आनंद, उत्साह, जल्लोश आणि उत्सव अर्थात प्रवेशोत्सव व पाठ्यपुस्तके वाटप
मेंदी भरले पाऊल घेऊन पहाट अवतरली,
अलगद नाजूक, धरतीवरी चाहूल थरथरली,
जागी झाली सृष्टी सारी ऐकून भूपाळी ,
निळे जांभळे क्षितिज तेव्हा झाले सोनसळी
क्षितिजावरती डोकावुनीया हळूच तो हसला,
आळसावल्या चराचराला सूरही गवसला.
असाच सूर आम्हाला गवसला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी, केंद्र उंबरे ,ता. राहुरी शाळेत आज सोमवार दिनांक १७ जून २०१९ रोजी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात प्रवेशोत्सवा आणि पाठ्यपुस्तके वाटप.
या कार्यक्रमाचे आयोजनाने नवीन शैक्षणिक वर्ष सन २०१९-२०२०चा आज शाळेचा पहिला दिवस. या निमित्त चिमुकल्यांच्या स्वागतासाठी फुगे ,कार्टून चित्रे ,मुखवटे ,फुले ,रंगीत रांगोळी , झिरमिळ्यांच्या सजावटीने शाळा आणि शिक्षक वृंद सज्ज होते.शाळेमध्ये प्रभात फेरी, नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप, स्वागत ,मिष्टान्न भोजन इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या सर्व इमारतीला फुग्यांची सजावट करण्यात आली होती. सुंदर हिरवीगार झाडे आणि आणि त्यात ही सजावट त्यामुळे शाळा जणू एखादी बागच वाटत होती . तसे ही शाळा मुले रुपी फुले असणारी बाग असते नाही का …..? याप्रसंगी चेडगांव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ज्ञानदेव अण्णा जाधव , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुरेश जाधव सदस्य श्री.दादा जाधव ,राजेंद्र जाधव ,गणेश गायकवाड ,नवनाथ जाधव ,ग्रा.सदस्य सीताराम जाधव,मा सरपंच सौ. हिराबाई जाधव, अर्जुन जाधव ,अंगणवाडी सेविका श्रीम जाधव मॅडम ,मदतनीस श्रीम कुर्हे मॅडम ,पालक वर्ग, ग्रामस्थ,शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम ….
- प्रभात फेरी
शाळेच्या पहिल्याच दिवशी गुढी पाडवा पट वाढवा या कार्यक्रमांतर्गत दाखल झालेल्या शाळेतील सर्व मुलांची नारळाच्या झावळ्या ,फुले ,फुगे ,झिरमिळ्यांचा वापर करून सजवलेल्या बैलगाडीतुन ताशांच्या वादनात मिरणवूक काढण्यात आली.यामध्ये सर्व विद्यार्थी पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.या वेळी नव्याने शाळेत प्रवेशित झालेले पहिलीची मुलं फुगे धरून,टोप्या घालून अतिशय आनंदात आणि उत्साहात बैलगाडीत विराजमान झाली होती तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत ,फलक धरून जागृती करत या प्रभात फेरीत सहभाग घेतला .चेडगावच्या माजी सरपंच हिराबाई जाधव यांनी फेरीचे औक्षण करून स्वागत केले.
- औक्षण आणि नवागतांचे स्वागत –
नविन आशा आकांक्षांनी भरु दे ही झोळी,
मांगल्याचे ‘औक्षण’ करूनी हसेल दिवाळी..
प्रभात फेरी पूर्ण झाल्यावर शाळेच्या प्रांगणात आलेल्या नावागतांचे अंगणवाडीच्या सेविका जाधव मॅडम यांनी नवीन आकांक्षांनी विद्यार्थ्यांची झोळी भरत औक्षण करून स्वागत केलं, नंतर सर्व नवागतांचे स्वागत उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पाठय पुस्तक ,गुलाब पुष्प ,टिफिन बॉक्स , वाढदिवसाच्या टोप्या ,फुगे आणि खाऊ देऊन करण्यात आले.नवी पुस्तके ,टिफिन बॉक्स ,फुगे आणि खाऊ याने ही मुले हरखून गेली होती.
- पाठयपुस्तक वाटप –
किताबे कुछ केहना चाहती है ,
तुम्हारे पास रेहान चाहती है….!!
शालेय जीवनाची सुरवात ,नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात ,मृगाचा पाऊस पडल्यानंतर मातीला जसा सुगंध येतो, तसाच सुगंध नवीन पाठपुस्तकांच्या रूपांने मुलांना खुणावत असतो. सर्वजण त्यासाठी आतुर असतात.म्हणूनच आजच्या या शुभ प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व मुलांना पुस्तक वाटप करण्यात आले. पुस्तकातील ज्ञान संपादित करण्यासाठी सर्व ज्ञानार्थी सज्ज झाले.नवागताच्या चेहऱ्यावरचा पहिल्या दिवशीच्या पहिल्या पुस्तकाचा आणि वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा नव्या पुस्तकाचा आनंद तो काय वर्णावा ,आजच सगळं पुस्तक वाचून संपवायचं असल्यासरखी सगळे विद्यार्थी या पुस्तकंच्या दुनियेत त्यांच्याशी हितगुज करण्यात रंगून गेले …..!!
- मार्गदर्शन-
विद्यार्थ्यांना गुणवत्ता देणारी व त्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आणि मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण हे सर्वोत्तम शिक्षण तेव्हा शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान ,यासाठी आपली मूले जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकवा असे आवाहन करत मुख्याध्यापक श्री राऊत सर यांनी नावागत विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ….!!
- पाहिलं पाऊल-
आज १७ जून २०१९ ला नावागत विद्यार्थ्यांनी या शाळेतील प्रवेशाबरोबर आपल्या शालेय शिक्षणाच्या दिशेने पाहिले पाऊल टाकले आहे ,या त्यांच्या पहिल्या पावलांची कायम आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे स्वतंत्र कागदावर घेऊन जतन करण्यात आले…..!!
- मिष्टान्न भोजन –
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ,
सहज हवन होते नाम घेता फुकाचे…!!
आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रम्ह मानले आहे आणि हेच ओळखून आणि नावागत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात तोंड गोड करून व्हावी म्हणू शालेय पोषण आहार योजनेंतर्गत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गोड जेवणाचे सोबत फरसाण असे सकस आहाराचे नियोजन चिमुकल्यांसाठी करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव यांच्या सौजन्यातून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. अंगणवाडी सेविका श्रीम जाधव मॅडम आणि श्रीम कुर्हे मॅडम यांनी कार्यक्रमाला अतिशय मोलाचे सहकार्य केले. श्री.नारायण मंगलारम यांनी सुत्रसंचालन केले.तर शाळेचे मुख्याध्यापक श्री.सर्जेराव राऊत सर,यांनी सर्वांचे आभार मानले.
जाता जाता फक्त इतकेच म्हणेन की ,इतक्या दिवसाच्या विद्यार्थी किलबिलाटांच्या विरहानंतर आज या चिमुकल्यांचा कौतुक सोहळा आणि चिवचिवाट ऐकल्यानंतर शाळेच्या वास्तुतही हेच विचार आले असतील,
“ज्ञान मंदिर हे ज्ञानाचे
आज किलबिलाटाने नटले
निर्जीव भिंतींना या जणू
त्यांचे श्वास येऊन भेटले….!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी
ता. राहुरी ,जि अहमदनगर