आंतरराष्ट्रीय ‘ओझोन दिवस’ 2019
आज 16 सप्टेंबर म्हणजे आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस ,त्यानिमित्त आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस’ साजरा केला.
1987 साली याच दिवशी जगभरातील प्रतिनिधींनी कॅनडातील मॉनट्रेल या शहरात एका आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षऱ्या केल्या त्याची आठवण म्हणून 1995 पासून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रम व वन विभागाच्या वतीने हा दिवस ‘आंतराष्ट्रीय ओझोन दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
ऑक्सिजन या मूलद्रव्याच्या तीन अणू च्या जोडणीतून ओझोन तयार होतो.हा ओझन पृथ्वीवरील सजीवसृष्टीसाठी वरदान आहे ,सूर्याच्या अतिनील किरणांना अडवण्याचे महत्वाचे काम हा ओझन न चुकता करत आहे.पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 16 ते 23 किलोमीटर उंचीवर हा थर आहे.परंतु निसर्गाच्या नाशाला कारणीभूत असलेली वैश्विक जीवघेणी स्पर्धा या ओझन थराला कमी करत आहे.यातूनच कार्बन उत्सर्ग वाढतो आहे ,ओझोन थराला सर्वात मोठा धोका हा कार्बन उत्सर्गाचाच आहे.जगातील प्रत्येक देशातून कार्बन मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जात आहे.
आता नुकतेच मागच्या आठवड्यात जगातील सगळ्यात मोठ्या अशा ऍमेझॉनच्या जंगलात आतापर्यंतचा सर्वात मोठा वणवा पेटला ,त्याने या जंगलाचे ,त्यातील जैव विविधतेचे तितके अतोनात नुकसान केले तेवढेच नुकसान त्या वणव्यामुळे ओझोनचे झाले.
” पर्यावरण रक्षण ,धरणीमातेचे रक्षण विषयी जाणीव जागृती वाढत आहे ,त्यातूनच ‘There is no plante ‘B’ नावाच्या मोहिमेअंतर्गत जगभरातील विद्यार्थी पुढे येत आहेत आणि 20 सप्टेंबरला त्याविरुद्ध आपल्य शाळेत जागृती करणार आहेत ,आपण सुद्धा आपल्या भावी पिढी साठी काहीतरी योगदान दिले पाहिजे….!!” असे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांनी दिली .
“शाश्वत विकास सोडून राक्षसी विकासाच्या कल्पना मागे जग धावत आहे ,यातील महत्वाची बाब म्हणजे जगातील महासत्ता म्हणवणारे देश मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्ग करत आहेत.जगातील प्रत्येक माणसाने या गोष्टीचा विचार करावा आणि कमीतकमी कार्बन उत्सर्ग करण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करावा यासाठी हा दिन ओझोन थराच्या संरक्षण विषयी जाणीव निर्माण करण्यासाठी जगभर जाणला जातो ……..येणाऱ्या काळात कार्बनचे प्रमाण ही एक आपत्ती बनणार आहे ,त्यापासून आपल्याला आपले संरक्षण करायचे असेल तर अधिकाधिक झाडे लावा आणि ती जगवा ….!!” असे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
आज वाढदिवस असणारी आमच्या शालेय मंत्रिमंडळाची उपमुख्यमंत्री कु मंजू दत्तात्रय हापसे हिने धरणी मातेच्या वेदना थोडक्यात सांगितल्या ,आणि ‘ओझोन वाचवा ,पृथ्वी वाचवा’ हा संदेश दिला. तसेच आपण कार्बन उत्सर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन विद्यार्थी मित्राना केले.
‘मतदार जनजागृती कार्यक्रम ( स्वीप ) अंतर्गत शाळेत आज चित्रकला स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले होते ,त्यात विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे चित्र रंगावण्याची स्पर्धा घेण्यात आली ज्यात इयत्ता चौथीच्या साइराज महेश तरवडे या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आला .
शेवटी ,नाशिक येथील उपक्रमशील शिक्षक ज्ञानदेव नवसरे सर यांच्या सौजन्याने याबद्दल अंगावर शहारे आणणारी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या सुंदर अभिनयाने सजलेली ‘कार्बन’ ही शॉर्ट फिल्म विद्यार्थ्यांना दाखवण्यात येऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
टीप :व्हिडीओची लिंक इथे देत आहे.आपणही नक्की पहावी….
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर