ वाजता मतदानाची वेळ संपल्यावर Close बटन दाबून मतदान प्रक्रिया संपली. विद्यार्थी मतदान अधिकारी कु प्रियांका हापसे ,चि साईराज तरवडे ,चि कृष्णा जाधव यांनी EVM मशीन व इतर साहित्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सर्जेराव गोपीनाथ राऊत सर व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.नारायण मंगलारम सर यांच्या ताब्यात दिले.निकालासाठी त्यांनी Result बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल प्रत्येक उमेदवाराच्या नावासह अहवाल तयार केला.विद्यार्थी उमेदवार चिंतेत दिसत होते.त्यांना निवडणूक निकाल काय लागेल याची प्रतिक्षा होती.
जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले व सर्वांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सर्जेराव राऊत सर यांनी निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यास सुरुवात केली. ३८ पैकी सर्वाधिक १४ मतदान घेत चि अजित बाबासाहेब ब्राम्हणे या चौथीच्या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री पदी बाजी मारली तर इयत्ता पहिलीच्या चिमुकल्या मंजू दत्तात्रेय हापसे हिने ही ६ मते घेत उपमुख्यमंत्री पद काबीज केले . निकाल येताच जिंकलेल्यानी आणि त्यांच्या समर्थकांनी ढोल वाजवत ,गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. एकूणच काय तर “कहीं खूषी तो कहीं गम” अशी परिस्थिती दिसत होती. ” विद्यार्थ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन आणि शाळेच्या नावलौकीकात भर घालेन.” मुख्यमंत्री पदी निवड झालेल्या अजित ब्राम्हणेने आपल्या मनोगतात सांगितले. तर “आज मला खूप आनंद झाला .” अशी प्रतिक्रिया पहिलीच्या मंजू हापसे हिने दिली. सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते निवडून आलेल्या शाळेचा मुख्यमंत्री चि अजित बाबासाहेब ब्राम्हणे , उपमुख्यमंत्री-कु. मंजू दत्तात्रेय हापसे ,अभ्यासमंत्री – पृथ्वीराज जाधव ,स्वच्छतामंत्री-चि.साहिल जाधव,शिस्तमंत्री-कु. साधना जगधने ,आरोग्यमंत्री – कु. एकता गायकवाड व सहलमंत्री – चि.आयुष गायकवाड ,क्रीडा मंत्री – कु विजया जाधव , या सर्वांचा पेन व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
“विद्यार्थ्यांनी ही लोकशाही मूल्ये बालपणापासून अंगिकारली पाहिजे आणि आपल्या लोकशाहीचा सन्मान वाढवण्याबरोबर आपल्या हक्कांच्या आणि कर्तव्याच्या बाबतीत जागरूक असले पाहिजे यासाठी आम्ही हा उपक्रम शाळेत घेतला ” असे मत मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांनी व्यक्त केले.तर “प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया कशी पार पडते याचा अनुभव विद्यार्थ्यांना यावा ,त्यातही EVM मतदान यंत्र मतदान कर्मचाऱ्यांची कामे यांची सुद्धा माहिती व्हावी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनाच ही कामे करायला लावून आम्ही ही शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली” असे नारायण मंगलारम हे म्हणाले.
सदर निवडणूक प्रक्रीया आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश जाधव ,उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्या देखरेखीखाली पार पडली.यावेळी माजी सरपंच सौ हिराबाई ज्ञा जाधव , श्री. सीताराम जाधव ,ज्ञानदेव अण्णा जाधव व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेनंतर उपस्थित सर्वांचे आभार श्री. नारायण मंगलारम यांनी मानले.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर