महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री जयंती ,अर्थात ‘स्वच्छता ही सेवा’ दिन
“आज का दिन दो अकटुबर है ,
आज का दिन है बडा महान ,
आज के दिन दो फुल खिले थे ,
जिनसे मेहका हिंदुस्तान ….!!”
एक का नारा अमन ,एक का ‘जय जवान ,जय किसन’
असा दुग्ध शर्करा योग असणारा आजचा दिवस ,
“दे दि हमे आझादी बिना खड्ग ,बिना ढाल ,
साबरमती के संत तुणे ,कर दिया कमाल ….!!”
असं कुठलेही खड्ग किंवा ढाल हाती न घेता ,सत्य आणि अहिंसा या तत्वांची जगाला शिकवण देत ,सत्याग्रह आणि उपोषण ही नवे लोकशाही शस्त्रे शिकवत ज्यांनी भारताला दिडशे वर्षांच्या जुलमी ब्रिटिश गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिले असे भारताचे थोर सुपुत्र ,लहान मुलांचे बापू ,थोरामोठ्यांचे महात्मा आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची 150 वी जयंती तसेच स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान , ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ,1965 च्या युद्धात पाकिस्तानला युद्धभूमीवर सपाटून मात दिल्यानंतर पाकिस्तानी हुकूमशहा आयुब खान यांना , “अब तो आपको पता चल गया होगा ,धोती पेहनने वाले भी लढ सकते है …..!!” असे सडेतोड उत्तर देणारे लाल बहादूर शास्त्री यांची जयंती या निमित्त आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
“महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांचे जीवन म्हणजे फक्त विद्यार्थीच नव्हे तर समस्त भारतीयांसाठी आणि जगासाठी आदर्श असे आहे ,गांधीजींनी लहानपणी ‘सत्यवादी राजा हरिश्चंद्र’ हे नाटक पाहिले आणि त्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की त्यांनी आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला ,आपण सुद्धा त्यांच्या या निश्चयी स्वभावपासून काहीतरी शिकून चांगल्या गोष्टींचा निश्चय केला पाहिजे आणि तो पाळला पाहिजे….!!” असे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत सर म्हणाले.
“अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत लहानपणीच पितृछत्र हरपल्यानंतरही आपल्या जिद्दीच्या आणि कष्टांच्या जोरावर गांधीजींच्या विचारांवर चालत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हिरिरीने भाग घेत तुरुंगवास स्वीकारला ,देश स्वतंत्र झाल्यावर देशसेवा साठी जीवन समर्पित करून देशाचे दुसरे पंतप्रधान झाले ,भारतीय सीमांचे रक्षण करणारे जवान जितके महत्वाचे आहेत तितकेच शेतात कष्ट करणारे किसन हे सांगण्यासाठी ‘जय जवान, जय किसन’ हा नारा ज्यांनी दिला ,असे लालबहादूर शास्त्री यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यापासून आपण शिकवण घेतली पाहिजे” असे नारायण मंगलारम हे म्हणाले.
या वेळी इयत्ता चौथी तील चि अजित बाबासाहेब ब्राम्हणे याने गांधीजींची वेशभूषा करून थोडक्या शब्दात गांधीजींचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला ,तसेच ‘वाईट पाहू नका ,वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका’ अशी शिकवण देणारी गांधीजींची तीन माकडे ही आज शाळेत आली होती त्यांची शिकवणही गांधीजींच्या वेशभूषेतील अजितने करून दिली.
इय्यता चौथी मधीलच चि कृष्णा राजाराम जाधव याने लालबहादूर शास्त्रीची वेशभूषा करून सर्वांना त्यांच्या जय जवान ,जय किसन या नाऱ्याची आठवण करून दिली.
वेषभूषा केलेल्या या चिमुकल्यानी आपल्या उपस्थितीने सर्व वातावरण देशभक्तिमय करून टाकले ,गांधी आणि शास्त्री जयंती साजरी करण्यासाठी प्रत्यक्ष गांधीजी आणि शास्त्रीजी आलेले पाहून विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. या नंतर ‘स्वच्छता ही सेवा’ या व्यापक अभियानांतर्गत शालेय परिसरची स्वच्छता करण्यात आली ,शालेय परिसरातून प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला आणि आज पासून देशभरात अंमलात येणाऱ्या प्लास्टिक बंदीची जाणीव ग्रामस्थांना करून देण्यात आली.प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,सीताराम जाधव ,राजाराम जाधव ,दादा जाधव ,अहिलाजी जाधव ,बापू जाधव ,संजय जाधव ,रुक्मिणी जाधव ,हिराबाई जाधव ,छाया कुर्हे यांच्या सह मोठ्यासंख्येने पालक उपस्थित होते.
शब्दांकन
नारायण मंगलारम
जि प प्रा शा गोपाळवाडी
ता राहुरी ,जि अहमदनगर