समाज व शैक्षणिक सेतू निर्माण करणारा शिक्षक
उद्यापासून विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र पक्ष्यांच्या किलबिलाटाप्रमाणे शाळा शाळात मुलांचा किलबिलाट सुरु होईल.एकीकडे दीड महिना मुलांना सांभाळू सांभाळू परेशान झालेले पालक सुटकेचा निःश्वास सोडतात व मुल हळूहळू शाळा परिसरात रमायला लागतात.असेच कायम मुलांना आपला लळा लावणारे नारायण मंगलराम हे एक विद्यार्थीप्रिय शिक्षक.जिथे जिथे बदली होईल तिथे तिथे प्रामाणिकपणे मुलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम ते राबवतात.
नारायण सरांचा जन्म अहमदनगरचा. नारायणाच्या जन्मानंतर काही दिवसातच वडिलोपार्जित विणकामाच्या धंद्याला घरघर लागली ,वडीलांना खाजगी नोकरी स्वीकारावी लागली ,त्यामुळे घरची परिस्थिती तशी थोडी बेताची. पण वडिलांना आणि मोठे बंधू रवी यांच्यामुळे घरात शिक्षणाला अनुकूल वातावरण होते,त्यामुळे काहीतरी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहणं हे सर्वात महत्त्वाचं ध्येय. चित्रकलेची अत्यंत आवड आणि कनिष्ठ महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन सी के नायडू क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली असतानाही त्यांनी लवकर स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टीने डी.एड. करून शिक्षकी पेशा स्वीकारला. आणि एकदा शिक्षक झाल्यावर त्यातल्या खऱ्या सामर्थ्याची पारख जणू त्यांना झाली आणि पुन्हा त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
जन्म ,प्राथमिक ,माध्यमिक शिक्षणाबरोबर डी एड सुद्धा शहरात झाल्याने सगळं आयुष्य शहरात गेलेल्या नारायण सरांनी आपल्या नोकरीची सुरवात केली ती रयत शिक्षण संस्थेच्या कोळपेवाडी ,ता कोपरगाव ,जिल्हा अहमदनगर येथील छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयातून ,अगदी सात महिन्यांच्या छोट्या कालावधीतही त्यांनी तेथे आपल्या कामाची आगळी छाप सोडली ती अशी की आजही त्यांच्या कडे असलेल्या चौथीच्या बॅचचे विद्यार्थी अतिशय आदराने त्यांचे नाव घेतात आणि आपल्या आयुष्याला मिळलेल्या सकारात्मक वळणाचे श्रेय ते नारायण सरांना देतात.
जिल्हा परिषदेकडच्या त्यांच्या वाटचालीची सुरवात पैठण तालुक्यातील 74 जळगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्यांची प्रथम नियुक्ती झाली . आयुष्यातील वीस बावीस वर्ष शहरात राहणाऱ्या नारायण सरांना 74जळगाव सारख्या खेड्यात आणि तेही कुठल्याही सुविधेविना राहणे सुरुवातीला अवघडल्यासारखे वाटू लागले, पण त्यांचा उत्साही स्वभाव या साऱ्यावर मात करून गेला.
उपक्रमशील ,विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी काही दिवसातच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.आपल्या शाळेतील मुलांचा मित्र होण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होते. नारायण सर यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यांच्या संयमी स्वभावामुळे गावातील लोकांचा ही त्यांच्यावर मित्राप्रमाणे विश्वास होता.त्यामुळे त्यांनी शाळेत सुरू केलेले प्रेरणेचे कार्य पुढे चालू राहिले. आपली शाळा बोलकी झाली पाहिजे असे त्यांचे मत. त्यामुळे त्यांचा सुरुवातीपासूनच कलेकडे ओढा होता. नाटक, एकांकिका ,एकपात्री प्रयोग ,गायन ,खेळ ,कविता वाचून या मुलांना आवडणाऱ्या गोष्टीद्वारे ते मुलांच्या मनाला जिंकून घ्यायचे. त्यांचा इतिहासाचा तास म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असल्याचे विद्यार्थी आजही बोलून दाखवतात ,शालेय शिस्तीच्या बाबतीत कडक असणारे नारायण सर दुपारच्या सुट्टीत मुलांत मूल होऊन क्रिकेट ,फुटबॉल ,लिंगोरचा आदी खेळ खेळायचे, त्यामुळे मुलांना त्यांच्या सहवासात आनंदही मिळायचा आणि प्रेरणा ही.आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा शैक्षणिक प्रगती यामध्ये त्यांनी शाळेत खूप बदल घडवून आणला.
२०१२ साली त्यांची प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून प्राथमिक शाळा राहाटगाव, तालुका पैठण येथे नियुक्ती झाली. बदली होऊन जाताना गावातील शिक्षणप्रेमी ज्येष्ठ व्यक्ती दत्तू अण्णा यांनी त्यांच्यासाठी एक सुंदर पत्र लिहिले. त्यात त्यांनी खरंतर नारायण सर आमच्या गावाला लाभले याबद्दल आभार मानले .त्यात शेवटी त्याने लिहिले की ,’मंगलाराम सर तुम्ही म्हणजे आडनावाप्रमाणे सर्वत्र मंगलमय करणारे’ असा उल्लेख करुन त्यांचा गौरव केला. रहाटगावची मोठी शाळा ,मोठा शिक्षकवर्ग पण सरांच्या मनमिळावू स्वभावामुळे बघता बघता सर्व मित्र बनले.सर्वांच्या मनात त्यांनी उत्साह पेरला सर्वांना मदत करण्याच्या स्वभावामुळे तालुक्याच्या ठिकाणी सारी काम त्यांच्यावर येऊन पडली.त्यातही त्यांनी कधी कसूर केली नाही.शिक्षक असो वा वरिष्ठ प्रत्येकाने सांगितलेले काम ते आपले काम म्हणून करायचे. मुख्याध्यापकांचा व सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे ते आवडते सर बनले.
कुटुंबापासून दूर असताना त्यांनी कधीही त्यांच्याबद्दल तक्रार केली नाही .या ही शाळेत नृत्य, कला ,क्रीडा, भाषण याद्वारे मुलांमध्ये उत्साह निर्माण केला. क्षेत्रभेट ,सहल, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम ,नृत्य ,नाटक एकांकिका, संवाद या साऱ्यांची धुरा ते लिलया सांभाळायचे. इंग्रजी व मराठी विषयात त्यांचे विशेष प्राविण्य .इतिहास अतिशय सुंदर शिकवत असल्याने त्यांच्या वर्गातील मुले त्यांच्याकडे आग्रह करायची की आम्हाला इतिहासातील नवनवीन गोष्टी सांगा म्हणून. याच शाळेतील त्यांची एक विद्यार्थीनी आज शिव व्याख्याती बनली आहे .तिने दशकावर पारितोषिके जिंकली .
याच दरम्यान त्यांची सीसीआरटी नवी दिल्ली या ठिकाणी कल्चरल हेरिटेज प्रशिक्षणासाठी निवड झाली.त्यांनी वेगवेगळ्या प्रांतातील , भाषेतील गीते अगदी तालबद्ध त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवले. मुलांची दैनंदिन अभ्यासामध्ये रुची निर्माण केली .शाळेतील सहकाऱ्यांच्या मदतीने याही शाळेत समाज सहभागातून रंगरंगोटी, डिजिटलायझेशन, वृक्षारोपण ,वाचन कट्टा ,विद्यार्थी बचत बँक,बाल आंनद मेळावा अर्थात – खाद्य जत्रा ,जयंत्या पुण्यतिथ्या ,वक्तृत्व स्पर्धा ,शैक्षणिक सहल ,सांस्कृतिक कार्यक्रम आदि उपक्रम राबवले.शाळेचे नाव तालुक्याबरोबर जिल्ह्यात एक उपक्रमशील शाळा म्हणून घेतले जाऊ लागले .
२०१७ च्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने या ही शाळेत निरोपाचा एक दिवस उगवला .शाळेतील अगदी पहिलीतील मुलापासून ते मुख्याध्यापकापर्यंत क्वचितच कोणी राहिले असेल त्यांच्या डोळ्यात सर जाताना पाणी आले नसेल. विद्यार्थी ,पालक, सहकारी शिक्षक यांचे ते आवडते शिक्षक .१४ वर्ष कुटुंबापासून दूर राहून आपला सर्व वेळ शाळा व मुलांसाठी खर्च करून जात होते .२०१७ साली यांची बदली त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात कुटुंबाच्या जवळ झाली व आता ते प्राथमिक शाळा गोपाळवाडी तालुका राहुरी या ठिकाणी रुजू झाले .अगदी छोटी ,द्विशिक्षकी शाळा पन्नासच्या आत विध्यार्थी संख्या ,सर्व लक्ष त्या मुलांकडे देऊन त्यांच्यातील क्षमता कौशल्य ,कला यांना कसे बाहेर काढायचे हा विचार त्यांच्या डोक्यात सतत चालायचा. स्वतः सरांना वाचन आणि पर्यटनाची अत्यंत आवड त्यामुळे साहजिकच त्यांचे हे गुण मुलांमध्ये संक्रमित झाल्यावाचून राहायचे नाहीत.वाचलेल्या नवनवीन गोष्टी मुलांना सांगने, भाषा बद्दल मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण करायचे.गोपाळवाडी शाळेत आल्यानंतर त्यांनी केंद्र स्तरावरील, तालुकास्तरावरील सांस्कृतिक स्पर्धा ,क्रीडा स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा यामध्ये आपल्या मुलांना सहभागी करून कधी प्रथम ,द्वितीय तर कधी तृतीय अशी पारितोषिके पटवण्याचा सिलसिला त्यांनी चालू केला आणि बघता-बघता आपली स्वतःची पुन्हा नवी ओळख निर्माण केली .
मुलांमध्ये अंगभूत क्षमतांचा विकास करण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी आहे आपल्या या कौशल्याला ते नाविन्यपूर्ण उपक्रमाची व तत्परतेचीजोड देतात .सुंदर शाळा ,स्मार्ट मुले हे त्यांचे जणू ब्रीदच.
सहभाग—
ए .आय. एन टी 2016 च्या नागपुर मधील इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये सहभाग त्यांनी घेतला .तसेच ए .आय .एन. इ .टी. 2018 च्या मुंबई इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्येही त्यांनी सहभाग घेऊन पोस्टर प्रेझेंटेशन केले .कथा ,शैक्षणिक लेख अनेक वृत्तपत्रे व मासिकांमधून त्यांनी लिखाण केले आहे .
ए.टी.एम. अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र राज्य याचे ते सहसंयोजक आहेत .एटीएम च्या अहमदनगर ज्ञानसूर्य या शैक्षणिक अंकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. शिक्षण विभाग पंढरपूर आयोजित गुणवत्ता संकल्प मेळाव्यात शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शनही त्यांनी केले .मराठी समाज उत्तर प्रदेश आयोजित शिवजन्मभूमी शिवनेरी ते लखनऊ विद्यापीठ ह्या सोळाशे 51 किलोमीटर मोटार सायकल यात्रेस त्यांनी सहभाग नोंदवला. रेडिओ सिटी वर शिवजयंती दिवशी विशेष मुलाखत प्रसारित झाली. अहमदनगर आकाशवाणी केंद्रावर ‘अध्ययन अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर त्यांची विशेष मुलाखतही घेण्यात आली .तसेच दरवर्षी 6 जून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड वारी मध्ये ही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
पुरस्कार- त्यांच्या कामाचे फलित हे खरे त्यांचे विद्यार्थी. पण अशा धडपड्या शिक्षकाला लोकही कसे विसरतील .याचाच परिपाक म्हणजे त्यांना पैठण तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चा 2016चा पुरस्कारही त्यांना देण्यात आला. अशी शाळा आणि शिक्षक असताना देशाचे भविष्य उज्वल असणारच यात शंका नाही.
ते NCERT ,नवी दिल्लीच्या ‘Art Integrated Learning’ ( कलेतून शिक्षण ) AIL चे राज्यस्तरीय साधन व्यक्ती असून नुकतीच NCERT ने त्यांच्या शाळेची AIL साठी मॉडेल स्कूल म्हणून देशभरातील 11 शाळेत निवड केली आहे ज्यात महाराष्ट्रातून त्यांची गोपाळवाडी शाळा सह आणखी दोन शाळा आहेत.नुकत्याच फेब्रुवारी महिन्यात डॉ पवन सुधीर यांच्या नेतृत्वाखाली NCERT च्या पथकाने गोपाळवाडी शाळेचा अभ्यास दौरा संपन्न केला आहे.
संवेदनक्षम मुले हे देशाची पुंजी असते ,यासाठी त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती ,ग्रामस्थ ,गटशिक्षणाधिकारी ,केंद्रप्रमुख आणि आपल्या सहकारी वदक मॅडम आणि मुख्याध्यापक राऊत सर यांच्या सहकार्याने वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे मुलांमध्ये संवेदनक्षमता निर्माण केली.निसर्ग रक्षण मंडळाच्या वतीने पक्षी गणना व पक्षी वाचवा- एक मूठ धान्य ,एक ओंजळ पाणी आणि एक रुपया पशु पक्षांसाठी ,वृक्षारोपण -एक मूल, एक झाड ,प्लास्टिक विरोधी जनजागृती मोहीम – पथनाट्याचे आयोजन,पर्यावरण पूरक शाडूच्या मातीचे गणपती बनवणे ,कागदी पिशवीचा वापर अशा पर्यावरण पूरक उपक्रमातून त्यांनी मुलांना प्रेरणा दिली. ई लर्निंग स्कूल करण्यासाठी शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटल करण्यावर भर दिला. बाल सृष्टी या भित्ती पत्रकातून विद्यार्थ्यांना कविता, कथा ,चित्र तसेच लेखनासाठी प्रोत्साहन दिले. महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी यानिमित्ताने शाळेत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा हस्ताक्षर ,स्पर्धा यांचे आयोजन केले .बाल आनंद मेळावा ही तर त्यांनी मुलांसाठी व्यवहार ज्ञान देणारी आणि पालकांसाठी सुखावणारी दरवर्षी आणलेली पर्वणीच. या अशा माध्यमातून मुलांच्या आनंदाचा ठेवा जपण्यास ते मदत करतात. डॉक्टर अब्दुल कलाम तरंग वाचनालय शाळेत उभारून तीनशेच्या वर पुस्तके त्यांनी उपलब्ध केली व मुलांना अवांतर वाचनाची गोडी लावली .विज्ञान दिन ,संविधान दिन ,वाचन प्रेरणा दिन ,मराठी राजभाषा दिन असे सर्वच दिनाच्या उपक्रमाचे अतिशय उत्साहात आणि नियोजनबद्ध आयोजन केले जाते. त्यांच्या शाळेची स्वतःची www.smarttechguruji.com ही वेबसाईट आहे आणि Smart tech guruji gopalwadi नावाने यूट्यूब चैनल ही आहे. त्यावर मुलांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची, ‘कलेतून शिक्षण’ देण्याच्या प्रयोगाची माहिती उपलब्ध आहे .
त्यांनी मायक्रोसोफ्ट एज्युकेटर कम्युनिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देश-विदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिपच्या माध्यमातून त्यांच्या विद्यार्थ्यांनी इंग्लंड ,अमेरिका ,रशिया ,पाकीस्तान ,इजिप्त ,व्हिएतनाम या देशांसह अर्जनटीना ,जपान अशा १२ पेक्षा अधिक देशातील ५० पेक्षा अधिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहितीचे आदानप्रदान केले आहे . व्हॉइस ऑफ द फ्युचर या ५० देशातील ४० शाळांमध्ये राबवलेल्या ‘वन्य जीव संरक्षण काळाची गरज’ या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
आपल्या या छोट्या वस्तीतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी मिळाव्यात या साठी नारायण सरांनी त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत सर यांच्या सहकार्याने शाळेत ‘युनेस्को स्कूल क्लब’ ची स्थापना केली.
साहित्य ,कथाकथानाची आवड असल्याने राज्यस्तरीय महिला शिक्षिका साहित्य संमेलन उमरगा येथे कथाकथन सत्राचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले व कथाही सादर केली.ए टी एम च्या माध्यमातून औरंगाबाद येथे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या आयोजनातही महत्वाची भूमिका बजावली आहे ,असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या शिक्षकाने विद्यार्थि हेच आपले दैवत मानले मुलांसाठी शाळेत उपक्रमांची रेलचेल त्यांनी चालू ठेवली.
खऱ्या अर्थाने विध्यार्थी हित जपणारे,ध्येयवेडे,उत्साही,कुठल्याही परिस्थितीत मदतीला तत्पर राहणारे ,आपल्या शाळेवर घरापेक्षा जास्त प्रेम करणारे नारायण सर सर्वांनाच एक आदर्श आहेत.आपल्या कलेवर नितांत प्रेम करून आपली वाचनाची व पर्यटनाची प्रगाढ आवड जपणारे नारायण सर आपल्या विद्यार्थ्यांचा आवडता गुरुजी आहेत यात शंका नाही.या अशा प्रेरणा देणाऱ्या ,उत्साही गुरूला कोण विसरेल?
संतोष मुसळे जालना.