ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक @जि प प्रा शा गोपाळवाडी….!!
पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. नैसर्गिक संकटांनी उग्र रूप धारण केले आहे. आमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष वेधण्यासाठी जि.प.प्रा.शाळा गोपाळवाडी ,ता राहुरी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी आज दिनांक २०सप्टेंबर२०१९ वार शुक्रवार रोजी गोपाळवाडीतुन निषेध फेरी काढली आणि मारुती मंदिरासमोर आंदोलन करून पर्यावरण संवर्धनासंबधीचे निवेदन व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव आणि ग्रामपंचायत सदस्य सीताराम जाधव ,राजेंद्र जाधव ,अहिलाजी जाधव यांना दिले.
जागतिक हवामान बदल ,नैसर्गिक आप्पतींचे वाढते प्रमाण ,वाढत्या कार्बन उत्सर्गाने ओझोन समोर निर्माण केलेले संकट त्याचा भविष्यात होणारा परिणाम या सगळ्याने व्यथित होऊन स्वीडनच्या 15 वर्षीय चिमुकल्या ग्रेटा थंबर्ग या विद्यार्थिनीने मागच्या वर्षीच्या ऑगस्ट मध्ये शाळेत जाण्याऐवजी स्वीडनच्या पार्लमेंट समोर आंदोलनाला सुरवात केली ,बघता बघता जगभरातील विद्यार्थी तिच्या या आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि आज 20 सप्टेंबर 2019 ला जगभरातील 150 देशातील लाखोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी ‘हरित पृथ्वी’ साठी आपल्या आपल्या देशात #GlobalClimateStrike हे आंदोलन करत आहेत.
आपल्या भारतातही दिल्ली ,गुरगाव आणि मुंबई येथे #ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक चे आयोजन केले आहे. ही धरणी आमची माता आहे ,आम्हाला भविष्यात इथे राहायचे आहे ,तेव्हा आम्हाला स्वच्छ हवा ,स्वच्छ पाणी ,शुद्ध ऑक्सिजन मिळाला पाहिजे .बेसुमार जंगलतोडीमुळे ,वणवा,शहरीकरणामुळे जंगले आणि त्यातील जैवविविधता रोज नष्ट होतेय.
मागच्या पंधरवड्यात पिर्तुगालच्या मनुएल कॉर्रेइअ यांच्या ‘प्लॅस्टिक क्लीन अप ब्रीज’ या स्कायपे लेसनच्या माध्यमातून प्लॅस्टिकच्या अतिरिक्त आणि अयोग्य वापराचे भयानक परिणाम आमच्या गोपाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिले होते , तसेच 17 सप्टेंबरला ‘जागतिक ओझोन दिवस’ च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना “कार्बन” ही शॉर्ट फिल्म सुद्धा दाखवण्यात आली होती ,त्यातून इसवी सन 2067 मधील पृथ्वीची महाभयंकर परिस्थिती अतिशय वास्तववादी पद्धतीने दाखवण्यात आली आहे.
गेल्या पंधरा दिवसातील या सगळ्या घडामोडी आणि एकंदरीतच सगळ्या परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना ग्रेटाचे आंदोलन मनाला भिडले ,आपण पण यात आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे म्हणून आज सकाळी गोपाळवाडीतून फेरी काढून ‘शुद्ध ऑक्सिजन मिळणे हा आमचा अधिकार आहे’, ‘शुद्ध पाणी मिळणे हा आमचा अधिकार आहे’, ‘शाश्वत विकास ,समृद्ध विकास ’, ‘Save Climate Save Earth’, ‘save Forest ,save earth’ ,’Its Now or Never’ ‘झाडे लावा झाडे जगवा’ ‘आता नाही तर कधीच नाही’ इत्यादी घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. हातात निसर्ग संवर्धनासंबंधी पाट्या व पोस्टर घेऊन वातावरण निर्मिती केली.
पृथ्वीचे भविष्य आपल्या हातामध्ये आहे. पृथ्वीचे फुफ्फुसं असं म्हटल्या जाणाऱ्या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये नुकतीच आग लागून कधीही न भरुन निघणारी हाणी झाली आहे. या नैसर्गिक आपत्ती दिवसेंदिवस अशाच वाढत राहिल्या तर आमचं भविष्य धोक्यात आहे. यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत असे विद्यार्थ्यांनी ठणकावून सांगितले. आम्ही सर्वजण आपल्याला नम्रपणे निवेदन करत आहोत की आम्ही आणखी लहान आहोत परंतु येत्या काळामध्ये या समस्यांना आम्हाला सामोरे जावे लागणार आहे. आमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही पर्यावरण संवर्धनाकडं लक्ष द्यावे ही नम्र विनंती विद्यार्थ्यांनी निवेदनात केली.
“जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, महापूर, हवा प्रदूषण समुद्राची वाढती पाणी पातळी, झपाट्याने नष्ट होत असलेली जैवविविधता या सर्व बाबींना माणूस आणि केवळ माणूसच जबाबदार आहे; म्हणजे आपणच जबाबदार आहोत. ‘थिंक ग्लोबल ,ऍक्ट लोकल’ यानुसार सुरवात ही आपल्या पासून केली पाहिजे ,वेळीच या जागतिक समस्येकडे आपण लक्ष वेधून पर्यावरण संवर्धनासाठी आश्वासक पाऊले उचलली नाहीत तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून समजले,’असे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम हे म्हणाले.
#GlobalClimateStrike
#FridayForFuture
#ClimateStrikeSeptember20
येत्या 23 तारखेच्या युनोच्या बैठकी आधी जगभरातील विद्यार्थ्यांनी युनोचे लक्ष या मुद्द्याकडे वेधण्यासाठी हे आंदोलन छेडले आहे. दिल्ली ,मुंबई पाठोपाठ गावोगावच्या शाळेतील विद्यार्थी ही यात मागे नाहीत हेच यातून दिसून येते. आपणसुद्धा या
चळवळीत सहभागी होऊन निसर्ग संवर्धनासाठी एक पाऊल टाकावे ही नम्र विनंती.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर